मेट्रो मॅन

मुंबई मेट्रो: देवेंद्र फडणवीस सरकारचे महामुंबईत ३३७ किमीचे जाळे

लोकवस्ती आणि माणसांनी गजबजलेल्या मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतुकीवरील ताण यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पर्यावरणपूरक मुंबई मेट्रो योजना हा एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. मुंबईची ही गरज लक्षात घेऊन तिचा नैसर्गिक समतोल राखून भविष्यातील हरित सार्वजनिक प्रवासी सेवा म्हणून मेट्रोमॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३३७ किलोमीटर लांबीच्या मुंबईतील १४ मेट्रो लाईनचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यातील ८० किमीच्या ४ मेट्रो लाईन सुरू झाल्या असून, येत्या १० वर्षात मुंबईत मेट्रोचे एक मोठे जाळे निर्माण होईल. यामुळे मुंबईकरांना जलद आणि किफायतशीर असा वाहतुकीचा नवीन पर्याय उपलब्ध होत आहे.

मुंबई मेट्रो प्रगती

मुंबईत संपूर्ण भूमिगत मेट्रोसह ४ लाईन सुरू

एकूण ३३७ किमीपैकी मुंबईत जवळपास ८० किमी लांबीच्या चार मेट्रो लाईन्स सुरू झाल्या आहेत. त्यात मेट्रो १ घाटकोपर ते वर्सोवा, मेट्रो २ ए दहिसर ते अंधेरी पश्चिम, मेट्रो ७ दहिसर ते गुंदवली आणि मेट्रो ३ आरे ते कफ परेड या लाईनचा समावेश आहे. यातील मेट्रो ३ अ‍ॅक्वा लाईन ही मुंबईतील पहिली पूर्ण भूमिगत मेट्रो आहे. मुंबईतील पहिली मेट्रो, मेट्रो १ ही जून २०१४ मध्ये सुरू झाली होती. या ११.४ किमी लांबीच्या मेट्रो लाईनसाठी तब्बल ११ वर्षांचा कालावधी लागला. पण २०१४ नंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर मुंबईतील पुढील मेट्रो प्रकल्पांच्या कामांना गती मिळाली. साधारण २०१६ मध्ये मेट्रो २ए आणि मेट्रो ७ च्या कामास सुरुवात झाली. मेट्रो ३ आणि मेट्रो ६ विक्रोळी प्रकल्प या लाईनची कामे २०१७ मध्ये सुरू झाली. तर मेट्रो ४ वडाळा ते ठाणे आणि २ बी यांची कामे अनुक्रमे २०१८ आणि २०१९ मध्ये सुरू झाली. तर काही लाईनची कामे २०२० नंतर हाती घेण्यात आली.

मुंबई मेट्रो योजना

अनेक लाईन्सची कामे प्रगतीपथावर

सध्या मुंबईतील मेट्रोच्या महत्त्वाच्या लाईनवर काम सुरू आहे. त्यात मेट्रो २ बी अंधेरी पश्चिम ते मंडाले, मेट्रो ४ वडाळा ते ठाणे आणि ४ ए वडाळा – ठाणे – कासारवडवली – गायमुख, मेट्रो ५ ठाणे – भिवंडी – कल्याण, मेट्रो ६ (विक्रोळी प्रकल्प) स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी, मेट्रो ७ ए गुंदवली ते मुंबई विमानतळ आणि मेट्रो ९ दहिसर – मिरा रोड – भाईंदर यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांना ठरलेल्या मुदतीपेक्षा अधिकचा वेळ लागला आहे. पण याची कामे आता प्रगतीपथावर आहेत. मेट्रो ९ मधील दहिसर ते काशीगाव हा टप्पा आणि मेट्रो ४ ए मधील गायमूख ते विजय गार्डन हा टप्पा डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मेट्रो ६, ५ आणि ७ ए या लाईनची कामे २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर मेट्रो २ बी, ४, ४ ए, ६, ७ ए आणि ९ या लाईन २०२७ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो ५ चा पहिला टप्पा डिसेंबर २०२६ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय, मेट्रो १२ च्या कामास सुरुवात झाली आहे. लवकरच मेट्रो १०, १४ आणि १४ ए या लाईनच्या कामांना गती मिळणार आहे. मेट्रो ११ आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो लाईनचे देखील काम सुरू केले जाणार आहे. त्यानंतर मेट्रो ८ मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ ही लाईन सिडकोकडून सुरू केली जाणार आहे. हे सर्व प्रकल्प साधारण अजून ८ ते १० वर्षात पूर्ण होऊन ३३७ किमीचे मुंबईत मेट्रो जाळे कार्यान्वित होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पांना गती मिळत असून मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अधिक जलद आणि प्रदूषणविरहित करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मेट्रोचे हे जाळे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील प्रवास खूपच सुखद आणि सुलभ होणार आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि वायुप्रदूषण कमी होणार आहे. यामुळे निश्चितच मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *