Maratha Aarakshan : मविआ सरकार न्यायालयात आपली बाजू मांडण्यात नियोजनबद्ध पद्धतीने व जाणीवपूर्वक कमी पडल्याने काल सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केले. अन्यथा जे आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis )कायदा करून उच्च न्यायालयात टिकवले ते सर्वोच्च न्यायालयात बाद होण्याचे काही कारणच नव्हते. परंतु राज्य सरकारच्या अपुऱ्या प्रयत्नांमुळे हे आरक्षण रद्द झालं असं म्हणणं चुकीचं ठरेल. मुळात या सरकारला खरोखरच मराठा समाजाला आरक्षण देण्यात रस होता का याची चाचपणी आता करणे महत्वाचे आहे. मराठा आरक्षणाची मागणी गेल्या कित्येक दशकांपासून प्रलंबित आहे आणि त्यातील बहुतेक कालखंडात शरद पवार व अन्य दिग्गज मराठा नेते हेच सत्तेच्या केंद्रस्थानी होते. सत्ताधारी म्हणून ज्या नेत्याकडे मराठा समाजाने आशेने पाहावे अशा शरद पवारांनी कधीच मराठा आरक्षणाबद्दलच चकार शब्दही काढलेला नाही. आताही ते गप्पच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणे व्यर्थ आहे. पण राज्याचे स्वयंघोषित कुटुंबप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्वतःची तरी मराठा समाजाला न्याय देण्याची इच्छा होती का, हा खरा प्रश्न आहे!
दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते मुख्यमंत्री कसे बनले हा भाग सोडला तरी त्यापूर्वी ते शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून काम करत होते आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ते साहजिकच वारसा हक्काने शिवसेनाप्रमुख बनले. आजवर लाखो मराठा युवकांनी बाळासाहेब अथवा उध्दव ठाकरेंच्या एका आदेशावर अंगावर कित्येक केसेस घेतल्या असतील. कित्येक मराठा युवकांनी पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्ल्या असतील, रक्त सांडले असेल. पण याच विस्थापित मराठा तरुणांना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी कुठलीही भूमिका उध्दव ठाकरेंनी आजतागायत कधी घेतल्याचे आठवते का? बाळासाहेबांचे जाऊ द्या, त्यांचा तर आरक्षण या शब्दालाच विरोध होता. म्हणूनच तर ओबीसींच्या हक्कांचे निमीत्त करून छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादीत गेले. पण आज जे उध्दव ठाकरे पुलावरून पाणी वाहून गेल्यावर मराठा आरक्षणावर तातडीने फेसबुक लाईव्ह घेऊन बोलताहेत, केंद्र सरकारला पत्र लिहीत आहेत, राज्यपाल भवनाकडे याचना करताहेत ते उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून मराठा आरक्षणाबद्दल एकतरी शब्द बोलले का?
मुळात मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात जर टिकले असते तर त्याचे सर्व श्रेय हे देवेंद्र फडणवीस व त्यांनी अत्यंत शिताफीने कायद्याला घालून दिलेले सुरक्षा कवचाला गेले असते हे उध्दव ठाकरे व त्यांच्या मंत्र्यांना ठाऊक होते. मग फडणवीसांच्या कार्यकाळात जे आरक्षण विरोधक याचिकाकर्त्यांना उच्य न्यायालयाने पिटाळून त्यांना सर्वोच्च न्यायालयाने पिटाळून न लावण्याचे काय कारण असावे? देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षणाचे श्रेय मिळू नये म्हणून मविआ सरकारने सोयीस्कररित्या स्वतःची बाजू न्यायालयात दुबळी केली. ऐन सुनावणीच्या वेळी सरकारला वकील मिळत नव्हते. गायकवाड समितीचा अहवाल सादर करताना त्यातील आरक्षणाच्या बाजूचे व विरोधातील मते मांडणारे १६०० पानांच्या अहवालाचा इंग्रजी अनुवादही केला नाही आणि तो न्यायालयापुढे मांडला नाही आणि हाच मराठा आरक्षणाच्या बाजूचा सर्वात भक्कम पुरावा होता. मग राज्य सरकार व त्यांनी नियुक्त केलेले वकील अशी चूक करण्याएवढे दुधखुळे आहेत का? की हे जाणीवपूर्वक केल्या गेलं? राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना याबद्दल काहीच कल्पना नव्हती का?
मविआ सरकारकडून एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) न्यायालयीन लढा क्षीण करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे सरकारमधील वजनदार मंत्री जाणीवपूर्वक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करत होते. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण व्हावा यासाठी खटाटोप करत होते. हे उद्योग सदर मंत्री स्वतःच करत होते का? की मंत्रिमंडळ प्रमुख म्हणून उध्दव ठाकरेंची त्यांना मूक संमती होती?
बर शिवसेना ५ वर्षे जेव्हा सत्तेत होती तेव्हा सुद्धा उध्दव ठाकरेंनी कधी मराठा आरक्षणाबद्दल शब्दही काढला नाही. उलट ज्यावेळी राज्यभरात मराठा समाजाचे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत होते त्याच वेळी शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या “सामनामधून” या मोर्च्यांना “मुकामोर्चा” म्हणत अत्यंत घाणेरडे व्यंगचित्र प्रकाशित करून हिनवण्यात आले!
शरद पवार हे महाविकास आघाडीचे जन्मदाते असले व त्यांचा आघाडीवर वचक असला तरी तांत्रिकदृष्ट्या त्यांचा राज्य सरकारशी तसा काहीही संबंध येत नाही. त्यामुळे “मराठा आरक्षणाचे मारेकरी” या विषयावर भविष्यात जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पहिल्या मारेकऱ्याचा मान निश्चितच उद्धव ठाकरेंना मिळेल यात शंकाच नाही. कारण जे काही घडलं ते त्यांच्या नेतृत्वात घडलं, त्यांच्या डोळ्यापुढे घडलं आणि त्यांच्या संमतीने घडलं, हे आता जगजाहीर झाले आहे!