क्रीडागाथा

विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेटपटूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान!

भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकून इतिहास रचला आणि संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला. या महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सत्कार सोहळ्यातून केला. या सोहळ्यातून मुख्यमंत्र्यांनी विजेत्या खेळाडूंचा गौरव तर केलाच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील तरुण पिढीला क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली. हा गौरव सोहळा राज्य सरकारच्या क्रीडा संस्कृतीच्या संवर्धनासाठी वचनबद्धतेचा आणि खेळाडूंच्या परिश्रमांची कदर करणारा ठरला.

विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील खेळाडूंचा सन्मान

राज्य सरकारच्या २०१२ च्या क्रीडा धोरणानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर रोख पारितोषिके दिली जातात. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचा रोख पारितोषिक देऊन सन्मान केला. नवी मुंबई येथे २ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवत इतिहास रचला आणि पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या अभूतपूर्व कामगिरीनंतर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघातील महाराष्ट्रातील विजयी खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याची घोषणा केली. या घोषणेनुसार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव आणि महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा सत्कार केला. स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी २ कोटी २५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले, तर प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना २२ लाख ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच संघाच्या इतर सहकाऱ्यांनाही प्रत्येकी ११ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सन्मान

या गौरव सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचे कौतुक करत, संघभावना, मेहनत आणि परस्पर सहकार्यामुळेच या संघाने इतिहास घडवल्याचे नमूद केले. भारतीय संघातील महाराष्ट्राच्या या तिन्ही खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय खेळ केला. जेमिमाच्या उपांत्य सामन्यातील शतकामुळे संघाला अंतिम फेरी गाठता आली. स्मृती मंधाना आज भारतातील सर्वात आयकॉनिक खेळाडूंपैकी एक असून तिचा प्रवास प्रेरणादायी आहे. राधा यादवने संघर्षातून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, तर प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी संघासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या प्रशिक्षणातील योगदान उल्लेखनीय आहे. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष यांचेही अभिनंदन केले. महिला क्रिकेटला स्वतंत्र दर्जा आणि नवी ओळख मिळवून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत मिळालेल्या या विजयामुळे देशातील लाखो मुलींना क्रीडा क्षेत्रात वाटचाल करण्याची प्रेरणा मिळेल. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारच्या क्रीडा धोरणानुसार देण्यात आलेल्या या पारितोषिकांमुळे खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना प्रेरणा मिळते. महिला क्रिकेटपटूंचा गौरव केल्याने महाराष्ट्रातील युवक-युवतींमध्ये क्रीडाप्रेम वाढेल आणि राज्याचे नाव देश-विदेशात उज्ज्वल होण्यास मदत होईल. राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे खेळाडूंचा योग्य सन्मान होत आहे. तसेच त्यांना पुढील स्पर्धांसाठी नवी ऊर्जा मिळत आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *