राजकारण आणि राजकीय नेते याबाबत समाजात बरेच गैरसमज आहेत. राजकारण म्हणजे नुसती चिखलफेक, सत्ता आणि पैशांचा गैरवापर करणारे क्षेत्र म्हणून बदनाम होत आहे. पण या क्षेत्रात अजूनही प्रमाणिकपणे काम करणारी माणसे आहेत. हे देवेंद्रजींकडे पाहून कळते. देवेंद्रजी हे राजकीय नेते तर आहेतच. पण ते राजकारणातले सुसंस्कृत आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. विरोधी पक्षातील नेतेही देवेंद्रजींच्या अभ्यासूपणाचे, प्रोग्रेसिव्ह विचारांचे कौतुक करतात. आज तेच देवाभाऊ महाराष्ट्र सेवक म्हणून राज्यातील जनतेची सेवा करत आहेत.
देवेंद्रजींच्या राजकीय सुरूवात सांगायची झाली तर ते वयाच्या २१ व्या वर्षी राजकारणात आले. नागपूर महापालिकेत नगरसेवक या पदापासून कामाला सुरूवात केली. त्यानंतर २७ व्या वर्षी नागपूरचे सर्वांत तरुण महापौर बनले आणि २०१४ मध्ये वयाच्या ४४ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर देवेंद्रजींनी आतापर्यंत महाराष्ट्र सेवक म्हणून आपले कार्य अहोरात्र सुरू ठेवले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे नाव आता एका वेगळ्या उंचीवर गेले आहे. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या नावाचा दबदबा होता. त्यांच्याविषयी अनेकांच्या अजूनही अशाच भावना आहेत. देवेंद्रजी त्यामानाने राजकारणातलं नवीन नेतृत्व. पण या नावानेही आता महाराष्ट्रभर आपला दबदबा निर्माण केला आहे. तसे महाराष्ट्राच्या राजकारणात नेते अनेक झाले. पण देवेंद्रजी त्याला अपवाद ठरत आहेत. ते महाराष्ट्राचे नेते झाले आहेतच. पण त्याचबरोबर आता ते नेत्यांचे नेते देखील झाले आहेत. आज महाराष्ट्रातील कोणताही राजकीय पक्ष घ्या, त्या पक्षातील नेत्यांचे देवेंद्रजीशी मैत्रीचे संबंध आहेत. अनेकवेळा वेगवेगळ्या पक्षातील अंतर्गत कुरबुरी, शिष्टाई यामध्ये समझोता करून आणण्यासाठी देवेंद्रजी मदत करतात. हे नेतेपण महाराष्ट्राने देवेंद्रजींना कसे दिले, याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.
महाराष्ट्र सेवक मा.देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस हे वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी कारसेवेसाठी आयोध्येला गेले होते. त्यानंतर त्यांनी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर विविध भूमिकांमधून महाराष्ट्राची सेवा केली. नव्वदच्या दशकात रामभक्तीच्या सेवेतून देवेंद्रजींनी आयोध्याचा पल्ला गाठला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून संघटनेने त्यांच्यावर श्रीराम मंदिर शिलापूजनाची माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांना कारसेवेत सहभागी करून घेण्याची जबाबदारी टाकली होती. त्यावेळी देवेंद्रजींनी स्वत:ला या कामात वाहून घेतले होते. त्यांनी ३० सप्टेंबर १९८९ मध्ये कारसेवक म्हणून आयोध्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी केलेले काम हे त्यांच्या आयुष्याला प्रेरणा देणारे ठरले. विद्यार्थी संघटनेनंतर त्यांनी पक्ष संघटनेत काम करण्यास सुरूवात केली. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांनी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरूवात केली. त्यानंतर ५ वर्षांनी देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर झाले. नागपुरातील सर्वांत पहिला तरूण महापौर आणि देशातील दुसरा सर्वांत तरूण महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. नागपूरची सेवा केल्यानंतर देवेंद्रजींनी १९९९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला. तेव्हापासून ते आजतागायत नागपूरचे प्रतिनिधित्व विधिमंडळात करत आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला. १९९९ ते आजतागायत म्हणजे २०२४ पर्यंत देवेंद्रजी महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामामुळे महाराष्ट्र एका वेगळ्या उंची वर नेण्यास मदत झाली. त्यातूनच देवेंद्रजींचा कारसेवकापासून सुरू झालेला प्रवास महाराष्ट्र सेवकापर्यंत येऊन ठेपलेला आहे. हा प्रवास असाच पुढे राष्ट्रसेवेसाठी सज्ज होत आहे.
इन्फ्रामॅन
महाराष्ट्राची सेवा करताना देवेंद्रजींनी विविध घटकांवर लक्ष केंद्रीत केले. यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर, त्यांनी उभ्या केलेल्या पायाभूत सोयीसुविधा. जसे की, नागपूर ते मुंबई हा ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग, मुंबईसह नवी मुंबई, नागपूर पुण्यामध्ये विस्तारलेले मेट्रोचे जाळे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच भारतातील सर्वांत मोठा सागरी सेतू (अटल सेतू) , मुंबई कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ ही कामे पाहिली की, देवेंद्रजींमधला इन्फ्रामॅन दिसून येतो. मूलभूत पायाभूत सोयीसुविधांमुळे तिथल्या परिसराचा विकास तर होतोच पण त्या परिसराची इकॉनॉमिक सिस्टिमसुद्धा बदलते. दळणवळणाच्या सुविधांमुळे उद्योगधंद्यात वाढ होते. रोजगार निर्माण होतो. एकूण तिथली आर्थिक गणिते बदलतात. हाच दृष्टिकोन लक्षात घेऊन देवेंद्रजींनी अनेक विकास प्रकल्प सुरू केले आणि ते वेळेत पूर्ण देखील केले. त्यांच्या या कामाच्या झपाट्यामुळेच त्यांना इन्फ्रामॅन ही बिरूदावली लावली जाते.
वॉटरमॅन
इन्फ्रामॅन प्रमाणेच देवेंद्रीजींची वॉटरमॅन अशी देखील ओळख आहे. २०१४ मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्याचवर्षी राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी जलयुक्त शिवार ही क्रांतिकारी योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा विडा फडणवीस सरकारने उचलला होता. अर्थात जलयुक्त शिवार ही निरंतर राबविण्याची योजना आहे. या योजनेमुळे अनेक तालुक्यातील गावे टँकरमुक्त झाली होती. तिथल्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. परिणामी शेतीसाठी आणि पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यानंतर याच योजनेच्या कामातून फडणवीस सरकारने मागेल त्याला शेततळे ही योजना उपलब्ध करून दिल्याने प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वत:चे हक्काची पाणी उपलब्ध होऊ शकले. याचबरोबर मराठवाड्यातील दुष्काळावर कायमचा उपाय करण्याच्या दृष्टिने त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना हाती घेतली. या योजनेंतर्गत मराठवाड्यातील नद्या एकमेकांना जोडून इथला पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यावर काम सुरू आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात कृष्णानदीचे साचणारे पुराचे अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वाहून नेण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. २०२३ मध्ये देवेंद्रजींनी सातारा जिल्ह्यातील खटाव आणि माण या दुष्काळी तालुक्यांसाठी जिहे-कठापूर ही योजना पूर्ण करून तिथल्या भागात पाणी पोहोचवले. या अशा प्रामाणिक कामांच्या माध्यमातून देवेंद्रजींने अनेकांचे प्रश्न मार्गी लावले.
२०१४ ते २०१९ या कालावधीत देवेंद्रजींनी अनेक विषयांवर काम केले. जसे की, सर्वप्रथम त्यांनी राज्य सेवा हमी कायदा आणून राज्यातील जनतेला सेवा मिळविण्याचा हक्क मिळवून दिला. त्यानंतर शेतीसाठी पाणी उपलब्धा व्हावे यासाठी जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना सुरू केली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एक रुपयांत पीक विमा, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे अशा विविध योजनांच्या माध्यमातून देवेंद्रजींनी महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाची सेवा केली. गिरणी कामगार, धारावी पुनर्विकास, बीडीडी चाळ, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास आदी योजनांमधून अनेकांना निवारा उपलब्ध करून दिला.
उत्तम प्रशासक
एक अभ्यासू आणि प्रगल्भ राजकीय नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची अनेक वैशिष्ट्ये आणि बारकावे आहेत. त्यात उत्तम प्रशासक हा एक त्यांच्यातील वाखाणण्याजोगा गुण आहे. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक अधिकाऱ्यांकडून उत्तमरीतीने कामे करून घेतली. या पाच वर्षांच्या काळात त्यांनी प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची वॉर रूम तयार केली होती. त्याचपद्धतीने त्यांनी मुख्यमंत्री फेलोशीपच्या माध्यमातून तरूण युवकांना प्रशासनाच्या कामात जोडून घेतले. अनेकवेळा देवेंद्रजींनी समाजहितासाठी कोणताही मुलाहिजा न ठेवता कठोर निर्णय घेतले आहेत. विचार आणि विकासाची स्पष्टता, निश्चित दिशा आणि कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नसल्यामुळे त्यांची प्रशासनावर उत्तम पकड राहिली आहे.
देवेंद्रजी जितके उत्तम प्रशासक आहेत. तितकेच ते आक्रमक देखील आहेत. आपण बऱ्याचदा पाहतो की, राजकीय नेते हे मुळातच आक्रमक असतात. पण त्या आक्रमकतेला समयसूचकता नसेल तर ती आक्रमकता प्रभावी ठरत नाही. देवेंद्रजींची तीच खासियत आहे. विधिमंडळात असताना देवेंद्रजी नेहमी आक्रमक भूमिकेत असतात. कारण त्यांना तिथे जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यायचा असतो. चुकीच्या गोष्टी खोडून सत्याची कास धरायची असते. यासाठी देवेंद्रजी नेहमीच आग्रही आणि आक्रमक असतात. सत्तेत येण्यापूर्वी म्हणजे २०१४ च्या अगोदर विरोधी पक्षात असताना देवेंद्रजींनी जनतेची बाजू मांडताना सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. २०१४ नंतर त्याच जनतेच्या हिताचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी देवेंद्रजी विरोधकांना चांगलेच फैलावर घेत आले आहेत. तर काही वेळेस त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून राज्य हितासाठी विरोधकांची समजूतदेखील घातली आहे.
सामाजिक न्याय
जन्माने ब्राह्मण कुटुंबात लहानाचे मोठे झालेल्या देवेंद्रजींनी आपल्या राजकीय कारकार्दीत सामाजिक सलोखा आणि समाजातील प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या. सध्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत वादविवाद सुरू आहेत. पण देवेंद्रजींनी याच मराठा समाजाला २०१८ मध्ये मुख्यमंत्री असताना १६ टक्के आरक्षण दिले होते. तसेच हे आरक्षण कायदेशीर लढाई लढून मुंबई उच्च न्यायालयात टिकवलेही होते. त्यानंतर सारथी योजने अंतर्गत मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना, ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व खासगी महाविद्यालयातील अभ्यासक्रमांसाठी अर्ध्या फी ची प्रतिपूर्ती केली. त्याचबरोबर समाजातील ओबीसी, एससी, एसटी या घटकांतील बांधवांसाठी महामंडळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू केल्या.
त्याचबरोबर दिव्यांग, अनाथ, मुंबईचे डबेवाले, गिरणी कामगार आणि महिलांसाठीच्या योजना राबविल्या. २०२३ मध्ये राज्यात प्रथमच दिव्यांग कल्याण मंत्रालय हा विभाग सुरू केला. त्यानंतर अनाथ मुलांना सरकारी नोकरीमध्ये १ टक्के आरक्षण मिळवून दिले. मुंबईच्या डबेवाल्यांसाठी भवन आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. तर मुंबईतील गिरणी कामगारांना परवडतील अशा किमतीत एमएमआरडीए क्षेत्रात घरे बांधून दिली. महिलांसाठी एसटीच्या तिकिटात ५० टक्के सवलतीबरोबरच लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून ६५ वर्षापर्यंतच्या महिलांना वर्षाला १८ हजार रुपयांची भेट देणारी योजना सुरू केली. अशा वेगवेगळ्या माध्यमातून देवेंद्रजींनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
राज्याच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस हे नेहमीच झटत आले आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा, अर्थकारण, वीज, रस्ते, कृषी, वीजपुरवठा, उद्योग, सिंचन या बरोबरच राज्यातील गरीब-सर्वसामान्य, तळागाळातील नागरिकांपर्यंत विकास पोहचवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पोहचविणे, या उदात्त हेतुने देवेंद्रजी महाराष्ट्र सेवक म्हणून काम करत आहेत.