मुंबईतील बीडीडी चाळी शंभर वर्षांहून अधिक काळापासून शहराच्या मध्यवर्ती भागात उभ्या आहेत. ब्रिटिश काळात बांधलेल्या या चाळींचे वास्तव्य फक्त राहण्यापुरते मर्यादित नाही. त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी निगडित आहेत. ज्या काही पिढ्यांसाठी तो त्यांच्या जगण्याचा आणि संस्कृतीचा भागा झाला होता. पण गेल्या काही वर्षांपासून या चाळींची अवस्था खूपच दयनीय झाली होती. पावसात गळणाऱ्या भिंती, छोट्याशा जागेत खूप लोकांनी एकत्र राहणे, पिढ्यान पिढ्या एकाच जागेत राहणे, अपुरी जागा आणि विविध कारणांमुळे ही घरे आता असुरक्षित बनली होती. रहिवाशांच्या अनेक वर्षांच्या मागण्यानंतरही, बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प काही सरकारच्या लालफिती कारभारातून पुढे जात नव्हता. पण देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे शिवधनुष्य हाती घेतले होते. ते २०२५ मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पूर्णत्वास नेले. नुकतेच १४ ऑगस्ट २०२५ रोजी वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतील ५५६ रहिवाशांना त्यांच्या नवीन घरांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारंभपूर्वक देण्यात आल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात लक्ष घालून त्याचा प्रस्ताव म्हाडाला सादर करण्याचे निर्देश देऊन या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने दिशा दिली. त्यांनी फक्त बैठकांचा फार्स किंवा घोषणा न करता हा प्रकल्प वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण व्हावा, यासाठी प्रशासनातली गती वाढवली. याविषयीच्या निर्णय प्रक्रियेला वेग देत, प्रकल्पाला व्यवहारिक गती दिली. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेची जबाबदारी म्हाडावर सोपवून, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि कॅपेसिट इन्फ्रा प्रोजेक्ट्ससारख्या तज्ज्ञ कंपन्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करून दिली. ही संपूर्ण योजना सुमारे ८६ एकर जमिनीवर उभी राहणार असून, सुमारे १५,५९३ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा आराखडा आखण्यात आला आहे. यामध्ये जुन्या १६० चौरस फुटांच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्यांना मालकी हक्काचे ५०० चौरस फुटांचे आधुनिक आणि सुसज्ज घर दिले जात आहे. आधुनिक आणि सुरक्षित अशा लिफ्ट्स, ग्रॅनाईटची स्वयंपाकघरे, विट्रीफाईड फ्लोअर्स, अग्निसुरक्षेची व्यवस्था, पार्किंग आणि हिरवळ असलेले मैदान अशा सर्व सुविधा या रहिवाशांना दिल्या जात आहेत.
ऐतिहासिक जागेवर नव्या भविष्याची उभारणी!
बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेतील पहिला महत्त्वपूर्ण टप्पा १४ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडला. वरळीतील बीडीडी चाळीतील ५५६ रहिवाशांचे यशस्वीरीत्या पुनर्वसन करण्यात आले. त्यांना समारंभपूर्वक घरांचे वाटप करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, बीडीडी चाळींमध्ये वर्षानुवर्षे राहणारे ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर मंडळी उपस्थिती होती. या घरांच्या चाव्यांचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, चाळवासीयांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, बीडीडी चाळींच्या जागेवरील ही नवीन घरे अशीच पिढ्यान पिढ्या जपावीत, असा भावनिक सल्ला दिला. हा पुनर्विकास म्हणजे फक्त जुन्या चाळींचे नवीन इमारतीतील रुपांतर नाही. तर हा शंभर वर्षांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहासाला नवा आयाम देणारा प्रकल्प आहे. जुनी बीडीडी चाळ ही राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत स्थलांतरित झालेल्या लाखो कुटुंबांचे पहिले निवासस्थान होती. आज या ऐतिहासिक जागेवर एक नवं भविष्य उभं राहिलंय.
एका चाळीचे संग्रहालयात रुपांतर
बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या प्रकल्पात सामाजिक वारसालाही तितकेच महत्त्व देण्यात आले आहे. जसे की जांबोरी मैदान, आंबेडकर मैदान यांचे मूळ स्वरूप जपण्यात आले आहे. तसेच, एका जुन्या चाळीचे संग्रहालयात रूपांतर करून, इतिहासाची आठवण जिवंत ठेवण्यात येणार आहे. या घरांसाठी म्हाडाद्वारे १२ वर्षांची देखभाल सेवा देखील पुरवण्यात येणार आहे. जेणेकरून रहिवाशांना दीर्घकालीन सुरक्षितता मिळणार आहे. पुनर्विकासाच्या या पहिल्या टप्प्याने हजारो कुटुंबांचे अनेक दशकांपासून खोळंबलेल्या स्वप्नाची पूर्तता व्हायला सुरुवात झाली आहे. पुनर्वसनाच्या सोहळ्यात अनेक लाभार्थ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहताना दिसले. इतकी वर्षं लहानशा घरात, अनेक अडचणींंचा सामना करत राहिलेल्या रहिवाशांना आता स्वतःचे ५०० चौरस फुटांचे घर मिळाले. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक चाळवासियांच्या मनातील भावना शब्दात व्यक्त करता येणार नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहणारा आनंद मात्र खूप काही सांगून जाणारा होता.
जनतेच्या चेहऱ्यावरील असा ओसांडून वाहणारा आनंद पाहण्याचा योग प्रत्येक राजकीय नेत्याच्या कुंडलीत असतोच, असे नाही. देवेंद्र फडणवीस यांना असा आनंद आणि या हजारो लोकांचे आशीर्वाद सतत मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा बीडीडी चाळ पुनर्विकास हा प्रकल्प फक्त त्याजागी नवीन इमारती बांधण्यापुरता सिमित नव्हता. त्यांनी या प्रकल्पातून महाराष्ट्राच्या आणि विशेष करून मुंबईच्या पुनर्जन्माची गोष्ट नव्याने मांडली आहे. धोरणात्मक निर्णय घेऊन त्याला राजकीय इच्छाशक्तीची जोड देऊन, सार्वजनिक हित लक्षात ठेवून प्रामाणिकपणे काम करून काय उभं करता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प आहे. त्यांनी ज्या पद्धतीने या प्रकल्पाला दिशा दिली. त्यातून एक गोष्ट नक्कीच अधोरेखित होते ती म्हणजे, खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवायचे असेल, तर इच्छाशक्ती आणि प्रत्यक्ष कृती यांची सांगड घालणे आवश्यक आहे.
संबंधित लेख: