रामजन्मभूमि निर्माणासाठी देवेंद्रजींनी केलेल्या कारसेवा! | Devendra Fadnavis Karseva

उत्तर प्रदेशमधील अयोध्येत जिथे प्रभू रामाचा जन्म झाला होता. त्या जागेवर पाचशे वर्षांनी भव्य असे राम मंदिर उभे राहिले आहे. अथक मेहनतीने उभ्या राहिलेल्या मंदिरामागे अनेकांचे बलिदान आहे. आशीर्वाद आहेत. कोट्यवधी हिंदुंच्या श्रद्धेचे ते आशास्थान आहे. या श्रद्धेय स्थानाच्या निर्माणासाठी ५ ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केले होते. त्यानंतर बरोबर ४ वर्षांनी २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते प्रभू श्रीरामांच्या बाल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि राम लल्लांच्या मू्र्तीचे अयोध्येमध्ये ५०० वर्षांनी पुन्हा एकदा आगमन झाले. या आगमनाने अनेकांच्या भावना, आठवणी भरून आल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्याला अपवाद ठरले नाहीत. त्यांच्याही मनात जुन्या आठवणी एका मागोमाग जाग्या झाल्या. रामलल्लांच्या या मंदिर निर्माणासाठी देवेंद्रजींनी ही तीन कारसेवा केल्या होत्या. पहिली कारसेवा ३० ऑक्टोबर १९९० मध्ये झाली होती. दुसरी ६ डिसेंबर १९९२ आणि तिसरी २००२ मध्ये झाली होती. या तिन्ही कारसेवांच्या माध्यमातून त्यांनी ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर भव्य बनायेंगे’ असा नारा दिला होता. या तीन कारसेवांबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

देवेंद्रजींच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात रामजन्मभूमी आंदोलनाचे एक वेगळेच महत्त्व आहे. वयाच्या १८-१९ व्या वर्षी देवेंद्रजींवर रामशिला खंड प्रमुख म्हणून रामशिला पूजनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या खंडा अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे उपखंड म्हणजेच उपसमित्या होत्या. त्या उपसमित्यांचे अध्यक्ष, सदस्यांची नेमणूक करणे आणि त्यांच्याकडून रामशिला पूजन करून घेणे ही जबाबदारी देवेंद्रजींवर देण्यात आली होती. त्यानुसार त्यांना एका उपखंडामध्ये रामशिला पूजन समितीच्या अध्यक्षपदासाठी एक रामभक्त व्यक्ती हवी होती. त्यावेळी देवेंद्रजींनी मध्यप्रदेशमधील एका काँग्रेसच्या आमदाराशी चर्चा केली होती. त्यावेळी त्या आमदारानेही रामाचे कार्य म्हणून देवेंद्रजींना लगेच होकार देखील दिला होता. या उदाहरणातून हेच सूचित होते की, देवेंद्रजींचे प्रभू रामांवर निस्सिम भक्ती होती आणि त्यांनी स्वत:ला या कार्यात पूर्णपणे वाहून घेतले होते.

पहिली कारसेवा (३० ऑक्टोबर १९९०) – Devendra Fadnavis Karseva

देवेंद्रजींनी पहिली कारसेवा ३० ऑक्टोबर १९९० मध्ये केली होती; तेव्हा ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करायचे. त्यावेळी देवेंद्र अवघे २० वर्षांचे होते. ते जेव्हा पहिल्या कारसेवेसाठी निघाले होते. तेव्हा मुलायमसिंग यादव हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. देवेंद्रजी नागपूरहून ट्रेनने प्रयागराजला (इलाहाबाद) गेले होते. त्यावेळी ते कार्यक्रमाच्या किमान एक आठवडाभर आधीच पोहोचले होते. देशभरातून लोक तिथे येत होते. तिथे ते देवराहबाबा आश्रमात पोहोचले. तिथे त्यांना त्यांच्या इतर सहकाऱ्यांकडून माहिती मिळाली की, स्थानिक प्रशासनाने इथल्या लोकांना बाहेर जाण्यास आणि बाहेरून आत येणाऱ्या लोकांवर निर्बंधे आणली होती. त्यावेळी देवेंद्रजींसोबत असलेल्यापैंकी पाच ते सहा जणांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि उर्वरित लोकांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. तेथे थांबणाऱ्या लोकांनी सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले.

देवेंद्रजी आणि त्यांचे सहकारी पुढे चालत राहिले. पुढे ते सिताराम मंदिरात गेले. तेथे त्यांनी राहण्यासाठी विचारणा केली. त्यांना जागा मिळाली देखील. पण थंडीमुळे त्यांचे खूप हाल झाले. थंड पाण्याने अंघोळ करावी लागत होती. पुजारी बनवत असलेली प्रसादाची दालखिचडी त्यांना खावी लागत होती. तरीही त्यांनी ५-६ दिवस हे सर्व सोसले. ध्यास एकच होता. तो म्हणजे आयोध्येला जाण्याचा आणि कारसेवा करण्याचा. दरम्यान, मुलायमसिंग सरकारने आयोध्येमध्ये कोणालाही येऊ देणार नाही, अशी घोषणाच केली होती. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, ‘आयोध्या में परिंदा भी पर नही मार सकता’, असा कडेकोट बंदोबस्त केला होता. पण सिताराम मंदिरातून त्यांना कळले की, ते शंकराचार्यांबरोबर पायी आयोध्येसाठी जाऊ शकतात. त्यानुसार त्यांच्याबरोबर पायी आयोध्येसाठी निघाले. त्या मार्गावरून जात असताना सायंकाळच्या वेळेस ते एका ब्रिजवर पोहोचले. तिथे कारसेवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. ती गर्दी दोन्ही बाजुंनी आत आल्यावर पोलिसांनी दोन्ही मार्ग बंद केले आणि गर्दीवर लाठीहल्ला सुरू केला. हवेत गोळीबार केला. यामुळे अनेकांनी ब्रीजवरून नदीत उड्या मारल्या. त्यात काही कारसेवकांना आपले प्राण गमवावे लागले. पोलिसांनी शं‍कराचार्यांना अटक करून गर्दीतील कारसेवकांवर लाठीहल्ला करून त्यांना शांत करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. अनेकांना बसमध्ये कोंडून ठेवले आणि त्या बसेस बदायूँच्या दिशेने निघाल्या. रात्रभर त्या बस चालत होत्या आणि शेवटी सकाळी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये आणून सर्वांना आतमध्ये टाकले. जवळपास ते १४ ते १५ दिवस सेंट्रल जेलमध्ये होते. त्यावेळी त्यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार हे देखील त्या कारागृहात होते. तिथे त्यांनी नियमितपणे शाखा लावली आणि त्याचे टेन्शन न घेता त्या क्षणाचा आनंद घेतला. तिथून त्यांनी घरच्यांना पत्र पाठवून अटक झाल्याचे कळवले. पण ते स्वत: घरी पोहोचल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांचे पत्र घरच्यांना मिळाले होते.  

पहिल्या कारसेवेची पार्श्वभूमी

भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये देशभरात रथ यात्रा काढली होती. ही रथयात्रा ३० ऑक्टोबर १९९० मध्ये आयोध्येत संपणार होती आणि तोच कारसेवेचा दिवस होता. पण त्याच्या अगोदरच बिहारमध्ये त्यांना लालूप्रसाद यादव सरकारने अटक करून आयोध्येत येण्यास मज्जाव केला. त्यावेळी राम मंदिराच्या शिलान्यासासाठी असंख्य कारसेवक आयोध्येत जमले होते. त्यावेळी कारसेवक बाबरी मशि‍दीकडे वळले की, त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी दिले होते. त्यावेळी मुलायसिंग यादव यांनी म्हटले होते की, त्यांना आयोध्येत येण्याचा प्रयत्न करू द्या. आम्ही त्यांना कायद्याचा अर्थ शिकवू. कोणालाही मशि‍दीला हात लावू दिला जाणार नाही. 

Devendra Fadnavis Karseva
अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र आहे. वर्तुळामध्ये देवेंद्रजी दिसत आहेत. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी हे छायाचित्र टिपले होते. (दै. नवभारत, नागपूर)

दुसरी कारसेवा (६ डिसेंबर १९९२)

पहिल्या कारसेवेनंतर बरोबर दोन वर्षांनी दुसऱ्या कारसेवेची घोषणा झाली होती. दुसऱ्या कारसेवेची तारीख होती, ६ डिसेंबर, १९९२. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये कल्याणसिंग यांचे सरकार होते. या कारसेवेसाठी देवेंद्रजी ३० नोव्हेंबरला नागपूरहून आयोध्येसाठी रवाना झाले होते. त्यावेळी त्यांचा जवळपास २५० जणांचा ग्रुप होता. बरोबर १ डिसेंबरला ते अलाहाबाद येथे पोहोचले. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या कार्यकर्यांनी मोठ्या निश्चयाने आयोध्येत प्रवेश केला. तिथे आयोध्यातील काळाराम मंदिरात त्यांची २ ते ६ डिसेंबरपर्यंतची मुक्कामाची सोय करण्यात आली होती. या कालावधीत त्यांना आयोध्या परिक्रमा करत ‘मंदिर वही बनाऐंगे’, ‘जागो हिंदू जागो’, असे नारे द्यायचे होते. हळुहळू आयोध्येतील गर्दी वाढू लागली. हजारांहून ती लाखापर्यंत पोहोचली.   

५ डिसेंबरच्या रात्री सर्वांना निरोप आला की, उद्या म्हणजे ६ डिसेंबरला कारसेवा करायची आहे. त्यासाठी सर्वांनी मूठ-मूठ भर माती आणायची आहे. त्यानुसार ६ डिसेंबरला सर्व जण त्या ढाचासमोर जमा झाले. दिलेल्या आदेशानुसार कारसेवा करायची होती. पण तिथे जमलेल्या लोकांमध्ये चीड निर्माण झाली होती. त्यामुळे त्यातील अनेकांना तो ढाचा पाडून टाकावा असे वाटत होते. त्यानुसार अनेकांनी त्या ढाच्यावर हल्ला करून ती पाडण्यास सुरूवात केली. त्यातील दोन ढाचे पाडले सुद्धा पण तिसरा ढाचा काही पडत नव्हता. त्यासाठी सर्वांची धडपड चालू होती. मनात मिलिटरी, पोलीस येतील याची भीतीसुद्धा वाटत होती. पण अखेरीस तो तिसरा ढाचादेखील पाडला गेला आणि कारसेवकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याच क्षणाला, त्याच ठिकाणी देवेंद्रजींच्या काकांची मुले, नात्यातील इतर जणांची अचानक भेट झाली. त्यामुळे तर आणखीनच आनंद झाला. तिथे संध्याकाळपर्यंत थांबल्यावर ते सायंकाळी पुन्हा मंदिरात आले आणि झोपले. सकाळी उठून पुन्हा मंदिरात जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना तिथे थांबवण्यात आले आणि आयोध्या सोडून जाण्यास सांगितले. संपूर्ण आयोध्यामध्ये कर्फ्यू लावल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी त्यांना पोलिसांनी बसमध्ये बसवून लखनौमध्ये सोडले. तिथून ते सारे ट्रेनने नागपूरला अडीच दिवसांनी पोहोचले. दरम्यानच्या प्रवासात ट्रेनवर अनेक ठिकाणी बाहेरून हल्ले झाले. त्यावेळी देवेंद्रजींच्या ग्रुपनेही वाटेदरम्यान ट्रेनमध्ये दगड जमा करून ठेवले होते. त्याचा वापर करत हल्लेखोरांवर दगडफेक केली. 

तिसरी कारसेवा (फेब्रवारी- मार्च २००२)

२००२ मध्ये आयोध्येत राममंदिराच्या पुनर्निर्माणासाठी महाराष्ट्र प्रांतासाठी १५ मार्चपासून कारसेवा सुरू करण्याची घोषणा विश्व हिंदू परिषदेने केली होती. या कारसेवेसाठी प्रत्येक प्रांताला/विभागाला एक दिवस ठरवून दिला होता. त्यानुसार देवेंद्रजीही नागपूर, विदर्भ प्रांतातून या कारसेवेत सहभागी झाले होते.

तिसऱ्या कारसेवेपूर्वी गोध्रामध्ये दंगल

दरम्यान, २७ फेब्रुवारी, २००२ मध्ये गुजरातहून आलेल्या कारसेवकांच्या साबरमती एक्सप्रेस ट्रेनवर सकाली पावणे आठच्या दरम्यान हल्ला झाला. स्लीपर कोचच्या एस-६ डब्ब्यावर जाळपोळ करण्यात आली. या जाळपोळीत आयोध्येवरून गुजरातला परतणाऱ्या जवळपास ५९ कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या होत्या.

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पाहिलेले स्वप्नं अखेर ५० व्या वर्षी पूर्ण होताना देवेंद्रजींनी पाहिले. अयोध्येचे आंदोलन हे फक्त ईश्वरभक्ती किंवा हिंदु संघटनशक्तीसाठी नव्हते. तर त्यामागे राष्ट्रीय अस्मिताही होती. आपल्या समाजाला आदर्शस्थानी असलेल्या प्रभू रामांचे मंदिर त्यांच्या जन्मस्थानी उभे राहू शकत नाही. हे आपले दुर्बल्य दाखविणारे होते. ते मोडून काढण्यासाठी आणि जगाला एक सकारात्मक संदेश देण्याच्या हेतुने रामजन्मभूमी निर्माणासाठी राबविलेल्या कारसेवा (Devendra Fadnavis Karseva) खूप महत्त्वाच्या ठरल्या आहेत. त्याची इतिहासात सुवर्णाक्षरात नोंद घेतली जाईल. 

सोशल मिडिया

Tweets

राम मंदिर उभारणीसाठी उभारण्यात आलेल्या कारसेवा! – २० जानेवारी २०२४

तिन्ही कारसेवांना उपस्थित राहता आले हे कारसेवक म्हणून भाग्य – ४ ऑगस्ट २०२०

अयोध्यामधील राम मंदिरासाठी निधी समर्पण – २९ जानेवारी २०२१

कारसेवक म्हणून राम मंदिर निर्माणात खारीचा वाटा – २९ जानेवारी २०२१

कारसेवक म्हणून सुरूवात – २० जानेवारी २०२४

कारसेवेदरम्यान बदायू कारागृहातील आठवणी – २० जानेवारी २०२४

कारसेवक म्हणून शब्दबद्ध केलेल्या आठवणी – ५ ऑगस्ट २०२०

आयोध्येतील राम मंदिराच्या कामाची पाहणी भेट – ९ एप्रिल २०२३

YouTube Videos

रामभक्त देवेंद्र फडणवीस – ४ ऑगस्ट २०२०

देवेंद्र फडणवीस आणि कारसेवा – ८ जानेवारी २०२४

एक कारसेवक आणि रामसेवक म्हणून आजचा दिवस विशेष – ३० मे २०२४

कारसेवक म्हणून मनापासून आनंद – ३० डिसेंबर २०२३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *