लेखक

राजकारणात साहित्याची ज्योत: गीतकार, लेखक व कवी देवेंद्र फडणवीस

सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदु ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त एक कुशल प्रशासक आणि सक्षम नेता नाहीत, तर एक संवेदनशील कवी आणि गीतकार देखील आहेत. वाचन, संगीत आणि साहित्य यांची त्यांना विशेष आवड आहे. त्यांच्या या अंगभूत कलागुणांचे प्रतिबिंब त्यांच्या लेखणीमधून दिसते. तर आज आपण लेखक, गीतकार देवेंद्र फडणवीस यांच्या या कलागुणांविषयी अधिक जाणून घेणारआहोत.

साहित्यप्रेम, कविता आणि गाण्यांची आवड!

देवेंद्र फडणवीस यांना संगीताची मनापासून आवड आहे. त्यांना दीड हजारांहून अधिक गाणी तोंडपाठ आहेत. प्रवासात ते नेहमी गाणी ऐकतात. त्यामुळे मराठी आणि हिंदी गाणी, कविता या त्यांना सहज आठवतात. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी विधानसभेत ‘मी पुन्हा येईन…’ ही कविता सादर केली होती. या कवितेतून त्यांनी २०१४ ते २०१९ या काळात केलेल्या कामांचा महती आणि त्याच निर्धाराने येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या नव निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, अशी आश्वासक भूमिका मांडली होती. पण २०१९ च्या निवडणुकांनंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडल्यामुळे भाजपाला बहुमत मिळूनही सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यावेळी विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन…’ या कवितेची यथेच्छ राजकीय खिल्ली उडवली. पण प्रत्येक कविता हा त्या कवीचा आत्मविश्वास असतो. त्याच्या भावना असतात. त्या भावनांची पूर्तता नियतीने २०२२ मध्ये पूर्ण केल्याचे आपण सर्वांनी पाहिले. यातील राजकीय टप्पे-टोमणे आपण तुर्तास बाजुला ठेवू आणि ‘मी पुन्हा येईन…’ या कवितेच्या रचना पुन्हा एकदा वाचू… यातून देवेंद्र फडणवीस यांनी जो आत्मविश्वास आणि दूरदृष्टी व्यक्ती केली होती. त्याची पूर्तता टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असताना दिसत आहे.

मी पुन्हा येईन…
याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!

मी पुन्हा येईन…
गावांना जलयुक्त करण्यासाठी
शहरांचा चेहरा बदलण्यासाठी
माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!

मी पुन्हा येईन…
माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम करण्यासाठी
माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!

मी पुन्हा येईन…
याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी
प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत
माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रुप देण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!
मी पुन्हा येईन…

कोणताही कवी शब्दांची मांडणी करताना, त्यात आपल्या भावना आणि अनुभव मांडत असतो. त्या मांडताना त्याच्या मनात फक्त, ताल आणि लय यांचा विचार नसतो. तर त्या कवितेतील शब्दांविषयी आणि परिस्थितीविषयी त्याच्या मनात प्रेम असते, काळजी असते आणि ही परिस्थिती बदलण्याचा ठाम विश्वास असतो. तर हा विश्वास देवेंद्रजींनी ठामपणे मांडून तो पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे.   

अशाच आत्मविश्वासाने २०२१ च्या २७ फेब्रुवारीच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी मुंबई तक या चॅनेलवर कुसुमाग्रजांची ‘नदीमय’ ही सुंदर कविता सादर केली होती. त्याचबरोबर २०२४ च्या २७ फेब्रुवारीच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात विधिमंडळात झालेल्या कार्यक्रमातही उत्स्फूर्तपणे स्वरचित ‘तुमची आमची माय मराठी’ ही कविता सादर केली होती. त्या कवितेचे बोल पुढीलप्रमाणे होते.  

तुमची आमची माय मराठी
या मातेच्या गौरवासाठी
साहित्याची भरुया घागर
भावनेचा जेथे सागर
शब्द खजिना जरी रिती झोळी
मराठीला समर्पित माझ्या ओळी
आपले नाते जशा रेशीम गाठी
गर्वाने म्हणू या…
होय मी मराठी, होय मी मराठी

त्यांच्या या लेखणातून आणि सादरीकरणातून मराठी भाषेवरील प्रेम आणि साहित्यिक जाण स्पष्ट दिसून येते. 

देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरामांविषयी असलेली निस्सीम भक्ती आपल्या शब्दांतून प्रकट केली आहे. २०२४ मध्ये अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्रजींनी ‘राम नाम’ या नावाने राम भजन लिहिले आहे. त्यांचे हे गीत प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले असून, त्यांच्यासोबत अमृता फडणवीस यांनी हे गाणे गायले आहे. या गीतातून देवेंद्रजींनी रामभक्तांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.

त्याचबरोबर त्यांनी भगवान शिवशंकर महादेवावर रचलेले ‘देवाधिदेव महादेव’ हे गीत २०२४ मध्ये महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रसारित करण्यात आले होते. हे गाणे सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस यांनी गायले आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांनी गायलेल्या महामृत्युंजय मंत्राचाही समावेश करण्यात आला आहे. देवाधि देव हे गाणे शंकर महादेवन यांनीच संगीतबद्ध केले आहे. त्यांनी या गाण्याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना नमूद केले आहे की, देवेंद्रजींनी हे गाणे अतिशय सुंदरपणे लिहिले आहे. तर देवेंद्रजी या गाण्याविषयी सांगतात की, त्यांच्या कुटुंबात लहानपणापासून महाशिवरात्री साजरी केली जाते. तेव्हापासून त्यांच्यावर शिवाच्या गुणविशेषांचा आणि शिवपुराणातील कथांचा प्रभाव आहे. त्यातूनच एका प्रवासादरम्यान त्यांना या गाण्याचे शब्द सुचल्याचे ते सांगतात. या दोन गीतांमधून देवेंद्रजींचा भक्तीभाव दिसून येतो. रसिक प्रेक्षकांचीही या गाण्यांनी मने जिंकली आहेत.

साहित्य आणि प्रशासन यांचा समतोल

फडणवीस यांचा साहित्यविषयक दृष्टिकोन प्रशासनाच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाही कायम राहिला आहे. २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी महाराष्ट्र टाईम्स वर्तमानपत्राच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त अतिथी संपादक पदाची जबाबदारी स्वीकारली होती. ही जबाबदारी स्वीकारत त्यांनी राज्याची आणि महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राच्या समांतर वाटचालीचा आढावा घेत ते मुख्यमंत्री झाल्यापासून २ वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्याला भेडसावलेला दुष्काळाचा गंभीर प्रश्न, शेतकऱ्यांवर आलेले संकट, त्यामुळे अस्थिर झालेली अर्थव्यवस्था अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचा ‘प्रगत राज्य’ हा नावलौकिक कसा राखता येईल. यासाठी घेतलेल्या निर्णयांची, प्रयत्नांची माहिती त्यांनी या निमित्ताने मांडली. त्यांनी सर्वसमावेशकता आणि समतोल राखत राज्यातील प्रत्येक घटकाचा विकास कसा साधला जाऊ शकतो, यावर संपादकीयातून आपले विचार स्पष्ट केले. यातून त्यांच्या व्यापक दृष्टीकोनाचे दर्शन घडते.

देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय क्षेत्रात उच्च स्थान मिळवले असले तरीही साहित्य आणि संगीतप्रेमी म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांच्या लेखणीतील भक्तिरस, मराठी भाषेवरील प्रेम आणि समाजाविषयी असलेला व्यापक दृष्टीकोन त्यांच्या लेखन, कविता आणि गीतांमधून सहज प्रकट होतो. त्यांचे लेख, गाणी यांना मिळणाऱ्या प्रतिसादातून त्यांच्या संवेदनशील आणि रसिकमनाचे दर्शन होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *