“नमस्कार मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस!”
काल-परवा नागपुरातील विकासकामांच्या एका भूमिपूजन सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी हे म्हणताच, टाळ्यांचा कडकडाट झाला. दि. ८ मार्च, २०२४ रोजी जागतिक महिला दिनाच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारने आपले महिला धोरण जाहीर (Mahila Yojana Maharashtra) केले. त्याबद्दल माहिती देताना देवेंद्रजी म्हणाले, “मी पूर्वी माझे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस लिहायचो, परंतु, नव्या महिला धोरणामुळे आता माझे नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असे असणार आहे.” त्यामुळे निश्चितच उपस्थित मातृशक्तीला आनंद झाला.
जगभरानेच वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या पितृसत्ताक कुटुंबपद्धतीचा स्वीकार केल्याने कुटुंब निर्वाह करणाऱ्या वडिलांना जे स्थान आहे, ते कुटुंब सांभाळणाऱ्या आईला मात्र आजवर मिळाले नाही. आपले पूर्ण नाव लिहितानासुद्धा आपण फक्त वडिलांचेच नाव लिहितो. परंतु, आपल्या जन्मापासून ते आपले संगोपन करणे, आपल्याला सुसंस्कारित करणे, यात आईचे समान योगदान असते, किंबहुना ते पित्याहून अधिकच असते. परंतु, वर्षानुवर्षांच्या समाजव्यवस्थेतील त्रुटींमुळे महिलांना कुटुंबात काहीसे दुय्यम स्थान मिळते. त्यांना गृहीत धरले जाते. परंतु, २१व्या शतकात स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कुठेही कमी नसल्याचे सिद्ध झालेले असताना, समाजजीवनातही काही सकारात्मक बदल घडायला हवे होते, याची सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात नवे महिला धोरण लागू करून केली. बालवयातच वडिलांचे छत्र गमावलेले देवेंद्रजी आपल्या आईच्याच मायेच्या पंखाखाली घडले, कर्तृत्ववान झाले. मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनल्यावर अन्य मातांप्रमाणे देवेंद्रजींची आईसुद्धा आनंदविभोर होऊ शकली असती. परंतु, देवेंद्रजींची मुख्यमंत्री पदासाठी निवड झाल्याचे कळाल्यावर सरिताताई फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया आजही महाराष्ट्र विसरला नाही. त्यावेळी सरिताताई फडणवीस म्हणाल्या होत्या, “मुख्यमंत्रिपदाचे मुकुट काटेरी असते रे बाबा, त्या जबाबदारीचे नीट निर्वाहन कर आणि आपल्या निष्कलंक प्रतिमेला डाग लागू देऊ नकोस.” आदर्श पुत्र देवेंद्रजींनीही आईचा शब्द सार्थ करत ५ वर्षे अनेक संकटांवर मात करत निष्कलंक आणि उत्तम राज्यकारभार केला.
देवेंद्रजींनी आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी महिला सन्मान आणि महिला सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय तळमळीने घेतल्याचे दिसून येते. “माझ्या माता-भगिनी कधी पैसे बुडवूच शकत नाही” असे छातीठोकपणे सांगत देवेंद्रजींनी महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात अर्थसाहाय्य पुरवत २०१४-२०१९ या काळात बचत गटांची संख्या ५० हजारांहून ३ लाखांवर नेली. निराधार महिलांसाठी ‘शक्तिसदन’ निर्माण करण्याचा निर्णय घेतला, महिलेच्या नावाने घर असल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्के सवलत जाहीर केली. मुंबईसारख्या महानगरपासून ते गडचिरोलीतील एखाद्या सीमांत गावापर्यंतच्या सर्व माता-भगिनींना सर्वात मोठी भेट म्हणजे एसटी बस तिकिटात ५० टक्के दिलेली सवलत. देवेंद्रजींच्या या निर्णयामुळे महिला वर्ग आनंदित तर झालाच, पण लालपरीही नफ्यात आली.
देवेंद्रजी हे केवळ एका त्यागमूर्ती मातेचे सुपुत्र नसून ते एका गोड कन्येचे पितासुद्धा आहेत. त्यामुळे एका पित्याची आपल्या कन्येवर असलेली माया ते जाणतात. म्हणूनच देवेंद्रजींनी गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लेक लाडकी’ योजना (Mahila Yojana Maharashtra) जाहीर करत महाराष्ट्रातील प्रत्येक कन्येला जन्म होताच लखपती बनविले. सर्वच नेते महिला स्वातंत्र्याच्या गप्पा मारतात, परंतु, देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पत्नी अमृता फडणवीसांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिले. प्रसंगी राजकीय नुकसान सहन करूनही त्यांनी आपल्या पत्नीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे खंबीरपणे संरक्षण केले. त्यामुळे मंत्रालय ते घर सर्व आघाड्यांवर देवेंद्रजींनी नारीशक्तीचा सदैव सन्मान करत तिला बळ दिले.
अर्थात, महाराष्ट्रातील लेकी-बहिणींसाठी एवढे काम करूनही जेव्हा काही राजकीय फूस लावलेल्या माणसांकडून देवेंद्रजींना आई-बहिणीवरून शिवीगाळ केली गेली, त्या प्रसंगीसुद्धा देवेंद्रजींनी आपला संयम ढळू न देता, छत्रपती शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या पत्नीची तुलना थेट जिजाऊ माँ साहेबांशी करत महिला सन्मानाचा नवा आदर्श स्थापित केल्याचा दाखला देत मोठ्या मनाने शिवीगाळ करणाऱ्यांची समजूत काढत संयमित आणि सुसंस्कृतपणाचा एक नवा मानबिंदू स्थापन केला. देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनल्यापासून ते आजतागायत त्यांचे राजकीय विरोधक आणि ब्रिगेडसारख्या त्यांच्या मातृ संघटना कायम देवेंद्रजींवर, त्यांच्या कुटुंबावर चिखलफेक करत आल्या आहेत. परंतु, देवेंद्रजींनी मात्र सदैव विषाचा प्याला प्राशन करून महाराष्ट्रातील माता-भगिनींना कायम सन्मानाने जगण्याचे अमृत वाटले आहे आणि पुढेही ते वाटत राहणार. दुर्दैवाने देवेंद्रजींवर आई-बहिणीवरून शिवीगाळ होत असताना स्वतःला स्त्रीवादी म्हणविणाऱ्या माय-माऊली गप्प का असतात, याचे मात्र पुरोगामी विश्वाने चिंतन करणे आवश्यक आहे.