देवेंद्र फडणवीस यांची हॅटट्रिक: महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक विजय | Maharashtra Assembly Election 2024 in Marathi

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीसह भाजपाला मोठा धक्का सहन करावा लागला होता. पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने लोकसभेचा पराभव भरून तर काढलाच पण राज्यात वैयक्तिक १३२ आमदार निवडून आणले. सलग तिसऱ्यांदा १०० हून अधिक जागा जिंकत देवेंद्र फडणवीस यांनी एक ऐतिहासिक विजय मिळवला. २०१४ मध्ये १२३ जागा, २०१९ मध्ये १०५ जागा आणि आता २०२४ मध्ये १३२ जागांवर यश मिळवून त्यांनी पक्षाचे राज्यात मजबूत स्थान निर्माण केले.

महाराष्ट्रातील २०२४ ची विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024 in marathi) ही वेगवेगळ्या अर्थाने खूप महत्त्वाची होती. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्राकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण महाराष्ट्र भाजपा त्या पूर्ण करू शकला नाही. राज्यात भाजपाचे अवघे ९ खासदार निवडून आले. जे २०१९ मध्ये २३ खासदार होते. या पराभवाची कारणमीमांसा करून त्याचे विश्लेषण करून महाराष्ट्र भाजपाने पुन्हा एकदा नव्या ताकदीने आपला प्रचार सुरू केला. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत निर्माण केलेल्या फसव्या नेरीटीव्हचा पर्दाफाश करून राज्याची निवडणूक राज्य केंद्रीत आणि राज्यातील विकासाच्या प्रश्वांवर आणली. यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील जागावाटप, प्रचाराची दिशा आदी संपूर्ण अधिकार हे देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. पक्षाने दिलेल्या या संधीचे सोने करून त्यांनी पक्षाला राज्यात मोठा विजय मिळवून दिला.

Maharashtra Assembly Election 2024 in Marathi

आव्हानांनी भरलेली संधी!

देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक विविध आव्हानांनी भरलेली होती. २०१४ मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली विकासकामे, शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना, मुंबईत उभे केलेले इन्फ्रास्ट्रक्चर यामुळे २०१९ मध्ये जनतेने पुन्हा एकदा विकासकामाला प्राधान्य देत भाजपाचे १०५ आमदार निवडून दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर भाजपाचा आणि देवेंद्र फडणवीस यांचाच अधिकार होता. पण उद्धव ठाकरे यांनी राजकीय खेळी करत मुख्यमंत्री पद हिसकावून घेतले. दरम्यान, २०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या उठावामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. पण त्या सरकारमध्ये देवेंद्रजींना पक्षनेतृत्वाच्या आदेशामुळे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आणि अजित पवारांचा गट महायुतीत सहभागी झाला. याचदरम्यान राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला होता. आंदोलकांकडून सरकारपेक्षा वैयक्तिक देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आरोप केले जाऊ लागले. मुळात सर्वप्रथम २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते. जे महाविकास आघाडी सरकार टिकवू शकले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याला धरून आर्थिक निकषांवर आधारित १० टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळवून दिले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपाने फूट पाडल्याचे बोलले जात होते. त्यामुळे मूळ पक्ष कोणासोबत आहेत. त्यांना जनता समजून घेणार का? हे मुद्देही तितकेच महत्त्वाचे होते. एकीकडे लोकसभेत मिळालेल्या अपयशानंतर या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा निवडून आणण्याचे शिवधनुष्य देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती उचलेले होते. यावेळी त्यांनी पक्षाची हिंदुत्वाची आक्रमक भूमिका स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ है! या नाऱ्याला आश्वासक साद दिली. त्याच्या सोबतीला नव्याने आणलेल्या लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी सन्मान योजना, एक रुपयांत पीक विमा, स्मार्ट सिटी प्रकल्प या योजनांबरोबर महाविकास आघाडी सरकारने स्थगित केलेल्या प्रकल्पांना सत्तेत आल्यावर चालना दिली. या सर्व मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. महायुती आणि भारतीय जनता पक्षाने केलेल्या कामांची बुथनिहाय लोकांपर्यंत पोहोचवण्याची रणनिती आखली. राज्यभरात लहानमोठ्या ६४ जाहीर सभा घेतल्या. यामुळे भाजपाची ग्रामीण आणि शहरी भागातील विश्वासार्हता वाढली. त्याचे मतात रूपांंतर होऊन २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली शंभरी पारच्या आमदारांची खेळी २०१९ नंतर २०२४ मध्येही कायम ठेवली. उलट २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला १४९ जागा लढवून त्यातील १३२ जागांवर विजय मिळवता आला आहे.

देवेंद्र फडणवीसच प्रबळ दावेदार का?

देवेंद्र फडणवीस यांचे योगदान फक्त पक्षापुरते सीमित नाही. त्यांनी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षनेता असताना दाखवलेले नेतृत्व, धाडसी निर्णय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर कोणत्याही पक्षाने किंवा नेत्याने अशी कामगिरी केलेली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमागे भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना कारणीभूत मानले गेले. त्याचा फटकाही लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला वैयक्तिक बसला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दाखवली. पण केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकांसाठी विशेष रणनिती राबवली. देवेंद्र फडणवीस हे वैयक्तिक १९९९ पासून नागपूरचे प्रतिनिधित्व करत आहेत. विधिमंडळातील त्यांच्या कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आताची त्यांची ही सहावी टर्म आहे. या २५ वर्षांच्या कारकीर्दीत फडणवीस यांनी अनेक प्रकारचे विषय हाताळले. यामध्ये निवडणुकांची रणनिती हा देखील महत्त्वाचा भाग त्यांनी लिलया पेलला आहे. २०१३ मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वीकारलेली भूमिका अजूनही त्यांच्यात कायम आहे. यातूनच त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात पक्षाचा विस्तार करून समाजघटकांतील अनेक लोकांना पक्ष कार्यात जोडून घेतले. या संपूर्ण प्रयत्नांचा परिपाक म्हणून भाजपाचे सलग तिसऱ्यांदा शंभराहून अधिक आमदार निवडून आले. या तिन्ही निवडणुकांमध्ये पक्षाने, कार्यकर्त्यांनी आणि जनतेनेही देवेंद्रजींचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे आताचा विजय हा फक्त निवडणुकांमधील विजय नाही, तर महाराष्ट्रातील जनतेचा विकास आणि स्थिर सरकार देणाऱ्या व्यवस्थेवरील विश्वास अधोरेखित करणारा हा विजय आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने साधलेली ही हॅटट्रिक महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या पर्वाची सुरूवात ठरणार आहे. ज्याद्वारे नागरिकांच्या अपेक्षांचे जतन करत पक्षाला भविष्यातील आव्हानांसाठी तयार ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

इतर लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *