महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ यशस्वी राजकारणी नाहीत, तर ते कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व देखील आहेत. त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या आई सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. देवेंद्रजी आपल्या व्यक्तिगत आयुष्यात पहिला गुरू म्हणून आईकडेच पाहतात. जीवनात समतोल राखण्याचे आणि योग्य निर्णय घेण्याचे संस्कार त्यांना आईकडून लहानपणापासून मिळाले.
आई: पहिली गुरू आणि प्रेरणास्थान
देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनात त्यांची आई हे सर्वांत पहिले आणि महत्त्वाचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या मते, आईमुळेच जीवनाला आकार मिळाला आणि तिने दिलेल्या संस्कारांमुळेच त्यांची वाट सुकर झाली. वडिलांकडून राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे बाळकडू मिळाले, तर आईकडून सामाजिक संवाद, आचारविचार आणि जीवनशैली यांचे धडे मिळाले. वयाच्या १७व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने त्यांना आधार दिला. २१व्या वर्षी जेव्हा ते पूर्णवेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होण्याचा विचार करत होते, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना समजावले की, समाजसेवा करण्यासाठी घर सोडण्याची आवश्यकता नाही. संसारात राहूनही राष्ट्रसेवा करता येऊ शकते, हे तिने पटवून दिले. त्यामुळे आजही फॅमिली मॅन देवेंद्रजी आईलाच आपली गुरू मानतात.
संस्कार आणि राजकीय दूरदृष्टी
८०च्या दशकात सरिता फडणवीस आपल्या मुलाला दररोज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत घेऊन जात होत्या. हा त्यांच्या संस्काराचा भाग होता. त्या पूर्णवेळ राजकारणात नव्हत्या, परंतु त्यांना राजकारणाची उत्तम जाण होती. आजही, योग्य राजकीय सल्ल्यासाठी देवेंद्रजी आपल्या आईशी चर्चा करतात आणि त्यांच्या मताला महत्त्व देतात. त्यांच्या मते, आईच्या सल्ल्यात सदैव प्रगल्भता आणि दूरदृष्टी असते. त्या विदर्भ हाऊसिंग क्रेडिट सोसायटीच्या संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी मुलांमध्ये शिस्त, सचोटी आणि प्रामाणिकतेचे संस्कार रुजवले. देवेंद्रजींचे वडील सामाजिक आणि राजकीय जबाबदाऱ्यांमुळे सतत घराबाहेर असायचे, त्यावेळी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आईने सांभाळली. याच संस्कारांतून फॅमिली मॅन देवेंद्रजींनी (Family Man Devendra Fadnavis) आपले व्यक्तिमत्त्व घडवले.
आईच्या नावे ओळख
आईच्या ऋणातून उतराई होता येत नाही, पण तिच्या सन्मानासाठी काहीतरी करता येते. देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे त्यांनी आपल्या आईसह महाराष्ट्रातील प्रत्येक मातेला सन्मान दिला. १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या प्रत्येक बालकाच्या आधारकार्ड, पॅनकार्ड आणि सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव टाकणे अनिवार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय मातृत्वाचा गौरव करणारा ठरला. याचप्रमाणे, २०२४ च्या निवडणुकीनंतर त्यांच्या शपथविधीच्या निमंत्रणपत्रिकेत ‘देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस’ असा उल्लेख करण्यात आला. यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव ‘देवेंद्र गंगाधरराव फडणवीस’ असे घेतले गेले होते. पण यावेळी आईच्या नावाचा समावेश करून मातृप्रेम आणि संस्कारांचा सन्मान उंचावला. दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्रजींनी आईचा आशीर्वाद घेऊन “मायेचे औक्षण! आईच्या आशीर्वादाने नव्या पर्वाचा आरंभ…” असे सोशल मीडियावर लिहून आपल्या आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस यांचे त्यांच्या आईशी असलेले अतूट नाते हे केवळ एक कौटुंबिक बंधन नाही, तर ते त्यांच्या जीवनप्रवासाचा पाया आहे. त्यांनी आपल्या आईकडून मिळवलेल्या शिकवणींमुळेच ते एका प्रभावी नेत्याच्या रूपात घडले. त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील प्रत्येक टप्प्यावर आईचा आधार आणि संस्कारांचे प्रतिबिंब दिसून येते. आई ही केवळ जन्मदाती नसते, तीच खऱ्या अर्थाने पहिली गुरू आणि प्रेरणास्थान असते, हेच देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनातून अधोरेखित होते.