मानवगाथा | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

मुख्यमंत्रीपदाचा पहिला निर्णय: माणुसकीचा हात पुढे करत तातडीची आर्थिक मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या कार्यशैलीतून संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला आहे. पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडे(Chandrakant Kurhade) यांना बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी तातडीने आर्थिक मदतीची गरज होती. तेव्हा कुऱ्हाडे यांच्या कुटुंबियांनी ही निकड लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी चे लाभार्थी चंद्रकांत कुऱ्हाडे – CM Relief Fund Beneficiary Chandrakant Kurhade

पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना गंभीर आजार झाला असून, डॉक्टरांनी त्यांना त्वरित बोन मॅरो प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने त्यांना पैशांची गरज भासत होती. तेव्हा त्यांनी पुण्यातील भाजपाचे नेते जगदिश मुळीक यांच्या मदतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच कुऱ्हाडे कुटुंबियांनी केलेल्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांची मदत मंजूर केली. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी त्यांनी हा निर्णय घेऊन, कुऱ्हाडे यांना आर्थिक मदत मंजूर करणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर पहिली सही केली.   

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एक कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, जनतेच्या प्रति सहानुभूती असणारा नेता याचा प्रत्यय करून दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे फक्त एका कुटुंबालाच नाही, तर अनेक गरजूंना दिलासा आणि विश्वास मिळाला आहे. देवेंद्रजींनी २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून वर्षभरात जवळपास ४०० रुग्णांना १५ कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध करून दिली होती. पण ही रक्कम उपलब्ध करून देत असताना, प्रशासकीय बाबी पूर्ण करताना काही वेळेस विलंब होत होता. हा विलंब टाळण्यासाठी आणि गरीब व गरजू रूग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी ऑगस्ट २०१५ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयाच्या अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केला. या कक्षाच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांना आर्थिक मदत मिळवून दिली. महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करून घेतल्या. तसेच उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रूग्णालयांवर कठोर कारवाई सुद्धा केली. यामुळे राज्यातील अनेक गरजवंतांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत कुऱ्हाडे (Chandrakant Kurhade) यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेला हा निर्णय म्हणजे सर्वसामान्यांच्या समस्यांकडे तत्परतेने लक्ष देणारा नेता, याची प्रचिती घडवून देणारा आहे. देवेंद्रजींनी आपल्या राजकीय जीवनात अनेक वेळा जनतेच्या गरजांना प्राथमिकता दिली आहे. विशेषतः आरोग्यविषयक तातडीच्या गरजा पूर्ण करून नागरिकांचे जीवन वाचवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. २०१७ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री असताना २६ लहान मुलांची हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला होता. २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीसाठी एकूण १,०७,७८२ अर्ज आले होते. त्यापैकी ६३,५७३ अर्जदारांना ५९८.३२ कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती. याचदरम्यान देवेंद्रजींनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जवळपास ६१४ कोटी रुपयांची वाढ केली होती. 

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा

देवेंद्र फडणवीस यांची मुत्सद्देगिरी फक्त राजकारण किंवा प्रशासनापुरती सिमित नाही. त्यांना सामाजिक बांधिलकीचीही तेवढीच जाणीव आहे. समाजातील गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात आरोग्य उपचार मिळावेत. यासाठी त्यांनी मागील मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात विनामूल्य अटल आरोग्य महाशिबिराचे आयोजन केले होते. त्याचबरोबर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र संकल्पनेतून १७ लाख जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. लहान मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेचा उपक्रमही त्यांनी राबवला. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी जनतेची सेवा केली.

इतर लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *