इन्फ्रा मॅन | मुंबई

मुंबईकरांसाठी २६८ नवीन एसी रेल्वे, जुन्या तिकीट दरात मिळणार ही सेवा!

मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर मुंबईतील सर्व लोकलला स्वयंचलित दरवाजे लावण्याचे आणि त्या एसी करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यात दिले होते. त्यानुसार मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या (एमयूटीपी) टप्पा ३ आणि ३ए अंतर्गत मुंबईसाठी २६८ नवीन एसी रेल्वे गाड्या खरेदी करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. या ट्रेन मेट्रोप्रमाणेच बंद दरवाज्याच्या असून जुन्या विना-दरवाजाच्या गाड्या टप्प्याटप्प्याने हटवून, आताच्या साध्या तिकीट दरातच नवीन अत्याधुनिक एसी गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या निर्णायक शैलीसाठी आणि घेतलेल्या निर्णयाची वेळेत व झपाट्याने अंमलबजावणी करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्यपद्धतीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे एखादी समस्या समजून घेऊन, त्यावर ३६० डिग्रीने विचार करून, त्यातील विविध यंत्रणांशी समन्वय साधत, तात्काळ निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी पूर्णत्वास नेण्याची क्षमता. मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट २०२५) मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवले.या बैठकीत त्यांनी मुंबईत दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या दैनंदिन सुरक्षेशी आणि सोयीसुविधांशी निगडित एका महत्त्वाच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. या निर्णयाचे मूळ जून २०२५ मध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ गर्दीमुळे लोकलमधून खाली पडून ५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

मुंबई लोकल सुधारणेसाठी देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न!

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सेवेबद्दल, विशेष करून मुंबईच्या रेल्वे प्रवासाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर दूरगामी निर्णय घेत, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा पर्याय मांडला होता. पण या पर्यायाची खिल्ली उडवत आली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय प्रशासन आणि रेल्वे विभागाशी संवाद साधून त्यावर व्यावहारिक मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) च्या टप्पा ३ आणि ३ए अंतर्गत २६८ एसी लोकल ट्रेन खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला. या गाड्यांना मेट्रोप्रमाणे स्वयंचलित दरवाजे, एसी सुविधा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना असणार आहेत. विशेष म्हणजे या एसी लोकल ट्रेन प्रवासासाठी प्रवाशांकडून साध्या लोकलच्या दरानेच तिकीट आकारले जाणार आहे.

मुंबई लोकलसाठी स्वयंचलित दरवाजे

मुख्यमंत्री याची फक्त घोषणा करून थांबले नाहीत, तर त्यांनी केंद्र सरकारकडे यासाठी मंजुरीसाठी पाठपुरावा केला. त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत त्यावर सकारात्मक चर्चा केली. ही चर्चा फक्त औपचारिकता न राहता त्या बैठकीतून या निर्णयाला केंद्र सरकारची प्राथमिक सहमती मिळाली आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत त्याला अधिकृत मंजुरी देत पहिल्या टप्प्यात २६८ नवीन एसी ट्रेन गाड्या खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने जुन्या लोकल रेल्वे गाड्या हटवून त्या जागी स्वयंचलित दरवाजे असलेल्या आणि नवीन वातानुकुलित गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वेगवान निर्णयक्षमतेचे आणि अंमलबजावणीचे हे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या कार्यशैलीत समस्या फक्त ऐकून घेतली जात नाही, तर त्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा तपास केला जातो. संबंधित यंत्रणांशी चर्चा केली जाते आणि त्यातून सर्वसमावेशक असा तोडगा काढला जातो. जो लोकहिताच्या दृष्टिकोनातून प्रभावी ठरतो. यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या यंत्रणा, केंद्र सरकार, रेल्वे विभाग, प्रवासी संघटना आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा उद्देश ठेवून हा निर्णय घेतला आहे. जो लाखो मुंबईकरांच्या हिताचा ठरणार आहे.

अशाप्रकारे, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हे फक्त धोरणात्मक निर्णयांसाठी नाही, तर त्याच्या गती, अचूकता आणि सर्व घटकांना सामावून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यावर भर देते, म्हणून प्रभावी ठरते.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *