महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जुलै रोजी आपला वाढदिवस सामाजिक जाणिवेचे भान राखत साजरा केला. एक सच्चा महाराष्ट्र सेवक म्हणून त्यांनी त्या दिवशी गडचिरोलीतील महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून सर्वप्रथम महाराष्ट्राला प्राधान्य दिले. त्याचबरोबर त्यांनी पक्ष कार्यकर्ते, सहकारी तसेच हितचिंतकांना विनंती केली की, त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, हारतुरे, भेटवस्तू यावर खर्च करण्याऐवजी त्या पैशांचा उपयोग रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर, गरजू रुग्णांसाठी मदत किंवा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात देणगी स्वरूपात करावा, जेणेकरून गरजू रुग्णांना त्या माध्यमातून मदत करता येईल. ही विनंती केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित राहिली नाही, तर अनेकांनी ती मनापासून स्वीकारली आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला मदतीचा हात पुढे केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयातून त्यांच्या संवेदनशीलतेचे, मानवतावादी दृष्टिकोनाचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते. महाराष्ट्राच्या नागरिकांप्रती असलेली त्यांची आस्था आणि सेवाभाव या कृतीतून प्रकर्षाने दिसून आली. वाढदिवस हा अनेकांसाठी वैयक्तिक आनंदाचा क्षण असतो. पण महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस यांनी तो समाजासाठी उपयोगी पडावा या हेतूने राजकीय पटलावर एक नवीन आदर्श घालून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारण, समाजकारण, उद्योग, चित्रपट या क्षेत्रातील मान्यवरांसह असंख्य सर्वसामान्य नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत केली. यामध्ये राजकीय नेते, मंत्री, उद्योजक, जिल्हा मध्यवर्ती, सहकारी बँका यांच्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांनीही हातभार लावला.
महारक्तदानाचा विक्रम; एकाच दिवशी ७८ हजार पिशव्या रक्त जमा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या आवाहनानुसार, महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यालयाने २२ जुलै या दिवशी राज्यभरात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश सर्व कार्यकर्त्यांना दिले. या समाजपयोगी उपक्रमातून २२ जुलै या एका दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून ७८ हजार रक्त पिशव्या जमा झाल्या आहेत. हा एक विक्रम ठरला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रक्त जमा झाले नव्हते. यापूर्वी शिवसेनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातून २५ हजार रक्त पिशव्या जमा झाल्या होत्या. तो विक्रम मागे टाकत महाराष्ट्र भाजपने ७८ हजाराचा नवीन विक्रम रचला आहे. हा विक्रम एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाला आहे. हा विक्रम समाजासाठी प्रेरणादायी आदर्श ठरणार आहे. हा फक्त विक्रम नाही; तर एवढ्या मोठ्या संख्येने राज्याच्या ब्लड बँकेत जमा झालेले रक्त हे समाजसेवेचे व्रत आहे. यातून अनेक रुग्णांना नवीन जीवन मिळणार आहे. असा उदात्त आणि उदार हेतु ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२५ चा आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. रक्तदानाबरोबरच अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले गेले. काही ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजनही करण्यात आले, जे गरजू आणि दुर्बल घटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षांतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून राज्यातील गरजू आणि गोरगरीब रुग्णांना मदत केली जात आहे. १ जानेवारी २०२५ ते ३० जून २०२५ या सहा महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत १४,६४७ रुग्णांना १२८ कोटी ३ लाख १८ हजार रुपयांची मदत करण्यात आली. आता तर राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू केला आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना स्थानिक पातळीवरच मदत उपलब्ध होत आहे. उपलब्ध माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील ३४८ रुग्णांना २.८९ कोटी, हिंगोली जिल्ह्यातील गरजू रुग्णांना ६ लाख १० हजार, वाशिम जिल्ह्यात ११६ रुग्णांना १ कोटी १४ लाख, अमरावतीमध्ये ६.८२ कोटी रुपये, चंद्रपूर जिल्ह्यात ३७ रुग्णांना ३३ लाख ३६ हजार रुपये, तसेच लातूर जिल्ह्यातील ३८५ रुग्णांना ३.५ कोटींची मदत देण्यात आली. विदर्भात २०१७ पासून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून साधारण ९९ कोटी रुपयांच्या निधीचे गरजूंना वाटप करण्यात आले. अशाप्रकारे काही सूक्ष्म निर्णयातून खूप मोठी कामे मार्गी लागत असतात.
देवेंद्र फडणवीस यांनी २०२५ मध्ये आपला वाढदिवस साजरा करताना दाखवलेले समाजभान, संवेदनशीलता आणि लोकसेवेची नितांत निष्ठा हे त्यांच्या नेतृत्वाचे खरे प्रतिबिंब आहे. त्यांनी स्वीकारलेली ही भूमिका समाजासाठी आदर्शवत ठरली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला मिळालेली कोट्यवधी रुपयांची देणगी, एका दिवसात ७८ हजार रक्तपिशव्यांचे संकलन आणि राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या आरोग्य उपक्रमांमधून त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या सामाजिक जाणीवेचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या या कृतीमुळे राजकीय नेते हा फक्त प्रशासनाचे प्रतिनिधी न राहता, समाजाचे खरे मार्गदर्शक आणि सेवक ठरू शकतात, हे दिसून आले. या उपक्रमातून तयार झालेली सकारात्मकता आणि प्रेरणा ही निश्चितच इतर नेत्यांसाठी आणि नागरिकांसाठी अनुकरणीय आहे.
संबंधित लेख: