Mihan Project: मिहानचे आंतरराष्ट्रीय कार्गो आणि दोन धावपट्ट्यांसह नवे टेक-ऑफ

नागपूरमधील मिहान (मल्टी-मॉडेल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट नागपूर) या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवी दिशा मिळत आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो सेवांचे केंद्र म्हणून मिहानचा विकास होत आहे. इथे तयार करण्यात आलेल्या दोन अत्याधुनिक धावपट्ट्या खूपच महत्त्वाच्या ठरत आहेत. मिहान प्रकल्पामुळे नागपूर हे फक्त मध्य भारतातील एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र बनत नाहीये, तर संपूर्ण देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येणार आहे.

मिहान विदर्भातील विकासाचा कणा – Mihan Project in Nagpur

मिहान प्रकल्प हा देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हा प्रकल्प फक्त नागपूर किंवा मध्य भारतातील वाहतूक केंद्र म्हणून नाही तर देशभरातील उद्योगांच्या, आयात-निर्यातीच्या, आणि विविध सेवांच्या व्यापक केंद्रबिंदूच्या स्वरूपात उभे राहत आहे. आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीपासून, अत्याधुनिक तंत्रज्ञान, फार्मसी, संरक्षण उत्पादनांपर्यंत मिहान प्रकल्पाने विविध क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. मिहान प्रकल्पामध्ये होत असलेल्या गुंतवणुकीतून, मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कार्गो आणि दोन धावपट्ट्यांसह एक सुसज्ज विमानतळ यामुळे नागपूर आणि विदर्भाच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडून येणार आहे.

गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती

मिहान प्रकल्पात सुमारे १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) ५ हजार कोटींची आणि विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर ८ हजार कोटींची गुंतवणूक झाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून मिहान परिसरात प्रत्यक्ष ४२,६०० आणि अप्रत्यक्षपणे ६५,२४५ अशी एकूण १ लाख ७ हजार ८५७ रोजगार निर्मिती झाली आहे. हा प्रकल्प आणि इथे येणाऱ्या कंपन्यांमधून विदर्भातील तरुणाईला मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. तसेच हा प्रकल्प सध्या विदर्भाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भविष्यात महाराष्ट्र आणि देशाच्या आर्थिक विकासात याचा वाटा वाढणार आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदान

मिहान प्रकल्पात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. यामध्ये टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल, स्मार्ट डेटा, ग्लोबल लॉजिस्टिक्स, ऐसेंट बिझनेस सोल्यूशन, हेक्सावेअर, इंफोसेफ्ट, एसएम कम्पलायन सोल्यूशन, पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेड, आणि मास्टर सॉफ्ट ई.आर.पी. या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी मिहानमध्ये माहिती तंत्रज्ञान सेवांचा विस्तार केला असून, या क्षेत्रातील रोजगार संधींना चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1736014186516537839

औषधी आणि फार्मा क्षेत्रात गुंतवणूक

मिहानच्या प्रकल्पात ल्युपिन फार्मा आणि न्युबेनो हेल्थ केअर सारख्या औषधी कंपन्यांनीही गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांच्या योगदानामुळे भविष्यात विदर्भातील औषधी आणि फार्मा क्षेत्रात मोठी प्रगती होणार आहे. या कंपन्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात औषधांची निर्यात करीत आहेत. ज्यामुळे नागपूर हे भविष्यात फार्मा उद्योगाचे हब म्हणून नावारूपाला येऊ शकते.

विमान उत्पादन व देखभाल

मिहान प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण विभाग म्हणजे विमान उत्पादन आणि देखभाल केंद्र. टीएएसएल (TASL) कंपनीकडून बोईंग, एअरबस आणि इतर आंतरराष्ट्रीय विमानांचे सुटे भाग तयार करून निर्यात केली जात आहे. तसेच, बोईंगच्या सर्व विमानांची देखभाल आणि दुरुस्तीचे मुख्य केंद्र मिहानमध्ये सुरू झाले आहे. याशिवाय, दसॉल्ट आणि रिलायन्स एरोस्पेसच्या माध्यमातून फाल्कन २००० या प्रवासी विमानाचे कॉकपिट, फ्रन्ट फ्यूल टँक आणि विमानाचे इतर भाग येथे तयार केले जातात. थॅलेस कंपनीद्वारे विमानांची रडार सिस्टीम, युद्ध सामग्री व संरक्षण यंत्रणांची निर्मिती तसेच निर्यात येथे केली जाते. या उद्योगांमुळे नागपूर आंतरराष्ट्रीय विमान उद्योगासाठी महत्त्वाचे केंद्र बनू लागले आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1733004261871546819

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास

मिहान प्रकल्पात सुमारे १३०० हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय हब विमानतळ विकसित करण्यात येत आहे. यासाठी नवीन टर्मिनल इमारत, दुसरी धावपट्टी, एटीसी टॉवर, मालवाहतूक संकुल आणि अग्नीशमन यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे १६८५ कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे नागपूरमधील प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीच्या सुविधा वाढणार आहेत. ज्यामुळे विदर्भातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवा आयाम मिळणार आहे.

पुनर्वसन आणि नागरी सुविधा

मिहान प्रकल्पाच्या विस्तारामुळे शिवणगाव गावातील १०३६ घरांचे पुनर्वसन चिंचभवन येथे करण्यात आले. या पुनर्वसित क्षेत्रात स्थलांतरित केलेल्या नागरिकांना सर्वप्रकारच्या  नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ६५.८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यामुळे स्थानिकांना इथे चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पुनर्वसन झालेल्या या नागपूरकरांनी शहराच्या विकासामध्ये सहभागी होऊन जिल्हा आणि राज्याच्या प्रगतीला कायम साथ दिली.

मिहान प्रकल्प (Mihan Project) नागपूर आणि विदर्भातील सर्वांगीण विकासाचे एक महत्त्वाचे उदाहरण ठरत आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, औद्योगिक विस्तार, माहिती तंत्रज्ञान, औषधी आणि संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीमुळे मिहान प्रकल्प विदर्भातील प्रगतीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. विदर्भाला एक विकसित आणि समृद्ध क्षेत्र म्हणून उभारण्यासाठी मिहानचा वाटा अत्यंत मोलाचा ठरणार आहे.