महाराष्ट्राच्या जलविकासाचा आर्किटेक्ट वॉटर मॅन देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे वॉटर मॅन म्हणून परिचित असलेले नेते देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारण आणि पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी केलेले काम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागासाठी क्रांतिकारी ठरले. जलयुक्त शिवार योजना ही दुष्काळग्रस्त भागातील लोकांसाठी संजीवनी ठरली. देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि प्रशासकीय कौशल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून हजारो गावांमधील जलसाठे पुनर्जिवित झाले, आटलेल्या विहिरींना पाझर फुटला, पाणी आले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
२०१४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा चंग बांधला होता. यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या योजना आणल्या. त्या यशस्वीरीत्या राबवल्या आणि त्यातून महाराष्ट्राला पाणी सुद्धा उपलब्ध करून दिले. यात जलयुक्त शिवार योजनेचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील या योजनेच्या यशानंतर इतर राज्यांनीही ही योजना स्वीकारली. जलयुक्त शिवार योजनेबरोबरच मागेल त्याला शेततळे, मराठवाडा वॉटर ग्रीड, साताऱ्यातील माण-खटाव तालुक्यासाठी राबवलेली जिहे-कठापूर योजना, तर ५० – ६० वर्षांपासून प्रशासकीय फेऱ्यात अडकलेले निळवंडे धरण मार्गी लावून देवेंद्रजींनी त्या त्या भागातील पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या. त्यामुळे संबंध महाराष्ट्र त्यांना वॉटर मॅन म्हणून ओळखतो. त्यांनी फक्त योजना जाहीर केल्या नाहीत, तर त्याची काटेकोर अंमलबजावणी करून लोकांना पाणी उपलब्ध करून दिले. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाचे प्रमाण कमी असूनही त्यांनी शाश्वत असे जलस्रोत निर्माण केले. त्यामुळेच वॉटर मॅन देवेंद्र फडणवीस हे नाव आता जलक्रांतीचे दुसरे रुप ठरू लागले आहे. त्यांच्या या कामामळे पाणी हा आता संघर्ष राहिला नाही; तर तो आता महाराष्ट्राच्या विकासाचा स्त्रोत ठरू लागला आहे.