२०१४ च्या निवडणुकीत ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ ही घोषणा राज्यभरात उत्स्फूर्तपणे घुमली आणि पाच वर्षांच्या कारकीर्दीत ती सार्थदेखील ठरली. देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात ज्या काही योजना सुरू झाल्या, पायाभूत सोयीसुविधा निर्माण झाल्या आणि एकूणच राज्यात जी काही प्रगती झाली. ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. पण राज्याच्या मुख्यमंत्री पदाबरोबरच देवेंद्रजी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीही आहेत. ते २००९ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघाबरोबर त्यांची नाळ घट्ट विणली आहे. ते मतदारसंघात आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. आज आपण त्यांच्या मतदारसंघातील विविध कामांची ओळख करून घेणार आहोत.
Nagpur South West Assembly Constituency Development
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी २०१४ मध्ये थेट राज्याचा मुख्यमंत्री झाला. त्यांच्याकडे राज्यमंत्री, मंत्री असा कोणताही अनुभव नसताना राज्याचे मुख्यमंत्री पद आले. पण देवेंद्रजींनी संयमाने हे पद लिलया पेलले आणि संपूर्ण राज्याचे ते आदर्श नेते बनले. एका मतदारसंघाचा, शहराचा आदर्श लोकप्रतिनिधी आता संपूर्ण राज्याचा आदर्श नेता ठरला. पण त्यांची आपल्या मतदारसंघावरील, शहरावरील माया तसूभरही कमी झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरसाठी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आणली. आयआयएम आणले. मिहानमध्ये एम्ससारखी नामांकित वैद्यकीय संस्था आणली. त्यानंतर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारली. नागपूर शहराबरोबरच देवेंद्रजींनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात बरीच कामे मार्गी लावली. यासाठी भरघोस निधी देखील उपलब्ध करून दिला. जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी दूर केल्या. मतदारसंघातील जमिनींच्या पट्ट्यांचे, मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वाटप केले. २०१८ मध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसाने नागपूरला पुराने वेढले होते. त्यावेळी नरेंद्रनगरचा अंडरब्रीज देखील पाण्याखाली गेला होता. मेट्रोच्या दोन्ही बाजुला असलेल्या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते. त्यावेळी देवेंद्रजींनी मतदारसंघातील नागरिकांना दिलासा देत सर्वतोपरी मदत केली होती.
झोपडपट्टीवासियांना पट्ट्यांचे वाटप
देवेंद्र फडणवीस यांनी वीस वर्षांपूर्वी शहरांमधून राहणाऱ्या झोपडपट्टीवासियांना जमिनीचे पट्टे लीजवर देण्याचे स्वप्नं पाहिले होते. हे स्वप्नं देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पूर्ण झाले. त्याची सुरूवात त्यांनी नागपूरपासून केली. नागपूरमधील ५ हजारांहून अधिक झोपडपट्टीधारकांना ३० वर्षांच्या लीजवर पट्टे दिले. त्याची सरकार दरबारी नोंद देखील करण्यात आली. त्यानंतर ही योजना राज्यभर लागू करण्यात आली. देवेंद्रजींनी नागपूर शहराचे सर्वेक्षण करून शहरातील झोपडपट्ट्या शोधून, सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी योजना तयार केली. या योजनेंतर्गत झोपडपट्टीमधील रहिवाशांसाठी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून सरकारकडून जमिन मिळवून तिथे घरे बांधण्याची योजना तयार केली. त्यानुसार देवेंद्रजींनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील तुकडोजीनगर, कामगार कॉलनी झोपडपट्टीपासून सुरूवात केली. यासाठी नागपूरमधील नागरिकांसाठी एक खिडकी यंत्रणा उभारली. या अशा धोरणात्मक योजनांमधून देवेंद्रजींनी मतदारसंघातील मतदारांना दिलासा दिला.
अटल आरोग्य महाशिबिर
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघासह नागपूरमधील नागरिकांसाठी २०१८ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. जवळपास आठवडाभर (२१ ते २६ ऑक्टोबर २०१८) चाललेल्या या शिबिरात देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर ज्या रुग्णांना विशेष उपचाराची गरज असल्याचे आढळून आले. अशा रुग्णांची २८ ऑक्टोबर रोजी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ४२ हजार १५५ रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. १८७ ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त महिलांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर १५०० नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. तसेच हृदयरोग, मेंदूरोग, कर्करोग आदी शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ४५० पेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध होती.
वॉटर एटीएम
मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मेसर्स पर्नाड रिकार्ड इंडिया कंपनीच्या मदतीने सीएसआर फंडातून नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात वॉटर एटीएम लावण्यात आले होते. हे वॉटर एटीएम स्थानिक महिलांद्वारे चालविण्यात येणाऱ्या बचत गटाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यातून सर्वसामान्यांना ५ रुपयांत २० लीटर शुद्ध पाणी दिले गेले. हे वॉटर एटीएम खाली नमूद केलेल्या बचतगटांना देण्यात आले होते.
- उज्ज्वला महिला बचत गट – जोगी नगर येथे रिंग रोडजवळ दशरथ पाटील वाचनालय मनपा परिसर
- सरगम महिला बचत गट – मौजा बाबुलखेडा ख.क्र. ४५/४६ बॅनर्जी लेआऊट, भगवान नगर
- प्रज्ञाशील महिला बचत गट – राजीव गांधी उद्यान त्रिमूर्ति नगर रिंग रोड
- सत्यम महिला बचत गट – जयताळा डिफेन्स लॅण्ड नागपूर बाजार जवळ
- अनुसया महिला बचत गट – तिरुपती मैदान सोमलवाडा नागपूर
- महाबोधी महिला बचत गट – आयसोलेशन हॉस्पिटल मेन रोड
- अंश महिला बचत गट – पांढराबोडी पोलीस चौकीची मोकळी जागा
- महाप्रभा महिला बचत गट – रहाटे नगर टोली येथील इंदप्रस्त को. ऑप. हाऊसिंग सोसायटी व सेंट्रल रेल्वे को.ऑप. हाऊसिंग सोसायटी परिसराचे मोकळे मैदान
- कल्याणी महिला बचत गट – मौजा सोमलवाडा ख.क्र. ५२/२, ८०/१-५ संताजी को.ऑप. हौसिंग सोसायटी
- अष्टांग महिला बचत गट – सुंदरबन कॉली येथील शाखा मैदान
- सौम्या महिला बचत गट – सोनेगाव वस्ती, दुर्गा माता मंदिर समोर, समाजभवन, नागपूर
- राजानालंदा महिला बचत गट – मनपा शाळा मैदान, एकात्मता नगर
- माऊली महिला बचत गट – खामला जुनी वस्ती, सरकारी मोकळे मैदान
- देवांश महिला बचत गट – इंदिरा नगर नं.३, रमेश किराणा स्टोअर्सजवळ
- आदर्श महिला बचत गट – चुनाभट्टी, राहुलनगर, अजनी, स्लम वसाहत, नागपूर
समाधान शिबिर
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी समाधान शिबिर राबवले होते. या शिबिराच्या माध्यमातून सरकारच्या विविध विभागाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या गेल्या. त्याचबरोबर नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली होणार नाही, यासाठी देवेंद्रजींनी समाधान शिबिराच्या माध्यमातून लोकांना सर्वतोपरी मदत केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजींनी सर्वप्रथम ३० मे २०१५ रोजी समाधान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १९ ते २५ मे २०१५ या दरम्यान लोकांच्या तक्रारी समजून घेण्यात आल्या. या पहिल्या समाधान शिबिरात एकूण १३३४ तक्रारींवर फडणवीस यांच्याकडून कार्यवाही करण्यात आली.
जुलै २०१६ मध्ये नगर भूमापन विभागाशी संबंधित आलेले अर्ज/तक्रारी याविषयी ११ ते १६ जुलै २०१६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. यात एकूण १२३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नागपूर महानगरपालिका क्षेत्रात ९ ते २७ ऑगस्ट २०१६ या कालावधीत झोननिहाय शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये ६५,०४१ अर्जांवर काम करण्यात आले. एप्रिल २०१८ मध्ये चौथे समाधान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १०,२१४ अर्ज निकाली काढण्यात आले. अशाप्रकारे देवेंद्रजींनी मतदारसंघातील सर्व घटकांतील नागरिकांना न्याय मिळेल यादृष्टिने प्रयत्न केले.