महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, आरोग्य आणि पोषणासहित सर्वांगिण विकास व्हावा यासाठी महायुती सरकारने जून २०२४ च्या अतिरिक्त संकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. या योजनेद्वारे सरकार राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देणार आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून महिला बालविकास विभागाने २८ जून २०२४ याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.
ऑक्टोबरमध्ये सध्याच्या विधानसभेचा कालावधी संपणार आहे. त्यापूर्वी महिनाभर आधी राज्यात निवडणुका लागतील. तोपर्यंत राज्याचा कारभार सुरळित चालावा म्हणून महायुती सरकारने २८ जून २०२४ मध्ये राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या भाषणातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आली. या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने महिला व बालविकास विभागाने त्याच दिवशी या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यातील महिलांमध्ये ॲनामियाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्याचबरोबर राज्यातील रोजगार मुल्याची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या श्रमाच्या मुल्याची टक्केवारी फक्त २८.७० टक्के आहे तर पुरुषांची ५९.१० टक्के आहे. या तुलनेत महिलांची आर्थिक आणि आरोग्याच्या स्थितीचा स्तर सुधारण्याचा प्रयत्न सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आरोग्यात आणि पोषणात सुधारणा करण्याच्या दृष्टिने आणि कुटुंबातील त्यांचे आर्थिक स्थान आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
माझी लाडकी बहीण योजना
योजनेचा उद्देश समजून घ्या!
राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करुन त्यांच्या रोजगार निर्मितीस चालना देणे. तसेच त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे. त्यांच्या सशक्तीकरणास चालना देणे. त्याचबरोबर राज्यातील महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना आणली.
योजनेचा लाभ कोणाला?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनुसार राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम थेट महिला लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांचे वय २१ चे ६० वर्षे या दरम्यान आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पण सरकारने यामधील ६० वर्षाची अट वाढवून ती ६५ वर्षापर्यंत नेली. राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही. त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतून मिळणारे पैसे हे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
महिला व बालविकास विभागाने २४ जून रोजी काढलेल्या शासन निर्णयातील काही नियमांमध्ये २ जुलै २०२४ रोजी बदल केले आहेत. या नवीन नियमानुसार सरकारने या योजनेच्या पात्रतेशी संबंधित अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल केली. जर कोणाकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर, त्या महिलेने १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित आहे. शासन निर्णयातील ५ एकर शेतीची अट देखील मागे घेण्यात आली. त्याचबरोबर लाभार्थी महिलांची वयाची अट २१ ते ६० वरुन २१ ते ६५ करण्यात आली.
अर्ज ऑनलाईन पद्धतीनेही भरता येईल!
ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत; त्यांना यासाठी ऑनलाईन अर्ज पाठविता येणार आहे. हा अर्ज वेबपोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्रावरून ऑनलाईन भरता येतो. ज्या महिलांना स्वत:हून अर्ज करता येत नाही त्या महिला अंगणवाडी केंद्रात जावून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. पण अर्ज करताना त्या महिलेने प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या महिलेचा महाराष्ट्रात जन्म झालेला नसेल, पण तिने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल तर तिच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.
१५ तारखेला पैसे खात्यात होणार जमा
सदर योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १ जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै ठरवण्यात आली होती. पण या योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे, आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेता अर्ज करण्याची मुदत १५ जुलै वरून ३१ ऑगस्ट, त्यानंतर ३० सप्टेंबर आणि अखेर १५ ऑक्टबरपर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे पात्र लाभार्थींची आणि अंतिम यादी प्रकाशित होण्याचा कालावधी पुढे होत राहिला. त्यानंतर पात्र सर्व माता-भगिनींना टप्प्याटप्प्याने योजनेतील पैशांचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महत्त्वाचे टप्पे
महायुती सरकारने २८ जून २०२४ रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या भाषणातून अर्थमंत्र्यांनी महिलांची आरोग्यविषयक आणि आर्थिक स्थिती सुधारण्याच्यादृष्टिने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली. या योजनेतून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये थेट बँकेद्वारे दिले जाणार आहेत. या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने महिला व बालविकास विभागाने त्याच दिवशी म्हणजे २८ जून २०२४ रोजी या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.
२ जुलै २०२४
योजनेतील नियमांमध्ये बदल करण्याबाबत बैठक
राज्य सरकारने महिलांसाठी घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर समाजातील वेगवेगळ्या घटकांतील महिलांकडून याच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत सूचना आल्या. तसेच सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबतही त्यामध्ये सुधारणा करण्याच्यादृष्टिने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २ जुलै २०२४ रोजी बैठक घेऊन योजनेच्या पात्रतेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
३ जुलै २०२४
सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील नियमांमध्ये सुधारणा करून सुधारित शासन निर्णय ३ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. नवीन नियमानुसार राज्यातील २१ ते ६४ वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तस्चे त्या कुटुंबातील फक्त एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकते. त्याचबरोबर कोणाकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर, त्या महिलेने १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित आहे. तसेच शासन निर्णयातील ५ एकर शेतीची अट देखील मागे घेण्यात आली.
१७ ऑगस्ट २०२४
पहिला हप्ता बहिणींच्या खात्यात जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना १७ ऑगस्टला पहिला हप्ता देण्यात आला. महिलांच्या बँक खात्यात दोन जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे ३ हजार रुपये १ कोटी ७ लाख महिलांच्या खात्यात एकाच दिवशी जमा झाले. याचा शुभारंभ पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातून पार पडला.
३१ ऑगस्ट २०२४
दुसऱ्या टप्प्यात ५२ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील पैशांचे वाटप ३१ ऑगस्ट २०२४ रोजी नागपूरच्या रेशीमबाग येथील कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ५२ लाख महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे ३ हजार रुपये पाठवले गेले.
१ सप्टेंबर २०२४
दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख महिलांना वाटप
महायुती सरकारने जून २०२४ च्या अतिरिक्त संकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्याच दिवशी सरकारने या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. राज्य सरकारने जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे पैसे दोन टप्प्यात दिले. या योजनेचा आतापर्यंत १ कोटी ५९ लाख महिलांनी लाभ घेतला. यासाठी सरकारने ४७८७ कोटी रुपयांचे वाटप केले. सरकारने या योजनेद्वारे २.५ कोटी महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
२ सप्टेंबर २०२४
योजनेची मुदत वाढवली
राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू केली आणि १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली. पण अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने, तसेच ई-केवायसी प्रक्रिया आणि बँकेत खाते उघडणे या प्रक्रियेत वेळ लागत असल्याने महिलांकडून अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यासाठी मागणी होऊ लागली. त्यामुळे राज्य सरकारने ३ जुलै २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ अशी निश्चित करण्यात आली. दरम्यान, राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी २ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार अर्ज भरण्याची अंतिम तारीख सप्टेंबर २०२४ अशी करण्यात आली.
२९ सप्टेंबर २०२४
तिसऱ्या टप्प्याचे २९ सप्टेंबरपासून वाटप
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील हप्त्याचे वाटप २९ सप्टेंबरपासून सुरू झाले. तिसऱ्या टप्प्याचे ८ ऑक्टोबरपर्यंत एकूण २ कोटी २० लाख महिला लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यात आले. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे १४ ऑगस्टपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत गेले. तर सप्टेंबर महिन्यातील पैसे २९ सप्टेंबरपासून जमा होऊ लागले.
लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एक संधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली. अजूनही या योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळाला नाही. त्यांच्यासाठी सरकारने अर्ज करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. पण आता १५ ऑक्टोबर २०२४ च्या रात्रीच्या १२ वाजेपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे. फक्त हे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फत भरावे लागणार आहेत.
शासन निर्णय
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना – शासन निर्णय (२८ जून २०२४)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 – सुधारणा ३ जुलै २०२४
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 सुधारणा १२ जुलै २०२४
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 सुधारणा २५ जुलै २०२४
अर्थसंकल्पीय भाषणातील घोषणा
अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ जून २०२४ रोजी सादर केलेल्या २०२४-२५ या वर्षाच्या अंतरित अर्थसंकल्पात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. (पान क्रमांक ४ वर सदर योजनेची घोषणा दिली आहे.)
संबंधित ट्विट्स
संबंधित विडिओ