२६ जुलै या तारखेचा मराठी माणसाला चांगलाच धसका बसला आहे. कारण हीच ती तारीख आहे जेव्हा पावसाने महाराष्ट्रात थैमान घालून प्रचंड नासधूस केली. २६ जुलै २००५, मुंबईत अवघ्या काही तासातच २७ इंच पाऊस कोसळला आणि संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली. दुसरी घटना आहे ती २६ जुलै २०१९ ची! पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन महापूर येऊन महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः आपत्ती व्यवस्थापन तज्ञ असल्याने त्यांनी स्वतः बचाव कार्यात चपळता दाखवली आणि मोठी जीवितहानी टळली. नैसर्गिक आपत्ती ही महाराष्ट्रासाठी नवी नाही. महाराष्ट्राने अनेक ओले-कोरडे दुष्काळ पचवले, लातूरचा भूकंप पाहिला, गारपीट आणि ढगफुटी पाहिली, दरवर्षी मुंबईसह कोकण किनारपट्ट्यांना धडका देणारी चक्रीवादळेही पाहिली. निसर्ग कधी कोपेल याचा नेम नाही. परंतु असलेल्या संकटाला आपण कसे सामोरे जातो, त्यातून काय बोध घेतो आणि भविष्यासाठी उपाययोजना करतो, यावर पुढील संकटाची तीव्रता अवलंबून असते. परंतु काही नेते त्यापलीकडे जाऊन आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर कसे करता येईल याचा विचार करतात आणि भारतातील अशाच निवडक द्रष्ट्या नेत्यांपैकी एक नेते आहेत देवेंद्र फडणवीस!
जुलै २०१९ मध्ये सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या महापुरानंतर जिथे अन्य सामान्य नेत्यांची दृष्टी बचाव कार्य, पीडितांना नुकसानभरपाई आणि पुनर्वसन यापलीकडे जात नाही, तिथे देवेंद्रजींच्या दूरदृष्टीने संकटातही संधी शोधली. निसर्गाचे चक्र मानव नियंत्रित करू शकत नाही. परंतु देवेंद्रजींनी महाराष्ट्रातील पर्जन्यमानाचे बारकाईने अध्ययन केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र विभागात ठराविक कालावधीनंतर अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडतो आणि त्याच वेळी मराठवाड्यातील काही भागात कोरडा दुष्काळ पडतो. निसर्गाच्या या लहरीपणापुढे सामान्य माणूस हतबल होतो, परंतु देवेंद्रजींसारखे आधुनिक भगीरथ या नैसर्गिक अन्यायाविरुद्ध थेट निसर्गाशीच भिडतात. देवेंद्रजींचे चिंतनचक्र गरागरा फिरले आणि त्यातून भन्नाट कल्पना आली ती, काहीही करून दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते मराठवाड्यातील दुष्काळी भागापर्यंत पोचवायचे! अश्यक्यप्राय वाटतं ना? साहजिकच आहे. परंतु देवेंद्रजी सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राने अनेक अशक्य गोष्टी शक्य होताना पाहिल्या आहेत. मग तो नागपूर ते मुंबई २३ जिल्ह्यांना सरळ रेषेत जोडणारा समृद्धी महामार्ग असो किंवा अरबी सागरात उभा झालेला २१.८ किलोमीटर लांबीचा मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतू असो किंवा लोकचळवळ बनलेल्या जलयुक्त शिवार मुळे ३६,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणे असो, देवेंद्रजींनी हे असाध्य साध्य करून दाखविले.
पश्चिम महाराष्ट्राचे पाणी मराठवाड्याकडे वळविणे अवघड कार्य नक्कीच आहे, परंतु देवेंद्रजींसाठी ते अवघड नाही! २०१९ चा महापूर आल्यानंतर देवेंद्रजींनी जागतिक बँक आणि एशियन बँकेकडे मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेची संकल्पना मांडली होती. या योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील अतिरिक्त पाणी समुद्रात वाहून जाण्याऐवजी त्याला अंडरग्राऊंड पाईप्सच्या माध्यमातून मराठवाड्यातील जलाशयांपर्यंत पोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. एशियन बँकेने सदर प्रकल्पाला अर्थसाहाय्य करण्यात रसही दाखवला होता. १२ सप्टेंबर २०१९ रोजी एशियन बँकेची टीम पाहणीही करून गेली होती. परंतु पुढे राज्यात सत्तांतर झाले आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आले. उद्धव ठाकरेंनी सत्तेत येताच देवेंद्रजींनी हाती घेतलेल्या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम सुरु केले आणि त्यातच मराठवाडा वॉटर ग्रीड योजनाही बासनात गुंडाळली गेली. परंतु देवेंद्रजींनी सत्तेत परतल्यानंतर वर्ल्ड बँकेशी पुन्हा चर्चा सुरु केली आणि देवेंद्रजींच्या प्रयत्नांना अल्पावधीतच यश आले. वर्ल्ड बँक या प्रकल्पात तब्बल २,३२८ कोटींची गुंतवणूक करणार असून राज्य सरकार ९९८ कोटी देणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भीमा आणि कृष्णेचे डायव्हर्जन करण्यात येणार असून इंटिग्रेटेड वॉटर मॅनेजमेंट प्रणालीने पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प मराठवाड्यासाठी गेमचेंजर ठरणार असून, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून जलसंकट सोसणारा मराठवाडा आता पूर्णपणे जलसंपन्न होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील कृषी, उद्योग, सिंचन आणि नागरी जलपुरवठा अशा सर्वच विभागात मोठी जलक्रांती होणार आहे.
देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाड्याची दुसरी पिढी दुष्काळ पाहणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. त्याच दृष्टीने पाऊले उचलत देवेंद्रजी जलयुक्त शिवार-२.० व मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून आपली प्रतिज्ञा पूर्णत्वास नेत आहेत. महाराष्ट्र जलसंपन्न करण्यासाठी जीव ओतून काम करणाऱ्या या महान नेत्याला येणारी पिढी ‘नवमहाराष्ट्राचा भगिरथ’ म्हणून ओळखेल, यात शंकाच नाही!