महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य आणि विजयी निवडणुकांचे रणनितीकार देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आपल्या राजकीय डावपेचाने विरोधकांना जबरदस्त धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांपैकी महायुतीने ९ जागा जिंकून या निवडणुकीत बाजी मारली आहे. या विजयामुळे देवेंद्रजींनी सलग तिसऱ्यांदा ‘दे धक्का’ दिला आहे.
विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी शुक्रवारी (दि. १२ जुलै) निवडणुका झाल्या. खरं पाहता विधानपरिषदेचे उमेदवार हे सर्व पक्षाकडून बिनविरोध निवडले जातात. पण नुक्त्याच झालेल्या लोकसभेतील थोड्या फार विजयामुळे महाविकास आघाडीतील पक्ष उगाच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले होते. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक अधिकचा उमेदवार देऊन घोडेबाजाराला खतपाणी घातले. त्याचबरोबर महायुतीला या निवडणुकीतही धूळ चारू असा उगीचच आव आणला हातो. पण देवेंद्र फडणवीसांनी आपल्या चाणक्यनीतीचा वापर करून महायुतीचे ९ उमेदवार तर जिंकून आणलेच. पण त्याचबरोबर विरोधी पक्षातील आमदारांची मतेही मिळवली.
महायुतीमध्ये भाजपाकडून योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, अजित पवार गटामधून शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने हे निवडणूक जिंकले आहेत. सदाभाऊ खोत वगळता महायुतीच्या आठ उमेदवारांनी पहिल्या पसंतीच्या फेरीत विजय मिळवला आहे. विजयासाठी २३ मतांची गरज असताना भाजपच्या पाचही उमेदवारांना प्रत्येकी २६ मते मिळाली आहेत. भाजपचे सध्या विधानसभेत १०३ आमदार आहेत. तरीही भाजपने ५ उमेदवारांच्या माध्यमातून १३० आमदारांची मते मिळवली आहेत.
देवेंद्र फडणवीसांची दे धक्का रणनिती!
देवेंद्र फडणवीसांची रणनिती अशीच धक्का देणारी आहे.यापूर्वीही त्यांनी २०२२ मध्ये महाविकास आघाडीला अशाप्रकारे दोनवेळा धक्का दिला होता. २०२२ मध्ये विधानपरिषद आणि राज्यसभेसाठी निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकांमध्येही देवेंद्रजींनी आपला करिष्मा दाखवत महाविकास आघाडीला धक्का दिला होता. त्यानंतर आता तिसऱ्यांदा विधानपरिषदेच्या निवडणुकीतून देवेंद्रजींनी महाविकास आघाडीला ‘जबरदस्त धक्का’ दिला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाला मोठा धोबीपछाड दिल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत पराभूत झालेले शेकापचे जयंत पाटील हे मागील ५ टर्मपासून विधानपरिषदेत आमदार होते. आर्थिकदृष्ट्या ‘मजबूत’ असलेले आणि शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार असलेल्या जयंत पाटलांसाठी हा मोठा धक्का आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाची ८ मते फुटल्याचे बोलले जात आहे.
विधानपरिषदेच्या माध्यमातून विधानसभेची तयारी
देवेंद्र फडणवीस यांनी आपली राजकीय रणनिती वापरून विधानपरिषदेत दोनदा भाजपाला यश मिळवून दिले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतून देवेंद्रजींनी फक्त विजय मिळवून नाही दिला, विधानसभेच्या निवडणुकींचे रणशिंगच फुंकले आहे. लोकसभेत पराभव पत्कारावा लागलेल्या पंकजा मुंडे यांचे राज्यात पुनर्वसन केले. त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांना मागच्या निवडणुकीत दिलेला शब्द पाळून देवेंद्रीजींनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा पाठबळ दिले. त्याचबरोबर मातंग समाजातील तरुण चेहरा अमित गोरखे, माळी समाजातील युवा कार्यकर्ता योगेश टिळेकर या तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्षाची बांधणी घट्ट केली आहे.