डबेवाला

मुंबई डबेवाले आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र: १३५ वर्षांची परंपरा आणि व्यवस्थापन कौशल्यांचा अनुभव

मुंबईचा डब्बेवाला. १३५ वर्षांची अखंड सेवा, एकही चूक न करता, एकही दिवस उशीर न करता अविरत ही सेवा सुरू आहे.  ही सेवा फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी अभिमानस्थान आहे. मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर काम करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे कौशल्य कौतुकास्पद आहे. म्हणूनच त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डपासून ते जगभरातील संशोधन संस्थांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. हा अनोखा अनुभव याची देही याची डोळा पाहण्यासाठी मुंबईत डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून डबेवाल्यांचा एक दिवस अनुभवता येत आहे.

मुंबईत वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोडवरील हार्मोनी इमारतीत ३ हजार चौरस फूट जागेत ‘मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र’ उभारण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ ऑगस्ट रोजी केले. या अनुभव केंद्राच्या माध्यमातून डबेवाला परंपरेचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इथे अत्याधुनिक व्हर्च्युअल रियालिटीच्या मदतीने डबेवाल्यांचा एक संपूर्ण दिवस प्रत्यक्ष अनुभवता येत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून डबे गोळा करणे, लोकल प्रवास, डब्यांचे वेगवगळ्या पद्धतीने वितरण आणि सर्वांत शेवटी दुपारी १२ पर्यंत ग्राहकांना त्यांचा डब्बा पोहोचवणे, अशा प्रत्येक टप्प्याचा अनुभव या केंद्रातून घेता येतो. मागील १३५ वर्षांपासून डबेवाल्यांनी वेगवेगळ्या परिस्थितीत कशी सेवा दिली.  त्या सेवा काळानुरूप कशा बदलत गेल्या. त्यासाठी त्यांनी वापरलेल्या विविध साधनांचे-साहित्याचे दर्शन या केंद्रातून होते.

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रात काय आहे?

  • १८९० मध्ये सुरू झालेली ही सेवा काळानुरुप कधी बदलत गेली. याची माहिती चलचित्र, माहितीपटाद्वारे मांडण्यात आली.
  • डबेवाल्यांकडून वापरण्यात आलेले डबे, सायकल, हातगाडी यांच्या प्रतिकृती इथे मांडल्या आहेत.
  • डबेवाल्यांचे व्यवस्थापन कौशल्य पाहून अवाक झालेले ब्रिटनचे राजे प्रिन्स चार्ल्स यांनी मुंबईत डबेवाल्यांची भेट घेतली होती. त्याची क्षणचित्रे इथे आहेत.
  • भारतीय पोस्टाने डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचा गौरव करत त्यांच्या सेवेची दखल घेत तिकीट प्रकाशित केले होते. तसेच वेगवेगळ्या संस्थांना डबेवाल्यांचा केलेला गौरव त्याच्या आठवणी इथे मांडण्यात आल्या आहेत.
  • डबेवाल्यांच्या कामाचा जवळून अनुभव घेता यावा यासाठी थ्रीडी इफेक्ट असलेले गॉगल्स इथे आहेत.

मुंबई डबेवाल्यांचा इतिहास

मुंबईच्या डबेवाल्यांना १३५ वर्षांची परंपरा आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर तालुक्यातून मुंबईत पोट भरण्यासाठी आलेल्या महादू हावजी बच्चे यांनी १८९० मध्ये एका पारशी बँकरला पहिल्यांदा डबा पोहोचवण्याची सेवा दिली होती. ती आजतागायत सुरू आहे. विविध वर्तमानपत्रांमधून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, मुंबईत साधारण १४०० डबेवाले कार्यरत आहेत. त्यांच्या साखळी मॅनेजमेंटमधून जवळपास १ लाख लोकांना डबे पोहोचवले जात आहेत. डबेवाल्यांकडे आलेला १ डबा ३ ते ४ जणांच्या हातातून ग्राहकापर्यंत पोहोचवला जातो.

डबेवाल्यांचे ह्युमन इंटेलिजन्स व्यवस्थापन

कोणत्याही तंत्रज्ञानाचा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर न करता मुंबईचे डबेवाले मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर अनोखे व्यवस्थापन कौशल्ये राबवत आहेत. त्यांच्याद्वारे ज्या ह्युमन इंटेलिजन्सच्या बळावर जे काम सुरू आहे; ते जगातील कोणत्याही अत्याधुनिक तंत्रज्ञानापेक्षा सरस आहे. म्हणूनच त्यांच्या कौशल्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डपासून ते जगभरातील संशोधन संस्थांनी दखल घेतली आहे. त्यांच्या या व्यवस्थापनाचे धडे देशातील आयआयटी तसेच एमबीए कॉलेजेसमधून दिले जात आहेत. तर अनेक कॉर्पोरेट कंपन्या त्यांचे सप्लाय मॅनेजमेंटचे स्कील समजून घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून बोलावत आहेत. ब्रिटनचे राजे प्रिन्स चार्ल्स हे सुद्धा डबेवाल्यांचे व्यवस्थापन कौशल्य पाहून अवाक झाले होते. त्यांनी मुंबईत येऊन डबेवाल्यांची भेट घेतली होती. त्यांच्या या कामाचा गौरव भारतीय पोस्ट विभागानेही केला आहे. त्यांच्या सेवेची दखल घेत पोस्टाने एक तिकीट सुद्धा प्रकाशित केले आहे.

डबेवाल्यांसाठी २५,५०,००० रुपयांत ५०० चौरस फुटांचे घर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डबेवाल्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी वेळोवेळी ठोस पावले उचलली आहेत. डबेवाल्यांना सन्मानासोबतच हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून फक्त २५ लाख ५० हजार रुपयांत ५०० चौरस फुटांची सुसज्ज घरे उपलब्ध करून देण्याची डबेवाल्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा केली आहे. या गृहप्रकल्पांमध्ये रेल्वे स्थानकांशी थेट जोडणाऱ्या पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. दरम्यान, २०२४ मध्ये मुंबईचे डबेवाले, चर्मकार असोसिएशन आणि प्रियंका होम्स रियलटी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून म्हाडा १२ हजार घरे बांधणार आहे.

भूमिपूजन आणि लोकार्पण

एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन करून तो प्रकल्प ठराविक वेळेत पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्याचा सन्मान आपल्याकडे काही ठराविक नेत्यांच्याच वाट्याला आला असेल. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अर्थातच अग्रस्थानी आहे. मुंबईच्या या डबेवाला अनुभव केंद्राचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांनी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी केले होते. त्यावेळी ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. अवघ्या दोन ते अडीच वर्षात या केंद्राचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील त्यांनी विक्रमी अशा १० वर्षात पूर्ण करून कार्यान्वित केला. एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन करून त्याचे लोकार्पण करण्याचा बहुमान देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा मिळवला आहे.

मुंबई डबेवाल्यांचा इतिहास, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या सेवेने भारावलेले जगभरातील मान्यवरांचे अनुभव, यांचे समर्पक दस्तऐवजीकरण या केंद्रात उपलब्ध आहे. नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून डबेवाल्यांचा हा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे हे महत्त्वाचे पाऊल असून, महाराष्ट्राच्या सामाजिक-सेवा परंपरेचे हे एक अमूल्य प्रतीक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *