गडचिरोली

गडचिरोली नक्षलवाद नाकारतंय; गडचिरोली बदलतंय! २४ तासांत उभारलं नवीन पोलीस स्टेशन!

गडचिरोलीमधील नक्षली कारवायांना आळा घालण्याच्या दृष्टिने आणि इथली सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी गडचिरोलीतील भामरागडमधील नेलगुंडा गावात १५०० पोलिसांनी २४ तासांच्या विक्रमी वेळेत पोलीस स्टेशन उभारले. भामरागडमधील नेलगुंडा हे ठिकाण नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण स्थळ म्हणून परिचित होते. या भागातच पोलीस स्टेशन उभारल्यामुळे लोकांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेमासून फक्त ६०० मीटर अंतरावर नेलगुंडा गाव आहे. या नवीन पोलीस स्टेशनमुळे आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगिण विकासाला हातभार लागून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता या पोलीस चौकीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

भामरागड आणि परिसरातील १ हजार सी-६० कमांडो, २५ बीडीएस टीम, नव्याने पोलीस दलात सहभागी झालेले पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी आणि खाजगी कंत्राटदारांच्या मदतीने गडचिरोली पोलिसांनी २४ तासांत नेलगुंडामध्ये नवीन पोलीस स्टेशन उभारले. या पोलीस स्टेशनच्या उभारणीत गडचिरोली पोलिसांना स्थानिकांची मोठी मदत झाली आहे. मागील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये १४ जून रोजी नेलगुंडा गावातील ग्रामस्थांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली होती. नेलगुंडा गाव छत्तीसगडच्या सीमेवर असल्याने या गावाच्या परिसरात नक्षलवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे चालायची. तसेच याच भागातून ते छत्तीसगड किंवा महाराष्ट्रात ये-जा करत होते. त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी टप्प्या टप्प्यावर पोलीस स्टेशन उभारण्यास सुरूवात केली होती. ११ डिसेंबर २०२४ मध्ये इथल्याच पेनगुंडा भागात नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना केली होती. त्याचप्रमाणे २०२४ मध्ये एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील भाग असलेल्या गर्देवाडा येथे २४ तासांत पोलीस मदत केंद्र उभारण्याचा विक्रम गडचिरोली पोलिसांनी केला होता.  तर २०२३ मध्ये नक्षलग्रस्त वांगेतुरी भागातही असेच २४ तासांत पोलीस स्टेशन उभारले होते. एटापल्ली, भामरागड मधील बराचसा भाग हा अतिसंवेदनशील आहे.

गडचिरोली बदलतंय!

जून २०२२ मध्ये राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्याचबरोबर त्यांच्याकडे राज्याचे गृहमंत्री पददेखील होते तसेच ते गडचिरोलीचे पालकमंत्री ही होते. या काळात त्यांनी गडचिरोलीची नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसून काढण्याचा संकल्प सोडला होता. त्या संकल्पाचाच भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यावर देवेंद्रजींनी भर दिला. २०१४ ते २०१९ या कालवधीच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि मुंबईतील इन्फ्राच्या कामांवर भर देत त्यानुसार निर्णय घेतले. दरम्यान त्यांनी गडचिरोलीच्या विकासासाठी जिल्ह्याचे दौरे करून तिथला नक्षलवाद थांबवण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलली होती. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि आता डिसेंबर २०२४ मध्ये  मुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीवर लक्ष केंद्रीत केले. साधारणपणे राज्यातील प्रथा, परंपरानुसार मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्याने ते कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारत नव्हते. पण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्वात संवेदनशील आणि विकासाच्या दृष्टिने मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारून गडचिरोलीवर असलेला नक्षलग्रस्त जिल्ह्याचा शिक्का पुसून त्याला स्टील हब जिल्हा अशी नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केले. 

पोलीस स्टेशनबरोबरच सर्वसामान्यांसाठी पायाभूत सुविधा

गडचिरोली पोलिसांनी नेलगुंडा येथे पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी साधारण १०५० मनुष्यबळ, १० जेसीबी, १९ ट्रेलर, ४ पोकलेन, ४५ ट्रक आदींच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस स्टेशनची निर्मिती केली. या पोलीस स्टेशनमध्ये वायफाय सुविधा, १९ पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लॅण्ट, मोबाईल टॉवर, आदी सुविधा उभारण्यात आल्या. यावेळी स्थानिक तरुणींना साड्या, पुरुषांसाठी घमेला, ताडपत्री, स्प्रे पंप, कपडे, ब्लँकेट, शालेय आणि क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने गडचिरोली पोलिसांना दिलेल्या पाठबळामुळे या भागात आता पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

इतर लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *