देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आले आहेत. ज्या प्रकल्पांनी मुंबई शहराचा चेहरा बदलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी तर आहेच; पण त्याचबरोबर ते जागतिक पातळीवरील एक महत्त्वाचे शहर देखील आहे. मुंबईची महानगरपालिका ही भारतातील सर्वांत जुनी महानगरपालिका आहे; जिची स्थापना इंग्रजांनी केली होती. तर अशा मुंबईच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू यांसारख्या मोठमोठ्या प्रकल्पांना गती दिली. या प्रकल्पांमुळे मुंबईचे कनेक्टिव्हिटी नेटवर्क मजबूत झाले आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्यातील अंतर कमी झाले आहे. मुंबई आणि नवी मुंबई ही दोन महत्त्वाची ठिकाणे अटल सेतूमुळे जवळ आली आहेत. या दोन महत्त्वाच्या शहरांबरोबरच आता नवीन तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीची तयारी सुरू झाली आहे. ही तिसरी मुंबई फ्युच्युरिस्टिक स्वरूपाची असणार आहे. अशा या दोन्ही मुंबईतील विविध प्रकारच्या विकास प्रकल्पांमुळे मुंबईच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळत आहे.
मुंबईसाठी कायम कटिबद्ध!
ज्या शहरांनी पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्या. त्या शहरांची प्रगती झाली. त्याच धर्तीवर मुंबईचा चेहरा बदलत आहे. मुंबईच्या विकासात इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल खूप महत्त्वाचा आहे. सध्या मुंबईच्या अनेक भागांमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी डबलडेकर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. ज्यामुळे मुंबईकरांची ट्रॅफिकच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. मुंबईतील अंतर्गत रस्त्यांपासून मुंबईतून बाहेर पडण्याचे अनेक नवीन मार्ग तयार होत आहेत. मुंबई कात टाकत असून येणाऱ्या काही वर्षांत मुंबई खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर दिसू लागणार आहे. मुंबईच्या या बदलामागे इन्फ्रामॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी कामी येत आहे.
मुंबईचा विकास आराखडा २०१४-३४ याला देवेंद्र फडणवीस सरकारने २०१८ मध्ये मान्यता दिली. मुंबईच्या विस्ताराचा सखोल विचार करून त्याला मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन इथल्या नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांमध्ये वाढ करणे, वाहतूक व्यवस्था सुधारणे, शहरातील नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे, जमिनीचा वापर नियोजन पद्धतीने करणे आदी गोष्टींचा यात समावेश करण्यात आला आहे.
मुंबई इन ५९ मिनिट्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मुंबई इन ५९ मिनिट्स’ या संकल्पनेनुसार मुंबईतील कोणत्याही भागातून ५९ मिनिटांत दुसऱ्या भागात पोहोचता येईल यासाठी मेट्रो, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक प्रकल्प राबवले जात आहेत. लवकरच मेट्रोच्या तीन नवीन लाईन्स सुरू होण्याची अपेक्षा आहे. तसेच दरवर्षी किमान ५० किमी मेट्रो मार्गिका कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. मंडाले येथील मेट्रो प्रशिक्षण संस्था केवळ मुंबई आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशातील मेट्रो प्रकल्पांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मुंबईच्या सर्वांगीण आणि आधुनिक विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ५० हजार कोटींहून अधिक निधीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई मेट्रो प्रकल्प, मुंबई रेल्वे मार्ग विस्तार, लोकल रेल्वेचे नेटवर्क, नवीन रेल्वे कॉरिडॉर आणि मुंबई उच्च न्यायालय नवीन संकुलाचा समावेश आहे. याचबरोबर मुंबईला लागून असलेला ठाणे रिंग मेट्रो, तसेच ठाणे ते नवी मुंबई विमानतळ यादरम्यान उभारण्यात येणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग या निर्णयांमुळे मुंबईत येणारी आणि मुंबईतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था अधिक जलद होणार आहे.
सर्व मुंबईकर एसी रेल्वेतून प्रवास करणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या (एमयूटीपी) टप्पा ३ आणि ३ए अंतर्गत मुंबईसाठी २६८ नवीन एसी रेल्वे गाड्या खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. या ट्रेन मेट्रोप्रमाणेच बंद दरवाज्याच्या असणार आहेत. तसेच या नवीन एसी गाड्यांसाठी प्रवाशांना जादा तिकीटदेखील द्यावे लागणार नाही. टप्प्याटप्प्याने जुन्या रेल्वे गाड्या हटवून त्याजागी नवीन एसी रेल्वे गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मुंबई सुरक्षित
२००८ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारने मुंबईत सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची घोषणा केली होती. पण २०१४ पर्यंत ही घोषणाच राहिली. २०१४ नंतर मात्र राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांत ८०० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देत सीसीटीव्ही प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी व्यापक स्वरूपात मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय घेतला होता. २०१८ मध्ये सीसीटीव्हींची संख्या वाढवून ९८० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. त्याचबरोबर डायल १०० या प्रकल्पाला प्राधान्य देत मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची पाऊले उचलली. २०१८ नंतर २०१९ मध्ये सीसीटीव्हीच्या यंत्रणेचा आणखी विस्तार करत मुंबईत साधारण एकूण १० हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला गेला. पूर्वीच्या ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत आणखी ५६२५ सीसीटीव्हींची वाढ करून त्यासाठी ३२३.२३ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली होती.
प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर गुन्हे तपास कक्ष
वाढत्या इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या वापरामुळे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र सायबर गुन्हे तपास आणि प्रतिबंध कक्ष स्थापन करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला होता. मुंबई पोलीस दल अंतर्गत मुंबईतील ५ प्रादेशिक विभागांमध्ये तब्बल ९३ पोलीस ठाणी असून बीकीसीमध्ये स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन आहे. या स्पेशल सायबर कक्षातून सायबर गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जात आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने या यंत्रणेत आता मोठ्या प्रमाणात सुधारणा करून पोलिसांना अत्याधुनिका यंत्रणा, लॅब उपलब्ध करून दिली आहे. ज्याद्वारे मुंबई पोलीस आर्थिक सायबर क्राईमवर बारीक लक्ष ठेवून आहे.
मोबाईल मेडिकल युनीट सेवा
मुंबई आणि मुंबईकरांचे आरोग्य स्वास्थ्य व्यवस्थित राहावे यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने २०१८ मध्ये मुंबईसाठी मोबाईल मेडिकल युनीट सेवा सुरू केली होती. मोबाईल मेडिकल युनीटच्या माध्यमातून प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्स, लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्टची सुविधा पुरविण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य सेवांपासून वंचित लोकांना प्रतिबंधात्मक उपचारात्मक आरोग्य सेवा प्रत्येक वॉर्ड आणि वस्तीसाठी सुरू करण्यात आली होती. या मोबाईल मेडिकल युनीटच्या माध्यमातून कुटुंब नियोजन, प्रसूतीपूर्व आणि प्रसुतीपश्चात माता व बालसंगोपन, लसीकरण, साथरोग नियंत्रण, समुपदेशन आदी राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जात होती.
इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्सपोर्ट मॉडेलमध्ये सुधारणा
मुंबई मेट्रो
देवेंद्र फडणवीस हे २०१४ मध्ये मुख्यमंत्री होण्यापूर्वी मुंबईत ११ किमीची फक्त एकच मेट्रो लाईन सुरू झाली होती. पण २०१४ नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर मेट्रो लाईन २ए, २बी, ३, ४, ५, ६, ७ अशा विविध मार्गावरील लाईन्स सुरू झाल्या आहेत. यामुळे मुंबई कनेक्टिव्हीटी लेव्हल वाढली आहे. त्याचबरोबर या मेट्रो मार्गांमुळे रस्त्यावरील ट्रॅफिक कमी होऊन प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.
कोस्टल रोड
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाला लागणाऱ्या मंजुरी, परवानग्या मिळाल्याने हा रस्ता बहुतांश पूर्ण झाला आहे. कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सागरी सेतू यांना जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाचे जानेवारी २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कोस्टल रोडमुळे मुंबईच्या लौकिकात तर भर पडलीच आहे. पण त्याचबरोबर या रस्त्यामुळे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगर यांच्यात कनेक्टीव्हीटी तयार झाली आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक
भारतातील सर्वांत मोठा समुद्री मार्ग मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी २०२४ रोजी झाले. हा पूल एकूण २१.८ किमीचा आहे. त्यातील १६.५ किमीचा मार्ग हा समुद्रावरून गेला आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन प्रमुख शहरांना जोडणारा हा एक महत्त्वाचा सेतू ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ला मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१५ मध्ये जपानचा दौरा करून या प्रकल्पासाठी निधी आणला. त्यानंतर एमटीएचएल रस्त्यासाठी लागणाऱ्या केंद्र सरकारच्या, पर्यावरण विभागाचाच्या परवानग्या आणून २०१८ मध्ये याचे काम सुरू केले होते.
सांताक्रूज – चेंबूर लिंक रोड
मुंबईच्या ईस्ट-वेस्ट या वाहतूक मार्गावर निर्माण होणाऱ्या ट्रॅफिकवर मार्ग काढण्यासाठी बांधण्यात आलेल्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचे उद्घाटन १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या लिंक रोडवर दक्षिण आशियातील पहिला केबल स्टेड ब्रिज उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील अत्यंग गर्दीच्या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. या लिंकरोडमुळे वाकोला, बीकेसी आणि एलबीएस मार्गावरील ट्रॅफिक कमी होणार आहे. तसेच यामुळे वाहनचालकांचा १५ ते २० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
पुनर्विकास प्रकल्पांना गती
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बीडीडी चाळ, पत्राचाळ, धारावी झोपडपट्टी आणि इतर वसाहतींच्या पुनर्विकासाला गती देण्याचे काम केले. वरळी बीडीडी चाळीतील हजारो घरांचे पुनर्वसनाचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय नायगाव, जोशी मार्ग, गोरेगाव आणि इतर भागांमध्येही पुनर्वसन प्रकल्प वेगाने सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाला या पुनर्वसन प्रकल्पाचे नोड्ल एजन्सी अधिक परिणामकारक आणि नागरिकांना परवडणाऱ्या गृहनिर्माण संधी निर्माण करण्यासाठी त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.
धारावी पुनर्वसन हा मुंबईच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत हजारो उद्योग सुरू आहेत, आणि या भागाचा पुनर्विकास करून त्याला आधुनिक व व्यवस्थित स्वरूप देण्याचा उपक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरु झाला आहे. येणाऱ्या काही वर्षांत धारावी स्लम फ्री मुंबईकडे वाटचाल करेल आणि येथे सुमारे दहा लाख लोकांना चांगली घरे तसेच विविध सुविधांचा लाभ मिळेल. धारावीचे झोपडपट्टीच्या रुपातून अधिकृत, नियोजित भागात पुनर्वसन होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण झाले. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. बीकेसीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ६ एक्झिटपैकी ५ एक्झिट पूर्ण झाले आहेत. राहिलेला एक सुद्धा डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. एकूण, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या पायाभूत सुविधा, वाहतूक, पुनर्वसन आणि शहरी नियोजनातील महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीपणे राबवले गेले असून या सर्वांच्या माध्यमातून मुंबईचे भविष्य अधिक सक्षम, सुव्यवस्थित आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून उभे राहण्याच्या मार्गावर आहे.