दिनांक ९ मार्च २०२३ रोजी शिंदे-फडणवीस सरकारचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी २०२३-२४ वर्षाकरिता अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना देवेंद्रजींनी त्याचे वर्णन देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळातील पंचामृती अर्थसंकल्प असे केले. खरच यंदाचा अर्थसंकल्प हा अनेक बाबीत ऐतिहासिक होता.
पहिली विशेष बाब म्हणजे वसुली आघाडीच्या अडीच वर्षांच्या मोगलाई राज्यकारभाराच्या वरवंट्यात महाराष्ट्राची जनता भरडली गेली असताना देवेंद्रजींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने सर्वच घटकांच्या जखमांवर मलम लावण्याचे काम केले. अन्यथा ठाकरे सरकारच्या राजवटीत वसुली खेरीज अन्य कुठल्याही कामासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याशिवाय अन्य कुठलेही धोरण नव्हते. देवेंद्र फडणवीसांनी मात्र जीएसटीची थकबाकी, केंद्र सरकारचे पॅकेज अशा कुठल्याही बोंबा न मारता राज्य सरकार महाराष्ट्राची प्रगती करण्यास सक्षम आहे हे दाखवून दिले.
दुसरी विशेष बाब म्हणजे हा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी देवेंद्रजींनी जनतेच्या प्रतिक्रिया मागविल्या, त्यातील ४०,००० हुन अधिक प्रतिक्रिया निवडल्या व त्यातील सर्वोत्तम प्रतिक्रियांचा अर्थसंकल्पात समावेश केला. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की राज्याच्या अर्थसंकल्पात थेट जनतेचा सहभाग होता. त्यामुळे देवेंद्रजींच्या लोकाभिमुख राज्यकारभारावर नव्याने शिक्कामोर्तब करणारा हा अर्थसंकल्प विशेष होता.
तिसरी विशेष बाब म्हणजे पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेला छेद देत देवेंद्रजींनी ना सुटाबुटात एंट्री मारली ना हाती कुठली सुटकेस घेऊन फोटोसेशन केले. देवेंद्रजींनी संपूर्ण अर्थसंकल्प हा टॅबलेट फोनच्या माध्यमातून सादर केला. यावरून त्यांना शासनाच्या बदलत्या आणि टेक सॅव्ही कार्यशैलीची महाराष्ट्राला प्रचिती दिली.
मुळात अर्थसंकल्प समजून घेणे हे जनसामान्यांसाठी थोडे अवघड असते. त्यामुळेच देवेंद्रजींनी तो सर्व घटकांमधील सामान्य जनतेला आपल्या वाट्याला नेमकं काय आलं हे सहज कळेल अशा सुटसुटीत अशा ५ भागांमध्ये विभागून मांडला. आपल्या पंचामृती अर्थसंकल्पात देवेंद्रजींनी समाजातील सर्वच घटकांचा विचार केला. तरी प्रामुख्याने विश्लेषण केल्यास पायाभूत सुविधांचा विकास, शाश्वत सिंचन, रसायनमुक्त शेती व अंत्योदय यावर अधिक भर दिल्याचे स्पष्टपणे जाणवते.
आपल्या पहिल्या अमृतामध्ये देवेंद्रजींनी शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी निर्माणासाठी एकूण : 29,163 कोटी रुपयांची तरतूद केली
दुसऱ्या अमृतामध्ये महिला, आदिवासी, मागासवर्ग,ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकासासाठी 43,036 कोटी रुपयांची तरतूद केली
तिसऱ्या अमृतात भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकासासाठी 53,058 कोटी कोटी रुपयांची तरतूद केली
चौथ्या अमृतामध्ये रोजगारनिर्मिती, सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा मनुष्यबळ विकासासाठी देवेंद्रजींनी 11,658 कोटी रुपयांची तरतूद केली
तर अखेरच्या म्हणजे पाचव्या अमृतामध्ये देवेंद्रजींनी पर्यावरणपूरक विकासासाठी 13,437 कोटी रुपयांची तरतूद केली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारत हे ५ ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी बनावे या ध्येयासाठी महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने वाटचाल करणार हा संदेश देणारा देवेंद्रजींचा पंचामृती अर्थसंकल्प आहे. सत्तेची सूत्रे हाती घेताच देवेंद्रजींनी संपूर्ण राज्यभरात सर्वच विभागांमध्ये विकासकामांचा झपाटा लावला. समृद्धी महामार्गानंतर आता नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग, मुंबई, नागपूर, पुणे मेट्रोचा विस्तार आणि नाशिकमधील निओ मेट्रो प्रकल्प, जलयुक्त शिवार-२.०, शेतकऱ्यांना केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारचे वार्षिक ६,००० रुपयांचे अनुदान या निर्णयांवरून हे स्पष्ट होत की देवेंद्रजींच्या हाती सत्तेची दोरी म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्धीची हमी होय.
देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कष्टाळू, महाराष्ट्रहित दक्ष आणि जनसेवेत सदैव समर्पित असलेले नेतृत्व आहे. त्यामुळे जातीवाद, भ्रष्ट नेते, शाब्दिक चिखलफेक, यातून बाहेर पडून महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर न्यायचे असेल तर जनतेनेही या तरुण तडफदार नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे!