Magnetic Maharashtra in Marathi : महाराष्ट्र देशातील पहिले असे राज्य आहे; जे ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. २०२५ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरपर्यंत जाईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांना आहे. यासाठी त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सुधारणावादी धोरण स्वीकारले होते. त्याचाच एक भाग म्हणून फडणवीस सरकारने २०१८ मध्ये ‘मॅग्नेनिटक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८’च्या माध्यमातून महाराष्ट्रात १२ लाख १० हजार ४६४ कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते.
मॅग्नेटिक महाराष्ट्र | Magnetic Maharashtra Summit in Marathi
मेक इन इंडियाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औद्योगिक क्षेत्राला चालना मिळावी आणि जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक व्हावी. त्यातून रोजगार निर्मिती व्हावी. यासाठी इन्व्हेस्ट इंडिया (Invest India) हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्याचे ठरवले होते. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २० जणांची शक्तीप्रदान समिती स्थापन केली होती. ही समिती विविध क्षेत्रातील गुंतवणूकदारांशी समन्वय साधणे, विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करणे आणि धोरणात्मक अंमलबजावणीच्या योजनांचा निर्णय घेणे यावर काम करत होती. दरम्यान या समितीने आणि राज्य सरकारने इन्व्हेस्ट इंडिया २०१८ या नावाऐवजी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८’ या नावाने परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य सरकारने मुंबईतील बीकेसी येथे १८ ते २० फेब्रुवारी २०१८ मध्ये तीन दिवसांची जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषद आयोजित केली होती.
तीन दिवसांच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र ग्लोबल इन्व्हेस्ट समिटमध्ये महाराष्ट्राने १२.१० ट्रिलियनपेक्षा (१२ लाख १० हजार कोटी) जास्त गुंतवणुकीचे करार केले. एकूण या तीन दिवसांत राज्य सरकारने ४,१०६ सामंजस्य करार केले. त्याशिवाय महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या एजन्सीद्वारे करण्यात आलेल्या १०४ प्रकारच्या सामंजस्य करारातून ३ लाख ९१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मंजूर करून घेण्यात आली होती. यामध्ये हायपरलूप, इलेक्ट्रिक वाहने, लॉजिस्टिक्स, वस्त्रोद्योग, जेम्स अॅण्ड ज्वेलरी यातून ५.४८ ट्रिलियन रुपयांची, तर हाऊसिंग क्षेत्रातून ३.८५ ट्रिलियन आणि ऊर्जा क्षेत्रातून १.६० ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक झाली होती. या गुंतवणूक परिषदेप्रमाणेच फेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया इन्व्हेस्टमेंट परिषदेतून राज्य सरकारने २,९८४ सामंजस्य करार केले होते. त्यापैकी ६३ टक्के करार पूर्ण झाले होते. मागील गुंतवणुकीचा हा अनुभव पाहता मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमातून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली.
मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ मधून झालेल्या एकूण १२.१० ट्रिलियन गुंतवणुकीतून महाराष्ट्रात रोजगार देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. जवळपास यातून ३.६ दशलक्षाहून अधिक रोजगार निर्माण होण्याची क्षमता होती. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या गुंतवणुकीच्या आधारावर फडणवीस सरकारने पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला होता. मुंबईसह पुणे, नवी मुंबई, नागपूरमध्ये मेट्रोचे काम सुरू केले. त्यानंतर मुंबई कोस्टल रोड उभारण्यासाठी परवानगी दिली. नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती दिली. मुंबई ते नागपूर असा जवळपास ७०० किलीमीटर लांबीच्या समृद्ध महामार्गाची घोषणा केली. या सर्व प्रकल्पांसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदेखील केली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. गुंतवणूकदारांचा तो विश्वास आता खऱ्या अर्थाने सार्थ ठरल्याचे दिसून येते. वर नमूद केलेले बरेच प्रकल्प पूर्ण झाले असून त्यामुळे विकासाला मिळालेली गती दिसून येते.
मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रमुख उद्दीष्ट – Magnetic Maharashtra objectives in Marathi
- मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
- एकूण ४५०० सामंजस्य करार करण्याचे नियोजन
- विविध क्षेत्रात ३५ लाख रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
- अवकाश आणि संरक्षण उत्पादन, वस्त्रोद्योग, इ-व्हेईकल्स, खाद्यान्न प्रक्रिया आणि लघु व मध्यम उद्योग या क्षेत्रांवर विशेष भर
मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स २०१८ मधील गुंतवणूक
- गृह निर्माण ७ प्रस्ताव (३ लाख ८५ हजार कोटींची गुंतवणूक)
- कृषी ८ प्रस्ताव (१० हजार २७८ कोटींची गुंतवणूक)
- पर्यटन व सांस्कृतिक १७ प्रस्ताव (३ हजार ७१६ कोटींची गुंतवणूक)
- ऊर्जा १७ प्रस्ताव (१ लाख ६० हजार २६८ कोटींची गुंतवणूक)
- इतर ४०८ प्रस्ताव (९५ हजार कोटींची गुंतवणूक)
- कौशल्य विकास ११३ प्रस्ताव (१ लाख ७६७ रोजगार निर्मिती)
- उच्च शिक्षण १२ प्रस्ताव (२ हजार ४३६ कोटी गुंतवणूक)
- महाआयटी ८ प्रस्ताव (५ हजार ७०० कोटींची गुंतवणूक)
- उद्योग क्षेत्र ३५१६ प्रस्ताव (५ लाख ४८ हजार १६६ कोटींची गुंतवणूक)
प्रमुख औद्योगिक प्रकल्प
मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ मधून खालीलप्रमाणे प्रमुख औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रात आले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड ६० हजार कोटी, व्हर्जिन हायपरलूप वन ४० हजार कोटी, थ्रस्ट एअरक्राफ्ट क्लस्टर ३५ हजार कोटी, जेएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेईकल ६ हजार कोटी, महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल ५०० कोटी रुपये.
अविकसित भागात आलेले महत्त्वाचे प्रकल्प
- लॉइड मेटल अॅण्ड एनर्जी, गडचिरोली ७०० कोटी रुपये
- जिनस पेपर अॅण्ड बोर्ड, नंदुरबार ७०० कोटी रुपये
- टेक्नोकार्ट इंडस्ट्री, अमरावती १८३ कोटी रुपये
- इंडिया ग्रो अनाज लिमिटेड, नांदेड २०० कोटी
- शिऊर ग्रो लिमिटेड, हिंगोली १२५ कोटी
मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प
- कॉयर क्लस्टर, सिंधुदुर्ग ७.५६ कोटी
- मेगा लेदर क्लस्टर, रायगड ५०० कोटी
- चित्रावारली फाऊंडेशन आर्ट अॅण्ड क्राफ्ट क्लस्टर, पालघर १ कोटी
- इलेक्ट्रॉनिक क्लस्टर, नागपूर ५ कोटी
- गोल्ड ज्वेलरी क्लस्टर, अहमदनगर.
महत्त्वाचे गृहनिर्माण प्रकल्प
- क्रेडाई महाराष्ट्र १ लाख कोटी (पाच लाख परवडणारी घरे)
- नारेडको ९० हजार कोटी (३ लाख परवडणारी घरे)
- खलिजी कमर्शियल बँक अॅण्ड भूमी राज ५० हजार कोटी (२ लाख परवडणारी घरे)
- पोद्दार हाऊसिंग २० हजार कोटी (१ लाख परवडणारी घरे)
- कन्सेप्टच्युअल अॅडव्हायजरी सर्व्हिस २५ हजार कोटी (१ लाख परवडणारी घरे)
वस्त्रोद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प
- ह्योसंग १२५० कोटी
- निर्वाण सिल्क २९६ कोटी
- पलक इंडस्ट्रिज, अमरावती २५ कोटी
- सुपर ब्ल्यू डेनिम १२५ कोटी
ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प
- अदानी ग्रीन एनर्जी ७ हजार कोटी
- रिन्यू पॉवर व्हेंचर १४ हजार कोटी
- टाटा पॉवर १५ हजार कोटी
- सॉफ्ट बँक एनर्जी २३ हजार कोटी
- युनिव्हर्जी थिंक ग्रीन २४ हजार कोटी
कृषी व विपणन क्षेत्रातील प्रकल्प
- जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने हवामान आधारित कृषी प्रकल्प ४ हजार कोटी
- आयसीआरआयएसएटी, हैद्राबाद, किसानमित्र – विदर्भातील ११ जिल्ह्यात ६६ कोटींची गुंतवणूक
- रॉयल ग्रो फूडस् १४०० कोटी
- पलासा ग्रो २७०० कोटी
फ्यूचरिस्टिक सेगमेंट
- व्हर्जिन हायपरलूप वन ४० हजार
- आयएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेईकल ६० हजार कोटी
- महिंद्रा इलेक्ट्रिकल व्हेईकल ५०० कोटी
- रिलायन्स इंडस्ट्रिज ६० हजार कोटी
लॉजिस्टिक मधील महत्त्वाचे प्रकल्प
- देवीसिटी लॉजिस्टिक पार्क नागपूर ४२४ कोटी
- राज बिल्ड इन्फ्रा ३ हजार कोटी
- लॉजिस्टिक पार्क, पुणे १०० कोटी
थेट परकीय गुंतवणुकीचे महत्त्वाचे प्रकल्प
- कॅरियर मिडिया इंडिया प्रा. लि. ३०० कोटी
- एमर्सन प्रोसेस मॅनेजमेंट ८१५ कोटी
- आयएलजीआयएन ग्लोबल इंडिया ७५० कोटी
- एलजी इलेक्ट्रॉनिक्स ३५० कोटी
- ओव्हनस कॉर्निंग इंडिया १०५० कोटी
- पेरी विर्क – ७२८ कोटी
पायाभूत सुविधांमधील प्रकल्पामध्ये सरकारची गुंतवणूक
- वाहतूक आणि बंदरे ४८ प्रकल्प, ५९ हजार ३२ कोटींची गुंतवणूक
- सार्वजनिक बांधकाम ५ प्रकल्प, १ लाख २१ हजार ५० कोटींची गुंतवणूक
- मुंबई महानगरपालिका १८ प्रकल्प, ५४ हजार ४३३ कोटींची गुंतवणूक
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ३० प्रकल्प, १ लाख ३२ हजार ७६१ कोटींची गुंतवणूक
- नगर विकास ३ प्रकल्प, २३ हजार १४३ कोटींची गुंतवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा यांच्यासह व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रॅन्सन, इमर्सनचे एडवर्ड मॉन्सर, जगप्रसिद्ध कार कंपनीचे टोनिनो लॅम्बोर्घिनी, स्वीडनचे सचिव कॅरीन रोडिंग, कॅनडाचे लघु उद्योग मंत्री बार्दिश चॅग्गर तसेच नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत हे उपस्थित होते. नवनवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी माहिती तंत्रज्ञान आणि निर्यात क्षेत्रातील ४७ मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
२०१४ नंतर विदेशी गुंतवणुकीत वाढ
राज्यात २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येण्यापूर्वी राज्यात २०१२-१३ मध्ये ८.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली होती. त्यानंतर २०१६-१७ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात सुमारे २९ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली होती. मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र त्याचबरोबर डाव्होस येथे झालेल्या जागतिक परिषदेतून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदेश गुंतवणूक झाली. फेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबईत झालेल्या मेक इन इंडियामधून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली होती. त्यावेळी झालेल्या सामंजस्य करारातील बरेचसे प्रस्ताव कार्यान्वित झाले होते. लिकॉन या सिंगापूरच्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे म्हटले होते. मागील सरकारच्या काळातील तुलनेनुसार ही वाढ ३०० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले होते. त्याचबरोबर भारतात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली होती.
मेक इंडिया परिषदेमध्ये करण्यात आलेल्या करारांप्रमाणेच २०१८ मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्समध्ये करण्यात आलेले अनेक करार कार्यान्वित झाले आहेत. त्यावेळी रिलायन्स उद्योग समूहाने एकात्मिक औद्योगिक क्षेत्र स्थापन कण्यासाठी ६० हजार कोटींचे करार केले होते. तर राज्याच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मेट्रोचे डबे तयार करण्याचा कारखाना उभारण्यासाठी करार केला होता. हा कारखाना सुरू झाला असून यातून मेट्रोच्या डब्यांची निर्मिती होऊ लागली. तसेच या कारखान्यामुळे अनेकांना रोजगारदेखील उपलब्ध झाला. रिलायन्स उद्योग समूहानेही वेगवेगळ्या भागात आपले प्रकल्प सुरू केले. मॅग्नेटिक महाराष्ट्र (Magnetic Maharashtra in Marathi) परिषदेतून उभारण्यात आलेल्या लातूरमधील मेट्रो कारखान्यामुळे मराठवाड्याचे भवितव्य बदलण्यास मदत होत आहे. अशाप्रकारे गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबविले जात आहेत.
इतर लेख