Thane Development Plan : ठाण्यातील वाहतुकीची समस्या कायमची सुटणार

ठाणे शहर आणि परिसरातील वाहतुकीची वाढती गरज भागवण्यासाठी तसेच इथली वाहतुकीची समस्या आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकारने कॉम्प्रिहेन्सीव्ह मोबिलिटी प्लॅन तयार केला. या प्लॅननुसार जलद वाहतूक प्रणालीसाठी ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो सुरू करण्यास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या उपाययोजनेमुळे ठाण्यातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

ठाणे विकास प्रकल्प आणि योजना | Thane Development Plan

ठाणे वाहतूक कोंडी | Thane Traffic Jam in Marathi

ठाणे हे मुंबईजवळील सर्वांत महत्त्वाचे शहर आहे. ठाण्यातील कळवा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदर, कर्जत या भागातील असंख्य नागरिक कामधंदा आणि नोकरीच्या निमित्ताने दररोज मुंबईत येतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून दळणवळणाच्या चांगल्या सोयीसुविधा निर्माण करण्यावर सरकारने नेहमीच भर दिला. मुंबईत मेट्रोच्या प्रोजेक्टचे भूमिपूजन झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे जिल्ह्यातील मेट्रो लाईनला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली होती. त्यातील ठाणे-भिवंडी-कल्याण आणि दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ डिसेंबर २०१८ रोजी झाले. या प्रकल्पासाठी एमएमआरडीए अंतर्गत १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. मेट्रोच्या या लाईनमुळे आणि प्रस्तावित इतर लाईनमुळे भिवंडी आणि कल्याण परिसरातील नागरिकांना जो खडतर प्रवास करावा लागत आहे. त्यातून त्यांची सुटका होण्यास मदत होणार आहे.

ठाण्यातील मेट्रोच्या लाईनबरोबरच मुंबई मेट्रो ४, ४-अ, १० आणि ११ च्या कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील १७४.०१ हेक्टर जागा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या जागेवर कारशेडबरोबरच कमर्शिअल डेव्हलपमेंटसुद्धा केली जाणार आहे. दरम्यान, नवी मुंबईतील अंतर्गत कनेक्टीव्हीटी वाढवण्यासाठी नवी मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक १ च्या बेलापूर ते पेंढार हा ११ किमीचा मार्गही सुरू झाला आहे. या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

ठाणे खाडीतून लवकरच प्रवासी वाहतूक

ठाणे-मीरा भाईंदर, कल्याण या शहरांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ठाणे आणि वसई खाडीतून लवकरच प्रवासी जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान दिली. ठाणे खाडीतून जाणारा हा जलमार्ग 53 क्रमांकाचा राष्ट्रीय जलमार्ग असून त्याची लांबी 145 किमी आहे. त्यासाठी 280 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या जलवाहतुकीमुळे नियमित रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

जलवाहतुकीच्या या नवीन प्रयोगामुळे ठाणे ते गेट-वे ऑफ इंडिया या दरम्यानचा प्रवास एका तासात होऊ शकणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी एकूण ६४५ कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला. यासाठी जेट्टी बांधण्याच्या प्रक्रियेला महाराष्ट्र सागरी मंडळाने सुरूवात केली. ठाण्यातील अंतर्गत जलवाहतुकीचा मार्ग निश्चित झाल्यानंतर ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई असे दोन नवीन जलमार्ग ही निश्चित करण्यात आले. जलवाहतुकीच्या या टप्प्यांना फडणवीस सरकारने हिरवा कंदील दिला.

मुंबई ठाण्यातील 9 जेट्टींना मंजुरी

राज्य सरकारने मुंबई आणि ठाण्यातील जलवाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारने दिलेल्या ९ जेट्टीच्या बांधकामाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये बोरिवली, गोराई, वसई, भाईंदर, विरार, मनोरी, घोडबंदर आणि मालवणी येथील जेट्टींचा समावेश आहे.

वाशी खाडीवर तिसरा पूल

ठाणे आणि मुंबईला जोडणारा वाशीतील खाडीवर सध्या दोन ब्रीज आहेत. त्यातील एक ब्रीज जीर्ण झाला असून तिथे नवीन तिसरा ब्रीज उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. तसेच या ब्रीजसाठी ७७५.५८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याचबरोबर ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने या मार्गावर उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव एमएमआडीएकडे दिला होता. त्यातील एक टप्पा आता पूर्ण झाला आहे; त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे सोडल्यानंतर प्रवाशांना अवघ्या 15 मिनिटांत कळव्याला पोहचता येणार आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपूल पूर्ण, वाहतूक सुसाट

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महापालिकेने उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे दिला होता. त्यानुसार एमएमआरडीएने 2014 पासून या मार्गाचे काम सुरू केले होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे हा भाग सोडल्यानंतर प्रवाशांना अवघ्या 15 मिनिटांत कळव्याला पोहचता येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभहस्ते घणसोली-तळवली उड्डाणपूल, महापे भुयारी वाहनमार्गिका आणि सविता केमिकल्स येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. तसेच ठाणे-बेलापूर रस्ता व राष्ट्रीय महामार्ग-४ ला जोडणारा उन्नत रस्ता व भुयारी मार्गाचे भूमिपूजन केले.

ठाण्याच्या विकासात आता एमएमआरडीएचाही वाटा!

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आपली हद्द वाढवून ती पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील काही गावांपर्यंत वाढवण्यात आली. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० जून २०१९ मध्ये विधानसभेत ठराव मांडून तो मान्य करून घेतला होता. त्यामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून होणारी विकासकामे आणि पायाभूत सोयीसुविधांचे प्रकल्प ठाण्यातही राबविण्यास मान्यता मिळाली. यामुळे ठाणे जिल्ह्यातील भागााचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.

ठाणे जिल्हा प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात प्रथम

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्ह्याने (ग्रामीण) राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2016-17 मध्ये जिल्ह्याला 3,399 घरांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी 3,146 घरे पूर्ण केली. 2017-18 मध्ये 774 लक्ष्यापैकी 521 घरे बांधण्यात आली. तर 2018-19 मध्ये 462 पैकी 443 घरांना मंजुरी मिळाली. अशाप्रकारे ठाणे जिल्ह्याने या योजनेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.

नवी मुंबईसाठी 90 हजार घरांच्या योजनेचा शुभारंभ

ठाणे मतदारसंघात मोडणाऱ्या नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे 90 हजार घरांची गृहनिर्माण योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत तळोजा, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, वाशी ट्रक टर्मिनल, सानपाडा, जुईनगर, खारकोपर येथे घरे बांधली जाणार आहेत. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या 90 हजार घरांसाठी 18 हजार कोटी रुपये सिडकोच्या माध्यमातून खर्च केले जाणार आहेत.

महापालिका क्षेत्रात महिलांसाठी तेजस्विनी बस

मुंबई महापालिकेसह ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी महापालिका क्षेत्रात नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांची वाढती संख्या लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. तेजस्विनी बस योजनेंतर्गत सकाळी 7 ते 11 तसेच सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत सुटणाऱ्या बसमधील सर्व आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंटला मंजुरी

ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारती, मोडकळीस इमारती, पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या इमारती आणि झोपडपट्ट्यांचा मार्ग ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे मोकळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या योजनेचा शुभारंभ २०२३ मध्ये जून महिन्यात झाला होता. इथे पहिल्या टप्प्यात १५०० हेक्टर जागेवर १० हजार घरे उभारली जाणार आहेत.

कुळगाव-बदलापूर आरक्षणात फेरबदल

अंबरनाथ कुळगाव-बदलापूर परिसरातील १३०० चौरस मीटर क्षेत्रावरील मैदानाचे आरक्षण वगळून ती जागा रहिवाशांसाठी उपलब्ध करून देण्यास २ मे २०१७ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कुळगावमधील सर्व्हे क्रमांक ५४ हिस्सा क्रमांक ६ या जमिनीवरील १३०० चौरस मीटर खेळाच्या मैदानाच्या आरक्षणात फेरबदल करून ती जागा रहिवाशी विभागात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ठाणे शहर आणि एकूण संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील विकासकामांसाठी (Thane Development Plan) पुढाकार घेऊन त्यासाठी भरघोस निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे.

इतर लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *