महालबाड आघाडीतील पक्षांच्या तंबूत स्फोट व्हायला लागले की काही पाळीव पत्रकार आणि विचारजंत सतत “फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण नासवलं” अशा बोंबा मारत सुटतात. परंतु हीच मंडळी आणि यांची सूत्रे २०१९ ची विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वीपासूनच ठाकरे-पवारांचं गुटर्गू सुरु होतं, तेव्हा मात्र गप्प होते. २०१४-२०१९ या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या राजकारणात अशी वादळे कधीही आली नाही. उलटपक्षी पवार कंपूने फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटविण्यासाठी अनेक कृत्रिम वादळे निर्माण केली. कोपर्डीतील घटना, त्यातून पेटलेले मराठा आरक्षण आंदोलन, त्यातून पुढे आलेले रोहित पवारांचे नेतृत्व, पुण्यातील एल्गार परिषद, कोरेगाव भीमा येथील दंगल…पवारांनी फडणवीसांना हटविण्यासाठी जंग जंग पछाडले, परंतु फडणवीसांनी दरवेळी अतिशय संयमाने ही वादळे मोडून काढली.
महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे दुधाच्या स्वच्छ नदीसारखं मानलं तर २०१४-२०१९ या काळात या नदीचा प्रवाह अगदी सुरळीत सुरु होता. परंतु २०१९ मध्ये सर्वात आधी शरद पवारांनी भाजप-शिवसेना युतीत मिठाचा खडा टाकला आणि महाराष्ट्राचं राजकारण नासत गेलं. पवारांच्या नादी लागून उद्धव ठाकरेंनीही पनीरच्या मोहापायी दुधात लिंबू पिळलं. ज्या दिवशी राज्यात महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाविरुद्ध महाभकास आघाडी सरकार स्थापन झालं, महाराष्ट्राचं राजकारण त्याच दिवशी नासलं! त्यानंतर वसुली सरकारचे कुकर्म आणि वाचाळवीर संजय राऊतांच्या गटारगंगेमुळे ते आणखीनच गढूळ होत गेलं. त्यामुळे पनीर खाण्याच्या आशेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणाऱ्या उधोजींचे हात दुधाच्या गंगेत डुंबुनही रितेच राहिले. सत्तेचा दुरुपयोग करून ठाकरे-पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत भाजपच्या काही प्रमुख नेत्यांना राजकारणातून संपविण्यासाठी अनेक कारस्थानेही रचली आणि तिथून महाराष्ट्राला अगोदर कधीही न पाहिलेले देवेंद्र फडणवीस बघायला मिळाले.
देवेंद्र फडणवीस तसे सरळमार्गी, सज्जन, कुणाच्या भानगडीत न पडणारे व स्वतःही भानगडींपासून दूर राहणारे, संयमी नेते. परंतु आपल्याला कत्तलखान्याकडे नेले जाते आहे याची जाणीव जेव्हा होते, तेव्हा गरीब गाय सुद्धा पूर्ण ताकतीनीशी प्रतिकार करते. मग देवेंद्र फडणवीस तर ३० वर्षांपासून संसदीय राजकारणात मुरलेले नेते आहे. जोवर विरोधक देवेंद्रजींना टोचण्या-डागण्या लावत होते, तोवर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, परंतु जेव्हा विरोधक आपल्याला सार्वजनिक जीवनातूनच उठविण्यासाठी कट-कारस्थान रचते आहे याची जाणीव अथवा खात्री देवेंद्रजींना झाली तेव्हा त्यांनी विरोधकांच्या वाड्यांमध्येच सुरुंग पेटवून त्यांची धूळधाण उडवून दिली आणि हल्ल्याचा प्रतिकार करणे, हे प्रत्येक योद्ध्याचे परम कर्तव्यच आहे. त्यामुळे मुळशी पॅटर्नच्या डायलॉगप्रमाणे विरोधकांनी देवेंद्रजींचे घोडे लावायचा प्रयत्न केला आणि देवेंद्रजींनी त्यांना नांगरासकट बैल लावला! फक्त देवेंद्रजी असा प्रतिहल्ला करतील याबाबतीत विरोधक गाफील राहिल्यानेच आज उद्धव ठाकरेंसारखे नेते विमनस्क अवस्थेत वाट्टेल ते बरळायला लागले. ‘फडतूस गृहमंत्री, नागपूरचा कलंक” हे शब्दप्रयोग हे विरोधकांच्या दारुण पराभवाचे आणि त्यातून आलेल्या नैराश्याचे प्रतिबिंब आहे. महाराष्ट्राचे राजकारण नासले आहे का? तर ते नक्कीच नासले आहे, पण ते नासविणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवारच आहेत. देवेंद्रजींनी फक्त अडीच वर्ष वाट बघितली आणि त्यांची दुभती डेअरीचं बंद करून टाकली एवढाच काय तो फरक पडलाय!
मित्रांनो महाराष्ट्राचे राजकारण सध्या एक संक्रमणावस्थेतून जाते आहे. याला एक प्रकारचे महाभारतच म्हणा हवं तर! इथे एकीकडे घराणेशाही उभी आहे, जिने आजवर महाराष्ट्राला आपला बापजाद्यांची जहागिरी समजत तिचा मनसोक्त उपभोग घेतला आहे आणि आता उतारवयात त्यांना ही जहागिरी आपल्या पुढच्या पिढीच्या हाती सोपवायची आहे आणि त्यांचे बस्तान नीट बसवून देण्यासाठीच त्यांची खटपट चाललेली आहे. तर दुसरीकडे राज्यातील विस्थापित, बहुजन आणि कर्तृत्ववान तरुण नेत्यांची फळी उभी आहे, जी या जहागीरदारांचे वाडे उध्वस्त करून महाराष्ट्रात विकासाचे, जातीयवाद विरहीत आणि सर्वसमावेशक राजकारण प्रस्थापित करण्यास सज्ज आहे. या दोन्ही पक्षांमध्ये कधी थेट समोरासमोर मैदानी युद्ध होणार, कधी गनिमी कावे खेळले जाणार, धुरळा उडणार, किंकाळ्या उठणार, कोलाहल मातणार आणि हे युद्ध पाहणाऱ्या सामान्यांची क्षणभर भंबेरीही उडणार. परंतु हे युद्ध अटळ आहे आणि आवश्यकही आहे. येत्या काळात हे युद्ध प्रचंड उग्र स्वरूप धारण करणार, २०२४ ची लोकसभा निवडणूक जशीजशी जवळ येणार तसेतसे या युद्धाचे भीषण स्वरूप, या नासलेल्या राजकारणाचे अनेक पैलू आपल्याला बघायला मिळणार “किंबहुना” बघावेच लागणार. परंतु २०२४ ची लोकसभा निवडणूक आटोपताच आजच्या घडीला उसने अवसान आणून प्रतिपक्षाला चिथावणी देणारे अनेक सरदार थंडे पडणार. अडीच वर्षांची जुलमी राजवट आणि घनघोर सत्तासंघर्षाची ही काळरात्र जेव्हा संपेल, तेव्हा महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक भगवा सूर्योदय होईल, त्याच्या सोनेरी तेजाने तामसवृत्ती अस्तित्वहीन होईल आणि नवमहाराष्ट्राच्या नव्या दिवसाचा आरंभ होईल. महाराष्ट्रातला तिमिराकडून तेजाकडे नेण्याऱ्या सारथीचे नाव असेल ‘देवेंद्र फडणवीस’, जो अनेक योद्ध्यांच्या रथांचे एकाचवेळी सारथ्य करेल, त्यांना विजयी बनवेल आणि महाराष्ट्रात शांती आणि समृद्धीचे असे नवे पर्व घेऊन येईल, ज्याला गढूळ करणारा कुणी तमोगुणीच शिल्लक राहणार नाही!