गडचिरोली | उत्तम प्रशासक

इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प अन् गडचिरोलीची स्टील हबच्या दिशेने वाटचाल

गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात औद्योगिक क्रांती घडवून आणत, इन्फ्रा मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा शेवटचा समजला जाणारा जिल्हा गडचिरोलीला ‘स्टील हब ऑफ इंडिया’ बनवण्याचा संकल्प सोडला आहे. त्याला अनुसरून देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.२२ जुलै) गडचिरोलीतील कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. महाराष्ट्रातील पहिल्या मेगा इंटिग्रेटेड स्टील प्रकल्पाची पायाभरणी गडचिरोलीमध्ये करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पुढील अडीच वर्षात साधारण गडचिरोलीत २० हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. तसेच यामुळे गडचिरोलीच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.

२२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असतो. त्यांनी यावर्षी महाराष्ट्र सेवक म्हणून आपला वाढदिवस गडचिरोलीतील महत्त्वाच्या प्रकल्पांचे, गडचिरोली विकास योजनांचे उद्घाटन करून साजरा केला. गडचिरोलीच्या हेदरी येथे ५ मिलियन टन क्षमतेच्या लोहखनिज ग्रायंडिंग युनिटचे त्यांनी उद्घाटन केले. तसेच १० एमटीपीए क्षमतेच्या स्लरी पाईपलाईन आणि ४ एमटीपीए क्षमतेचा पेलेट प्लांट, यासोबतच ४.५ एमटीपीए क्षमतेच्या इंटिग्रेटेड स्टील प्लांटचे उद्घाटन केले. हा विदर्भातील पहिलाच प्रकल्प असून, यातून २४,००० कोटींची गुंतवणूक होणार आहे. तसेच यावेळी १०० खाटांच्या रुग्णालयाचे आणि सीबीएसई शाळेचे भूमिपूजन देखील करण्यात आले. या औद्योगिक प्रकल्पांमुळे गडचिरोलीत रोजगार संधी, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा व्यापक विकास होणार आहे.

येणाऱ्या काळात गडचिरोलीचे दरडोई उत्पन्न टॉप १० मध्ये…

गडचिरोलीमधील लोहखनिज हे देशातील सर्वोत्कृष्ट दर्जाचे खनिज आहे; सरासरी ६७ टक्के लोहाचा अंश त्यात आहे. त्यामुळे हे लोहखनिज चीनच्या खनिजांशी स्पर्धा करू शकते. या खनिजामुळे भारतातील स्टील उद्योगालाच नाही, तर जागतिक स्तरावरही महाराष्ट्राची औद्योगिक ताकद पोहोचणार आहे. सध्या गडचिरोली जिल्हा राज्यातील सर्वात कमी दरडोई उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मात्र या औद्योगिक परिवर्तनामुळे गडचिरोली लवकरच राज्यातील टॉप १० जिल्ह्यांमध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. लॉयड्स कंपनीने गडचिरोलीमध्ये फक्त उद्योग उभारण्यावर भर दिला नाही. तर स्थानिक तरुणांना उद्योग कौशल्याचे प्रशिक्षण देत त्यांना आपल्या कंपन्यांमध्ये सामावून घेतले आहे. यात आत्मसमर्पण केलेल्या नक्षलग्रस्त तरुणांचाही समावेश आहे. जे आता मुख्य प्रवाहात सहभागी झाले आहेत. सध्या लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) कंपनीमध्ये ११,००० कर्मचारी कार्यरत आहेत आणि ही संख्या लवकरच १३,००० वर पोहोचणार आहे. या उद्योगामुळे येथे साधारण २० हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. दरम्यान कंपनीने, इसॉप (कर्मचारी स्टॉक पर्याय योजना) अंतर्गत १,४०० रुपये किमतीचा प्रत्येकी शेअर ४ रुपयांमध्ये वितरित केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये चांगला वाटा मिळाला आहे. या इसॉपचा आतापर्यंत १०,६०० कर्मचाऱ्यांनी फायदा घेतला आहे. या सेक्टरमध्ये ही स्कीम एक अनोखे मॉडेल ठरत आहे.

गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि लोहखनिजाच्या विपुल संपत्तीमुळे या औद्योगिक प्रकल्पाला विविध प्रकारचे फायदे मिळणार आहेत. गडचिरोलीतील कारखान्यातून दक्षिण भारतातील राज्यांना स्टीलचा कमी वेळेत पुरवठा करता येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत होत आहे. येणाऱ्या काळात यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

गडचिरोली खनिजांनी संपन्न असलेला जिल्हा आहे. पण या जिल्ह्यातील खनिज इतर ठिकाणी नेऊन त्यावर प्रक्रिया करण्याऐवजी ती गडचिरोली जिल्ह्यातच करण्यावर देवेंद्र फडणवीस यांचा भर होता. त्यानुसार २०१७ मध्ये त्यांनी लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी कंपनीच्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. ते स्वप्नं आज पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गडचिरोलीतील उद्योगाच्या माध्यमातून फक्त विकासावर लक्ष केंद्रीत केलेले नाही. तर त्यांनी सामाजिक परिवर्तनावरही भर देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्योगधंद्याच्या वाढीबरोबरच स्थानिकांचाही विकास होईल, याची काळजी घेतली आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्य, आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याचे पुनर्निर्माण त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर गडचिरोलीचे नाव ठळकपणे अधोरेखित केले आहे. ही औद्योगिक क्रांती म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आहे. त्यामुळेच महाराष्ट्र त्यांना इन्फ्रा मॅन म्हणून ओळखतो.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *