दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत देवेंद्रजींनी मुंबईतील चैत्यभूमी येथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेबांना आदरांजली वाहीली. या घटनेचा समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ फिरतो आहे. या व्हिडिओमध्ये देवेंद्रजींच्या शेजारी बाबासाहेबांचे नातू डॉ. प्रकाश आंबेडकरही दिसतात. जेव्हा बाबासाहेबांपुढे ‘पंचशीलाचे’ पठण केले जाते, तेव्हा बाळासाहेब आंबेडकर मौन बाळगून असल्याचे आणि देवेंद्रजींना पंचशील मुखपाठ असल्याचे दिसून येते. अर्थात बाळासाहेबांना पंचशील येत नसेल तर त्यात काही गैर नाही, पण ‘फडणवीस’ नावाची व्यक्ती जिने स्वकर्तुत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करूनही विरोधक व त्यांनी पोसलेली जातीयवादी पिलावळ देवेंद्रजींना त्यांच्या ‘ब्राम्हण’ जातीत जन्म घेतल्याबद्दल सतत अपमानित करत असतात, अशा देवेंद्रजींची बाबासाहेब व तथागतावर असलेली श्रद्धा हा बाबासाहेबांच्या विचारांचा विजय आणि देवेंद्रजींच्या विरोधकांच्या वैचारीक विकृतीचा दारुण पराभव होय. ओठांवर शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेत कृतीतून समाजात जातीवादाचे विष पेरणाऱ्या एका तरी कथित पुरोगामी नेत्याला ‘पंचशील’ मुखपाठ असेल का?
शरद पवारांचा पक्ष, त्यांनी पोसलेल्या संघटना सतत देवेंद्रजींना त्यांच्या जातीवरून टार्गेट करत असतात. त्यांच्या मते शरद पवार हे जाणते राजे, मराठ्यांचा अभिमान आणि शेतकरी व बहुजनांचे कैवारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे कपटी, कारस्थानी, अनाजीपंत. खुद्द शरद पवारांनाच देवेंद्र फडणवीस २०१४ पासूनच डोळ्यात सलतात आणि त्यांचा सल हा अधूनमधून त्यांच्या जातीयवादी विधानांमधून झळकतही असतो. स्वराज्यद्रोह हा जसा अनाजी दत्तोने केला तसाच तो खंडोजी खोपडे, घोरपडे आणि मोरेंनीही केला. पण त्यावर ही मंडळी कधी बोलणार नाही. परंतु ‘जाणते’ पवार अँड पिलावळ अजाणतेपणाने का होईना पण देवेंद्र फडणवीसांना आपला कट्टर प्रतिस्पर्धी मानतात हा देवेंद्रजींचाच राजकीय विजय !
पवारांची सत्तेतील ५० वर्षांची कारकीर्द आणि फडणवीसांची सत्तेतील जेमतेम ५ वर्षांची कारकीर्द यांची तुलना केल्यास फडणवीस किती ‘फडणवीस’ आहेत आणि पवार किती ‘पवार’ आहेत याचा फैसला होईल!
५० वर्ष सत्ता उपभोगुनही पवारांना बाबासाहेबांबद्दल काही करावंसं वाटलं नाही, खैरलांजी प्रकरण, गोवारी हत्याकांडही त्यांच्याच काळात घडले…
देवेंद्रजींनी सत्ता हाती घेताच इंदू मिलचा प्रश्न निकाली लावत बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक निर्माण करायला सुरुवात केली…
५० वर्ष सत्ता उपभोगुनही पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यावेसे वाटले नाही…
देवेंद्रजींनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली…
५० वर्ष सत्ता उपभोगुनही स्वतःला बहुजनांचे कैवारी म्हणवणाऱ्या पवारांनी मूठभर बहुजन नेते पदरी बाळगण्या पलीकडे काहीच केले नाही…
देवेंद्रजींनी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली, ओबीसी राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी निष्णात वकिलांची फौज उभी केली…
पवारांना सोडा, त्यांच्याकडून स्वतःखेरीज अन्य कुणाच्या भल्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल…
याच ‘फडणवीसांनी’ शिवछत्रपतींच्या गड-किल्ल्यांवरील मोगलाईची प्रतीके उध्वस्त केली आणि त्यांचा बुलडोजर अजूनही चालतोच आहे…
याच ‘फडणवीसांनी’ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतिसूर्य लहुजी वस्ताद यांचे भव्य स्मारक निर्माण करायला सुरुवात केली…
याच ‘फडणवीसांनी’ हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकाचे निर्माण केले…
राहुल गांधी आणि काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सतत अपमान करत असताना बाळासाहेबांचे वारस गप्प बसून होते मात्र देवेंद्रजी एकटेच काँग्रेसवर तुटून पडले होते…
एवढेच कशाला, स्व. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा मंजूर करणारेही हेच ‘फडणवीस’ आहेत…
त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर कितीही चिखलफेक केली, त्यांच्याविरुद्ध जातीयवादाचे विष पसरविले, तरी आपल्या कृतीतून महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या थोर महापुरुषांचा योग्य सन्मान जर कुणी केला असेल तर तो याच ‘देवेंद्र फडणवीसांनी’ केला आहे. त्यामुळेच असत्य आणि अपप्रचाराचे कारखानेच्या कारखाने उभारूनही विरोधक जनता आणि देवेंद्र यांच्यातील प्रेमाचे नाते तोडू शकली नाही, याउलट ते अधिकाधिक घट्ट होत आहे!