देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळवून देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ३१ ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०१९ मध्ये दुसऱ्यांदा आणि ५ डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०१४ मध्ये मुख्यमंत्री म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास २०२४ मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ (Chief Minister of Maharashtra) घेऊन पूर्णत्वास आला आहे.
सलग तीनवेळा जनतेने कौल दिलेला मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे एक प्रामाणिक, कार्यक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चे स्थान राखून आहेत. २०१४ आणि २०१९ नंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणे ही एक ऐतिहासिक घटना ठरली. हा क्षण फक्त त्यांच्यासाठीच नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. २०१४ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विकासाच्या अनेक पायऱ्या चढल्या. त्यांच्या या विकासात्मक कामाचा पायंडाच त्यांच्या पुढील राजकीय यशाचा पाया ठरला. मतदारांनी त्यांच्या विकासरुपी राजकारणाला भरभरून मते देत २०१९ मध्ये पुन्हा एकदा संधी दिली. पण शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाची साथ सोडली. अशावेळी देवेंद्रजींनी जनतेने दिलेला कौल प्रमाण मानत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण ते सरकार अवघ्या ५ दिवसातच गडगडले. त्यानंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि भाजपच्या मदतीने नवीन सरकार स्थापन केले. या नवीन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. अडीच वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर नियतीने त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले.
मुख्यमंत्रीपद आणि देवेंद्र फडणवीस – Chief Minister of Maharashtra
महाराष्ट्राच्या राजकारणात आठवणीत राहतील असे काही मोजके नेते आहेत; त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रणी राहील. त्यात प्रामुख्याने त्यांनी तीनवेळा घेतलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयाच. पण आणखीही काही रंजक गोष्टी आहेत. ज्या महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच घडल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकांनंतर अस्तित्वात आलेल्या १४व्या विधानसभेत देवेंद्रजींनी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री अशा तीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या एकाच टर्ममध्ये स्वीकारल्या. यापूर्वी अशा पद्धतीने एकाच टर्ममध्ये तीन वेगवेगळ्या पदांवर बसण्याचा मान यापूर्वी कोणालाच मिळालेला नाही. त्याचबरोबर देवेंद्रजींनी २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग तीन टर्ममध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. असा बहुमान देखील इतर कोणालाही मिळालेला नाही. दरम्यान, २०१९ मध्येही देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तो कालावधी खूपच कमी ५ दिवसांचा होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे समीकरण २०१४ पासून इतके फीट बसले आहे की, ते २०२४ मध्ये पुन्हा एकदा लागू झाले आहे.
विदर्भ आणि मुख्यमंत्रीपद
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंतचे एकमेव मुख्यमंत्री ठरले आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत काही साम्ये आहेत. जसे की, वसंतराव नाईक हे विदर्भातील होते. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विदर्भातीलच आहेत. वसंतराव नाईक यांनी आतापर्यंत तीनवेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनीही तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ (Chief Minister of Maharashtra) घेतली. मुख्यमंत्रीपदाचा ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे विदर्भातील हे दोनच नेते आहेत. त्याचबरोबर वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ५ डिसेंबर १९६३ या दिवशी घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ५ डिसेंबर २०२४ रोजी घेतली. वसंतराव नाईक यांनी ११ वर्षे ७८ दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्यानंतर आता देवेंद्रजी अगोदरची ५ वर्षे आणि आताची ५ वर्षे अशी एकूण १० वर्षे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी पार पाडतील, अशी चिन्हे दिसत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथविधी हा केवळ एका व्यक्तीचा विजय नसून महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्याचा, विकासाचा आणि लोककल्याणाच्या प्रवासाचा एक नवा अध्याय आहे. त्यांच्याकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. या नवीन कार्यकाळात त्यांच्याकडून महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर अधिक पुढे नेण्याचे काम उभारले जाईल, यात तीळमात्र शंका नाही.
संबंधित लेख: