मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत निधी – CM Medical Relief Fund: गरजूंना मदत करण्यात देवेंद्र फडणवीस अव्वल

देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून ते आतापर्यंत मागील काही वर्षात गरजूंना मदत करण्यात त्यांनी बाजी मारल्याचे एका माहितीतून दिसून आले. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजूंना वेगवेगळ्या प्रकारची मदत केली जाते. या निधी सहायता फंडसाठी प्रत्येक मुख्यमंत्री आपापल्यापरीने मदत करत असतो. देवेंद्रजींनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जवळपास ६१४ कोटींची वाढ केली होती. त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीसाठी एकूण १ लाख ७ हजार ७८२ अर्ज आले होते. त्यापैकी त्यांनी ६३ हजार ५७३ नागरिकांना ५९८.३२ कोटी रुपयांची मदत केली असल्याची माहिती नोव्हेंबर २०२३ मध्ये आरटीआयद्वारे कळली.

उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रूग्णालयांवर कारवाईचा इशारा

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून वर्षभरात जवळपास ४०० रुग्णांना १५ कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध करून दिली होती. पण ही रक्कम उपलब्ध करून देत असताना त्यात काही वेळेस विलंब होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी गरीब रूग्णांना वेळेत उपचार मिळावे आणि फक्त निधीअभावी त्यांना जीव गमवावा लागू नये, यासाठी ऑगस्ट २०१५ मध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केला. त्याचबरोबर त्यांनी आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांवर उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रूग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला. परिणामी राज्यातील अनेक गरजवंतांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.

मुख्यमंत्री मदतनिधीतून २६ लहान मुलांवर हृदय शस्त्रक्रिया!

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून ‘आशा द किरण’ या प्रकल्पाद्वारे पालघर जिल्ह्यातील ३६ लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी एकूण २६ मुलांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. रुग्णांच्या मदतीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सढळ हस्ते मदत करण्याचे धोरण स्वीकारल्याने हजारो रुग्णांना जीवनदान मिळाले. त्याचबरोबर या मदतीमुळे कर्जबाजारी होण्याची वेळही रुग्णांच्या कुटुंबावर आली नाही.

नाशिकमधील एक सुयोग नावाची व्यक्ती व्यवसाय म्हणून रिक्षा चालवत होती. त्यांना छातीत दुखण्याचा त्रास होत असल्यामुळे ते रिक्षा चालवू शकत नव्हते. तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी २१ लाखांचा खर्च येणार होता. तेव्हा त्यांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य निधीतून मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचप्रमाणे दहा वर्षांच्या चैतन्य कोरडे याच्यावरही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य निधीतून २० लाख रुपये मिळाल्यामुळे हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊ शकली होती.

याशिवाय धर्मादाय रुग्णालयांमध्ये असलेल्या रुग्ण आरक्षणाच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर उपचार करून देण्यात आले. त्यासाठी पहिल्या दोन वर्षात म्हणजे २०१५ ते २०१७ या कालावधीत १८० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. अनेकवेळा कायमचे बहिरेपण आलेल्या रुग्णांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करावी लागते. यासाठी सात लाखांचा खर्च येतो. त्यामुळे अनेक रुग्ण या शस्त्रक्रियेपासून वंचित राहतात. त्यावेळी देवेंद्रजींनी टाटा ट्रस्ट सारख्या संस्थ्यांच्या मदतीने विविध हॉस्पिटलच्या मदतीने या रुग्णांवर कमी खर्चात उपचार करून देण्याची सोय निर्माण केली. दरम्यान, देवेंद्रजींनी कॅन्सर रुग्णांसाठी  औरंगाबाद, नागपूरसह अनेक ठिकाणी कॅन्सरवरील उपचाराची व्यवस्था उपलब्ध करून दिल्यामुळे शेकडो कॅन्सर रुग्णांना राज्याच्या वेगवेगळ्या भागांत उपचार मिळू लागले. तसेच ज्या रुग्णांना जीवनदायी योजनेतून लाभ मिळू शकत नाही. अशा रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून तीन लाखांपर्यंत मदत देण्यास सुरुवात केली. यामुळे खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांनाही मोठा आधार मिळाला होता.

सर्वांना ५ लाखापर्यंत मोफत उपचारमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत निधी – CM Medical Relief Fund

आधुनिक उपचार पद्धतीमुळे लोकांचे आयुर्मान आणि जीवनमान उंचावले. पण ही आधुनिक उपचार पद्धती गरीबांना परवडणारी नाही. त्यामुळे पैशांअभावी अनेकांना उपचार घेता येत नव्हते. अशा गरजू लोकांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने २०१६ मध्ये राज्यातील नागरिकांसाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) राबविण्याचा निर्णय घेतला. आजच्या घडीला राज्यातील जवळपास १ कोटी नागरिक या जन आरोग्य योजनेचा लाभ घेत आहेत. आता तर सरकारने या योजनेत बरेच बदल केले आहेत. सुरूवातीला पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबांना दीड लाखापर्यंतच्या खर्चाचे विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जात होते. आता सरसकट सर्वांनाच या योजनेतून ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार घेण्याची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *