Maharashtra Assembly Winter Session 2023 : सत्ता येते, सत्ता जाते… पण देश महत्वाचा!

सध्या नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन -Maharashtra Assembly Winter Session सुरु आहे. परंतु अधिवेशनाचा पहिलाच दिवस गाजला तो नवाब मालिकांच्या सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्यामुळे. नवाब मलिक सध्या शरद पवार गटात आहेत की अजित पवार गटात आहेत की डी-गॅंगमध्ये आहे, सांगता येत नाही. परंतु देशद्रोहाच्या खटल्यात अटक झालेले नवाब मलिक सध्या मेडिकल जामिनावर बाहेर आलेले आहेत. असे असूनही ते हिवाळी अधिवेशनाला हजर राहिले, हा आमदार म्हणून त्यांचा अधिकार आहे. परंतु ते थेट सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्याने वसुली आघाडीच्या आमदारांनी अधिवेशनात गोंधळ घालत थेट देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले. त्याचे कारणही तसेच होते! नवाब मलिक यांना तुरुंगात खडी फोडायला पाठविणारे देवेंद्र फडणवीसच होते. त्यामुळे नवाब मालिक थेट सत्ताधारी बाकावर येऊन बसल्याचे भांडवल करत Devendra Fadnavis युतीधर्मापुढे हतबल झाले वगैरे नॅरेटिव्ह विरोधकांनी चालवलं!

Maharashtra Assembly Winter Session 2023
Maharashtra Assembly Winter Session 2023

हे सत्यच आहे की देवेंद्र फडणवीसांमुळेच नवाब मलिक तुरुंगात गेले. महाविकास आघाडी सत्तेत असताना राज्यात गांजा आणि ड्रग्ज तस्करांचा आणि हर्बल तंबाकू बाळगणाऱ्या जावयाच्या संगतीत राहून दररोज सकाळी पत्रकार परिषदा घेऊन बरळणाऱ्या वाचाळवीरांचा सुळसुळाट झाला होता आणि नवाब मलिक त्यात अग्रणी होते. कार्डिलीया क्रूज प्रकरणात नवाब मलिकांनी NCB वर अनेक खोटेनाटे आरोप करत ड्रग्ज माफियांची पाठराखण केली होती. इतकेच काय, खुद्द नवाब मलिकांच्या जावयाच्या घरात गांजा व अंमली पदार्थांचा मोठा साठा NCB ने जप्त केला होता. जावई तुरुंगात गेल्याने चरफडणाऱ्या नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत कुठल्या तरी कार्यक्रमात नकळत घेतलेल्या फोटोचे भांडवल करत देवेंद्र फडणवीसांचा संबंध थेट दाऊद गँगशी असल्याचा आरोप करत राज्यात खळबळ माजवली होती आणि इथेच FBI म्हणजेच फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनची एंट्री झाली. देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ चारित्र्याचे आणि चुकीच्या गोष्टी व व्यक्तींपासून चार हात दूर राहणारे नेते आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे खोटेनाटे आरोप करून कुणी आपले चारित्र्यहनन करत असेल तर त्याला जश्यास तसे उत्तर देणे क्रमप्राप्त आहे. Nawab Malik  देवेंद्रजींवर खोटे आरोप करताना हे विसरून गेले की देवेंद्रजी 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही होते. त्यामुळे नवाब मलिकांची काळी कुंडली काढायला देवेंद्रजींना फारसा वेळ लागणार नव्हता आणि तसेच घडले.

देवेंद्रजींनी चेंबूर येथील गोवावाला कंपाऊंड जमीन घोटाळा प्रकरणात नवाब मलिक आणि दाऊद गॅंग यांच्यातील जमीन व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाण याचा पुराव्यानिशी गौप्यस्फोट केला. दाऊद अनेक वर्षांपासून आपली बहीण हसीना पारकर हिच्या माध्यमातून मुंबईतील जमिनी दहशतीच्या बळावर बळकावून त्या नवाब मलिकला कवडीमोल भावात विकायचा. म्हणजे नवाब मलिक फक्त कागदोपत्री मालक असून मूळ मालक दाऊदचं असायचा. देवेंद्र फडणवीसांनी सबळ पुराव्यानिशी सदर प्रकरणाचा भांडाफोड केल्याने NIA ने देशद्रोहाच्या आरोपाखाली नवाब मलिकला अटक केली आणि तेव्हापासून मलिक तुरुंगात होते. नवाब मलिक तुरुंगात गेल्यावरही ना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रिमंडळातून काढले, ना शरद पवारांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. यावरून महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा पवार होते की स्वतः दाऊद होता, हा संशय बळावतो. कारण याच काळात संपूर्ण महाराष्ट्रात ड्रग्ज विक्रीचा सुळसुळाट झाला. मलिकच्या जावयाच्या घरात ड्रग्ज सापडल्यावर शरद पवारांनी ते ड्रग्ज नसून ‘हर्बल वनस्पती’ असल्याचा हास्यास्पद दावा करत मलिकांचा बचाव केला.

पुढे राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार गट महायुतीत आला. या वर्षभरात तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांनी अनेकदा मेडिकल बेलसाठी अर्ज केला, परंतु न्यायालयाने तो नाकारला. परंतु अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती खरोखरच ढासळल्याने त्यांना मेडिकल बेल मंजूर झाला. त्यानंतर नवाब मलिक वैद्यकीय उपचारांमध्येच व्यस्त होते. न्यायालयाने बंदी घातल्याने ते माध्यमांपासूनही दूर होते. परंतु वर्षभर कुठेच नसलेले नवाब मलिक अचानक हिवाळी अधिवेशनात प्रकट होतात आणि देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी थेट सत्ताधारी बाकावर अजित पवार गटाच्या आमदारांसोबत जाऊन बसतात यामागे कुठेतरी शरद पवारांचा तर हात नाही ना, अशी सुद्धा शंका यायला वाव आहे. कारण आज राष्ट्रवादी दुभंगलेली आहे आणि नवाब मलिकांनी ते नक्की कुठल्या गटात आहेत हे अजूनही स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे ज्याच्यावर देशद्रोहाचे आरोप केले ते नवाब मलिकच आज देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले असे नॅरेटिव्ह मविआ आणि त्यांच्या पाळीव पत्रकारांकडून चालविल्या गेले. परंतु त्याच वेळी सुनील तटकरेंनी केलेले ट्विट आणि अजित पवारांनी त्याला केलेले रिट्विट मात्र माध्यमांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवले. सुनील तटकरेंच्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट केले की नवाब मलिक पक्षाचे जेष्ठ नेते असल्याने सौजन्यादाखल आम्ही त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आता यात कितपत तथ्य आहे हे अजित पवार गटालाच ठाऊक, परंतु सायंकाळी देवेंद्रजींनी अजित पवारांना एक खरमरीत पत्र लिहत, नवाब मलिकांना महायुतीत अजिबात स्थान मिळणार नाही असे ठणकावून सांगितले. देवेंद्रजींच्या या लेटर बॉम्बमुळे विरोधकांनी रचलेल्या सापळ्यांच्या चिंधड्या उडाल्या आणि देवेंद्रजींना टार्गेट करण्याच्या कुत्सित मनसुब्यांवर पाणी फेरले गेले.

देवेंद्रजींनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रामधील एक ओळ फारच बोलकी आणि देवेंद्र फडणवीसांचे व्यक्तिमत्व रेखाटणारी आहे, ती म्हणजे “सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे.” काही वर्षांपूर्वी जेव्हा विरोधकांनी कट करून केवळ एका मतासाठी अटलजींचे सरकार पाडले, तेव्हा अटलजी हेच म्हणाले होते. देवेंद्र फडणवीसही त्याच मुशीत घडलेले नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार, अटलजी, अडवाणीजी, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरींसारख्या दिग्गजांच्या तालमीत वाढलेल्या देवेंद्रजींना ‘राष्ट्र सर्वतोपरी’ हेच बाळकडू मिळाले आहे. त्यामुळे युतीधर्म म्हणून भारताचा शत्रू क्रमांक-१ असलेल्या दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तीला महायुतीत देवेंद्रजी कदापि स्वीकारू शकत नाही. त्यामुळे असल्या तडजोडी करण्यापेक्षा राष्ट्रहितासाठी सत्तेला ठोकर मारणे मला अधिक प्रिय आहे, हा गर्भित इशाराच देवेंद्रजींनी आपल्या पत्रातून अजित पवार गटाला दिला. अजित पवार स्वतः नवाब मलिकांना आपल्या गटात घेण्यास इच्छुक आहेत अथवा नाही, की शरद पवारांनीच मलिकांना महायुतीत तणाव निर्माण करण्यासाठी पाठविले याचा उलगडा कधीतरी होईलच. परंतु युतीधर्म की राष्ट्रधर्म असे द्वंद्व जेव्हा उभे होईल तेव्हा मी निसंकोचपणे राष्ट्रधर्म स्वीकारेल, हे देवेंद्रजींनी आपल्या कृतीतून दाखवून देत एक आदर्श तर निर्माण केलाच, परंतु सदर प्रकारामुळे व्यथित झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा त्यामुळे १०० हत्तींचे बळ मिळाले. कारण सत्तेचं राजकारण हा भाजपचा पिंड नाही. युतीचे सरकार चालवताना पक्षनेतृत्वाला अनेकदा तडजोडी कराव्या लागतात, कार्यकर्त्यांचे मन मारावे लागते, अटलजींनी सुद्धा त्या केल्या, मोदीजींनीं सुद्धा काश्मिरातून कलम ३७० हटविण्यासाठी काहीकाळ मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार चालविले. परंतु जेव्हा राष्ट्रहिताच्या विषय येतो तेव्हा भाजप कार्यकर्ता सत्ता, पद, प्रतिष्ठा, मानमरातब या साऱ्याला लाथ मारून राष्ट्रहितासोबत उभा राहतो हा पंडित दीनदयाळ आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींपासूनचा भाजपचा इतिहास आहे. आज सामान्य भाजप कार्यकर्ता देवेंद्र फडणवीसांना सुद्धा याच महान नेतृत्व परंपरेच्या मांदियाळीत पाहतो. देवेंद्र फडणवीसांच्या पत्राने अजित पवार गटावर किती परिणाम झाला, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक! परंतु भाजपला मानणाऱ्या राष्ट्रभक्त हिंदुत्ववाद्यांच्या मनात मात्र देवेंद्रजींनी आपले स्थान अधिक घट्ट केले, हे मात्र नक्की!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *