काल विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना देवेंद्रजींनी विरोधकांच्या उदासीनतेबद्दल जी खंत व्यक्त केली, त्यावरून विरोधकांची जनतेच्या प्रश्नांबद्दलची अनास्था तर दिसून आलीच, परंतु 25 वर्षांपासून विधिमंडळात जीव ओतून काम करणाऱ्या देवेंद्रजींची जनतेबद्दलची कमिटमेंट सुद्धा दिसून आली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद विदर्भाच्या विजय वडेट्टीवारांकडे आहे, नाना पटोले, अनिल देशमुख, यशोमती ठाकूर यांच्यासारखी विदर्भातील मातब्बर मंडळी असूनही अधिवेशनात विरोधकांकडून विदर्भाच्या विषयाबद्दल एकही प्रस्ताव न येणे आणि त्यावर सत्ताधाऱ्यांकडून खंत व्यक्त केली जाणे, ही लोकशाहीकरिता अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. 1661 च्या नागपूर करारानुसार विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठीच हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. परंतु देवेंद्रजींसारखा विदर्भाचा सुपुत्र विरोधकांचे म्हणणे ऐकून घ्यायला उभा असताना विरोधी पक्षाने विदर्भातील प्रश्नांबद्दल, विदर्भाच्या विकासाबद्दल अवाक्षरही न काढणे, ही बाब लोकशाहीकरिता निश्चितच पोषक नाही. यावरून विरोधी पक्ष जनतेपासून किती तुटलेला आहे, हेच दिसून येते.
उबाठा गटाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडून एक दिवस नागपुरात येऊन अधिवेशनात बसले याचाच आनंद गगनात मावेना. शरद पवारांचा गटाला आपल्या 12-12 च्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात आणि NCRB चा अहवाल चुकीच्या पद्धतीने मांडून महाराष्ट्राची बदनामी करण्यातच अधिक रस होता. काँग्रेसबद्दल तर बोलायलाच नको, वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेते पद आल्याने थोरातांसारखे पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेस आमदार निष्क्रिय झाले आहेत. त्यात विदर्भातील काँग्रेसवरील वर्चस्वासाठी वडेट्टीवार विरुद्ध पटोले असे शीतयुद्ध पेटलेले आहे. त्यामुळे दिशाहीन विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाची संधी अक्षरशः वाया घालविली.
असो, विरोधक कसेही वागले तरी, देवेंद्रजी सत्तेवर असल्याने विदर्भावर अन्याय होणे शक्यच नाही. या अधिवेशनात विदर्भातील अनेक विषय मार्गी लागले. यवतमाळ-चंद्रपूर-अमरावती-गडचिरोली जिल्ह्यांमधील वन्यक्षेत्रात मोहफुलांची झाडे मुबलक प्रमाणात झाडे आहेत. त्याचा वापर हा फक्त अवैध मद्यनिर्मिती पुरता मर्यादित आहे. देवेंद्रजींनी या अधिवेशनात मोहफुलापासून इथेनॉल निर्मितीबद्दल नवे धोरण आणण्याचे जाहीर केल्याने, विदर्भातील आदिवासी बांधवांचे अर्थकारण यामुळे बदलणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुर या महानुभाव पंथीयांची पंढरी असलेल्या गावी महाराष्ट्रातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ निर्माण करण्याचीही घोषणा देवेंद्रजींनी केली. वर्धा जिल्ह्याला तर देवेंद्रजींमुळे लॉटरीच लागली. वर्धा शहरात सेवाग्राम येथे शासकीय अनुदानित रुग्णालय आधीच होते. आता हिंगणघाट तालुक्यात सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देवेंद्रजींनी मंजुरी दिली. याशिवाय तळेगाव तालुक्यातील आष्टी येथेही शासकीय रुग्णालय मंजूर झाले. अमरावती येथे वैद्यकीय महाविद्यालयाला देवेंद्रजींनी गेल्या अधिवेशनातच मंजुरी दिली होती. त्यामुळे विदर्भातील आरोग्य व्यवस्थेला यामुळे बूस्टर डोस मिळणार आहे.
या अधिवेशनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचा! देवेंद्रजींनी धान उत्पादक शेतकऱ्यांना 40,000 रुपयांचे अनुदान जाहीर केल्याने, मविआ सरकारच्या काळापासून प्रलंबित असलेली पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांची मागणी आता पूर्ण झाली आहे.
कुठल्याही अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून जनतेचे प्रश्न सोडविले जात नसल्याचे विरोधक आरोप करत असतात, परंतु या अधिवेशनात सत्ताधार्यांकडूनच विरोधकांच्या जनतेच्या प्रश्नांबद्दलच्या अनास्थेबद्दल खंत व्यक्त केली गेल्याने, हे हिवाळी अधिवेशन जनतेच्या चांगलेच स्मरणात राहील.