भारत काय किंवा महाराष्ट्र काय? एखाद्या तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण व्हायचे असेल तर त्यात भारत आणि महाराष्ट्र नेहमीच पुढे राहिले आहेत. डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल इंडिया याचे उदाहरण आपण सर्वांनी पाहिले आहेच. त्याचप्रमाणे सध्या जगातील सर्वाधिक इलेक्ट्रिक गाड्या तयार करणारा आणि विकत घेणारा देश म्हणून भारताची वाटचाल सुरू झाली. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतातील नामांकित वाहन कंपन्यांनी गुंतवणुकीच्या योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रही मागे राहिलेला नाही. महाराष्ट्रातही अनेक मोठमोठ्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या गुंतवणूक करत आहेत. नुकतीच एथर एनर्जीचे संस्थापक या इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनीने आपली तिसरी फॅक्टरी औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पासाठी सुमारे २ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
भारतात इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक प्रस्तावित आहे. टाटा मोटर्सने दोन अब्ज डॉलर, कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन या कंपनीने एक अब्ज डॉलर, मारुती सुझुकी (२०३० पर्यंत) साडेपाच अब्ज डॉलर, हिरो मोटोकॉर्पने दीड हजार कोटी रुपये एवढ्या प्रचंड प्रमाणात गुंतवणूक या क्षेत्रात प्रस्तावित आहे. तर सरकारी क्षेत्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीने प्रवासी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी साधारण साडेसहाशे कोटी रुपयांच्या कर्जाचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. महाराष्टातही अशाप्रकारचे प्रकल्प येत आहेत. काही महिन्यांपूर्वी राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट येथील मर्सिडिज बेंझ कंपनीला भेट दिली होती. या भेटीतून ही कंपनी महाराष्ट्रात ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे कळले. त्यानंतर पुन्हा एकदा ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. एथर एनर्जी ही इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी असून या कंपनीच्या दोन फॅक्टरी तामिळनाडूमधील होसूर येथे आहेत. आता तिसरी फॅक्टरी महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये उभारली जाणार आहे.
महाराष्ट्रातील या नवीन प्लांटमुळे कंपनीच्या लॉजिस्टिक खर्चात कपात होणार असून स्कूटर्सची डिलिव्हरी सुद्धा जलद होणार आहे. त्यामुळेच कंपनीने औरंगाबादमधील बिडकीन हे ठिकाण निवडले आहे. मुंबई-दिल्ली औद्योगिक पट्ट्यातील बिडकीन येथे १०० एकर जमीनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. एथर एनर्जी कंपनी इलेक्ट्रिक गाड्या, चार्जिंगसाठी लागणारी साधने, बॅटरीशी निगडित सेवा, याचबरोबर कॉम्प्युटर मॅनेजमेंटचे कामही कंपनी करते. ई-स्कूटरची वाढती मागणी पाहता एथर एनर्जीने हा तिसरा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू केला.
एथर एनर्जी कंपनी या प्लांटच्या माध्यमातून महाराष्ट्रात २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. या एवढ्या मोठ्या गुंतवणुकीमुळे या भागात जवळपास ४ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. या प्लांटमुळे ऑटोमोटिव्ह नवनिर्मितीतील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला प्राधान्य मिळत आहे. त्यात औरंगाबाद हे ठिकाण दळणवळणाच्या दृष्टिने सोयीचे असल्याने लॉजिस्टिकच्या दृष्टिने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. या एका प्लांटमुळे इथे इतर कंपन्याही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतात. औरंगाबाद जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात असल्याने त्यांना दळणवळणासाठी चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. उद्योजकांना ज्या सोयीसुविधा हव्या असतात, त्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कनेक्टिव्हिटी! समृद्धी महामार्ग हे त्याचे उत्तम उदाहरण ठरणार आहे. या एका महामार्गाच्या माध्यमातून उद्योजकांना मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
औरंगाबादमधील या फॅक्टरीमधून दरवर्षी १० लाख स्कूटर आणि बॅटरी पॅकची निर्मिती केली जाणार आहे. या प्लांटमुळे फक्त इलेक्ट्रिक मोबिलिटी या क्षेत्राला चालना मिळणार नाही; तर यामुळे राज्यभरात वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. ही गुंतवणूक म्हणजे उद्द्योगांना अनुकूल आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या धोरणांना पोषक वातावरण दाखवणारी गुंतवणूक आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औद्योगिक वाढीच्या धोरणांशी सुसंगत असणारी गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक महाराष्ट्राच्या ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी’ क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावेल.