Nagpur National Institute of Cancer : देवेंद्रने उभे केलेले भव्य नॅशनल कॅंसर हॉस्पिटल!

भावना आणि जिद्दीचा संगम.. देवेंद्रने उभे केलेले भव्य नॅशनल कॅंसर हॉस्पिटल!
नागपूरमधील एक १५ वर्षांचा बालक, ज्याचे वडिल कर्करोगाशी झुंज देत होते. वडील आमदार मात्र त्यांनी राजकारणाला कधीच उत्पन्नाचे साधन समजले नाही. त्यामुळे उपचारदरम्यान आपल्या वडिलांची होणारी तगमग, उपचारांच्या खर्चाचे ओझे, तो बालक याची देही याची डोळा पाहत होता; आणि एक दिवस याच महाभयंकर कर्करोगामुळे या बालकाने आपले पिता गमावले.
आपले पिता उपचारांच्या कमतरतेमुळे आपल्यासोबत नाहीत, या वेदनेतून हा बालक जात होता. यावेळी त्याने एक गोष्ट आपल्या मनाशी पक्की केली, ‘एक दिवस याच नागपुरात जगातलं सर्वात मोठं, सर्व सोइ-सुविधांयुक्त असं कॅन्सर हॉस्पिटल उभा करण्याचं!’
पैशा अभावी, उपचाराविना कोणीही पोरकं होणार नाही, ही जिद्द घेऊन तो बालक आयुष्यात कार्य करू लागला. आणि २० वर्षानंतर २०१५ साली त्या बालकाने पाहिलेलं स्वप्न, त्याने केलेला संकल्प त्याने स्वतःच पूर्णत्वास आणला.
तो बालक म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय व सर्वात तरुण मुख्यमंत्र्यांपैकी एक, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
२० वर्षे झटून, रात्रीचा दिवस करून, एन केन प्रकारेन देवेंद्रजींनी २०१५ साली नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले आणि आज संपूर्ण हॉस्पिटल सर्वसामान्य कर्करोग ग्रस्थांच्या सेवेत रुजू झाले; आणि प्रत्येक कर्करोगग्रस्तांच्या कुटुंबियांना कर्करोगाशी लढण्याची हिंम्मत दिली.

देवेंद्रजी संपूर्ण राज्याला आपली स्वच्छ प्रतिमा, प्रशासकीय कौशल्य व राजकीय मुत्सद्दीपणासाठी सुपरिचीत आहे. अर्थात देवेंद्रजींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून व वडील गंगाधरराव फडणवीस यांच्याकडून मिळालेले संस्कार त्यांच्या यशाचा भक्कम आधार आहे. राजकारणासारख्या दलदलीच्या क्षेत्रातही स्वतःच्या अंगाला डाग लागू न देण्याचे धडे देवेंद्रजींनी आपल्या वडिलांकडून गिरवले. देवेंद्रजींचे वडील गंगाधरराव हे दोन वेळा नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते. विदर्भात भाजप (तेव्हाचा जनसंघ) रुजविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. नितीन गडकरींसारखे नेतृत्वही गंगाधररावांनीच घडवले. आणीबाणीच्या काळात ते ११ महिने तुरुंगवासातही होते. भारदस्त व्यक्तिमत्व असलेले गंगाधररावही आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी लोकपरिचित होते.

गंगाधररावांचे निधन झाले तेव्हा देवेंद्रजी अवघ्या १५ वर्षांचे होते. पुढे वडिलांचाच वारसा चालवत ते राजकारणात सक्रिय झाले आणि नागपूरचे सर्वात तरुण नगरसेवक, मग सर्वात तरुण महापौर, मग सर्वात तरुण आमदार असा प्रवास करत थेट तरुण मुख्यमंत्री बनले.

परंतु वडिलांचे कर्करोगाने झालेले निधन देवेंद्रजींना स्वस्थ बसू देत नव्हते. या आजाराने एका आमदाराला एवढा त्रास होत असेल तर सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना किती अडचणींचा सामना करावा लागत असेल, या विचाराने देवेंद्रजींची तगमग होत होती.

संघ स्वयंसेवकांनी एकत्र येऊन ‘संघाचे प्रचारक व राष्ट्रीय मेडिको संघटनेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. आबाजी थत्ते यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष होण्याची संधी देवेंद्रजींना लाभली.
या जबाबदारीच्या माध्यमातून देवेंद्रजींनी सुरुवातीला नागपुरात गोरगरिबांना कर्करोगावर माफक दरात उपचार देणारं इस्पितळ उभारण्यास सुरुवात केली. पुढे देवेंद्रजी पश्चिम नागपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

आमदार झाल्यानंतर देवेंद्रजींनी आपल्या स्वप्नातल्या जागतिक दर्जाच्या कॅन्सर हॉस्पिटलचा प्रस्ताव सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्याकडे मांडला. मोहनजींनीही क्षणाचाही विलंब न करता त्याला संमती दिली. आणि देवेंद्रजी कमला लागले. देवेंद्रजींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅन्सर हॉस्पिटल निर्माणासाठी स्वतःला झोकून दिले. रुग्णालय उभारणीसाठी नागपूर विमानतळापासून १० किमी अंतरावर २६ एकराची जागाही संस्थेने विकत घेतली. या ठिकाणी ७०० बेड्सचे ७ लक्ष चौरस फुटाचे इस्पितळ उभे राहण्यास सुरुवात झाली. त्यापैकी १ लक्ष चौरस फुटाचे बांधकाम पहिल्या वर्षीच पूर्ण झाले.

देवेंद्रजींच्या वेगवान कार्यकुशलतेमुळे आणि त्यांना लाभलेल्या सहकार्यामुळे २०१५ साली जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा हॉस्पिटलच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नामवंत उद्योजक रतन टाटा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी देवेंद्रजी म्हणाले होते, “आमची तर हीच इच्छा आहे की कुणालाही या हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज पडू नये, परंतु असे घडलेच तर त्याला अत्यल्प दारात अत्याधुनिक उपचार मिळावेत”.

नागपूर कॅन्सर इन्स्टिट्यूट हे बाल कर्करुग्णांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल असलेले देशातले पहिलेच कॅन्सर इंस्टिट्यूट आहे. महत्वाचे म्हणजे इथे बालरुग्णांवर निशुल्क उपचार केले जातात. इतकेच नव्हे इस्पितळाच्या परिसरातच रुग्णांच्या परिजनांच्या राहण्याची प्रशस्त व्यवस्थाही केली गेली आहे. त्यामुळे देवेंद्रजींचा हा प्रकल्प केवळ विदर्भच नव्हे तर संपूर्ण मध्य भारतासाठी वरदान ठरला.

राजकारणात कुणी तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतं तर कुणी धनाढ्य कुटुंबाचा वारसा. परंतु देवेंद्रजींसारखा फक्त संस्कारांची शिदोरी घेऊन आलेला कार्यकर्ता अत्युच्य पदावर जाऊन पोचतो तो त्याच्या परिश्रमांमुळे, जनसामान्यांशी असलेल्या बांधिलकीच्या कटिबद्धतेमुळे कोविड महामारीतही जेव्हा अख्खे राज्यसरकार घरात बसून होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढत कोविडग्रस्तांना आणि अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम एकट्या देवेंद्रजींनी केले. पुढे त्यांनाही कोरोनाने ग्रासले असता देवेंद्रजींनी शासकीय इस्पितळातच उपचार घेऊन सामान्यांना महामारीशी लढण्यास प्रेरित केले.

देवेंद्रजी हे सारं करू शकतात कारण त्यांच्याकडे स्वच्छ इमान आणि जनतेच्या दुःखाची जाण आहे. असा नेता अपवादानेच घडतो. त्यामुळे महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने देवेंद्रजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे यातच महाराष्ट्राचं हित सामावलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *