इन्फ्रा मॅन

UMTA: सार्वजनिक वाहतुकीतील सेवांच्या सुसूत्रीकरणासाठी स्वतंत्र प्राधिकरण

नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. यासाठी राज्यात लवकरच एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण म्हणजेच युनिफाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी (Unified Metropolitan Transport Authority-UMTA) संस्था स्थापन करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण या कायद्याचे अधिष्ठान असणार आहे. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात ते मांडले जाण्याची शक्यता आहे. सदर प्राधिकरणाची निर्मिती करण्यापूर्वी राज्यातील नागरिकांकडून त्यावर सूचना आणि हरकती मागविल्या जाणार आहेत.

राज्यातील महानगरांच्या शहरी भागातील वाहतूक प्रकल्पांचे नियोजन, नियमन आणि त्यासाठी लागणारे बजेट तयार करण्याच्या पद्धतीमध्ये यूएमटीएची स्थापना एक परिवर्तनकारी पाऊल ठरणार आहे. यामुळे महानगरातील वाहतुकींचे प्रश्न, त्यावरील उपाय आणि भविष्यातील योजना यावर एकात्मिक पद्धतीने नियोजन करण्यास मदत होणार आहे. सध्या अनेक शहरातील वाहतूक व्यवस्था हे वेगवेगळ्या विभागांमध्ये विखुरलेली आहे. जसे की, आपल्याकडे महानगरपालिका, राज्य परिवहन महामंडळ, मेट्रो, रेल्वे अशा वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्था आणि त्याचे वेगवेगळे विभाग कार्यरत आहेत. त्यामुळे त्यावरील नियंत्रण, त्यातील सुधारणा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नागरिकांच्या अडचणींचे निवारण करण्यात होणारा विलंब टाळण्यासाठी या प्राधिकरणाची गरज पडणार आहे.

तत्कालीन केंद्र सरकारने २००६ मध्ये राष्ट्रीय शहरी परिवहन धोरण (National Urban Transport Policy – NUTP) तयार केले होते. या धोरणांतर्गत ज्या शहराची लोकसंख्या १० लाखांहून अधिक आहे. अशा शहरांतील वेगवेगळ्या प्रकारची वाहतूक व्यवस्था एकसंध राहण्यासाठी महानगर परिवहन संस्था (Unified Metropolitan Transport Authority-UMTA) स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार चेन्नई, जयपूर, हैदराबाद, मुंबई, बंगळुरु, म्हैसूर, रांची, जमशेदपूर, पुरी, भुबनेश्वर आणि कोहिमा या शहरांसाठी त्या त्या राज्यांनी युनिफाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटी स्थापन करण्यासाठी अधिसूचना काढली होती. दरम्यान, अनेक राज्यांनी शहरातील वाहतूक नियोजनासाठी अशा परिवहन संस्था स्थापन करण्यासाठी पुढाकारही घेतला होता. पण त्यात अपेक्षित प्रगती होत नसल्याचे दिसून आल्याने केंद्र सरकारने दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण मिशन (JNNURM) अंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी UMTA सारखी संस्था स्थापन करण्याची अट घातली. केंद्र सरकारकडूनही याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही राज्यांकडून एकात्मिक परिवहन वाहतूक प्राधिकरणाची स्थापना केली जात नव्हती. २०१३ मधील माहितीनुसार, त्यावेळी दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांची संख्या ५३ इतकी होती. पण तरीही फक्त १५ युनिफाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटी संस्था अस्तित्वात होत्या. त्यातही चेन्नई आणि हैदराबादमधील युनिफाईड मेट्रोपॉलिटिन ट्रान्सपोर्ट संस्थांची स्थापना ही कायद्याद्वारे करण्यात आली तर उर्वरित शहरातील प्राधिकरणाची स्थापना निव्वळ अध्यादेशाद्वारे काढण्यात आली होती.

मुंबईचा विचार करता मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority-MMRDA) ही संस्था UMTA प्रमाणे काम पाहत आली आहे. त्यासाठी एमएमआरडीए अंतर्गत Unified Mumbai Metropolitan Transport Authority- UMMTA) संस्था स्थापन करण्यात आली होती. ही संस्था एमएमआरडीए अंतर्गत मुंबईमधील वाहतूक व्यवस्था, दळणवळणाच्या सोयीसुविधांमध्ये समन्वय आणि सुधारणा करण्याच्या दृष्टिने काम पाहत होती. पण त्याचे स्वतंत्र असे अस्तित्व नव्हते. पण आता मुंबई महानगरासाठी आणि इथल्या परिवहन व्यवस्थांसाठी कायद्याद्वारे एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या संस्थेच्या निर्माणाकरीता देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन कायद्यांतर्गत UMTA संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांना वेग देणे, एकच नियामक यंत्रणा तयार करणे आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ सुनिश्चित करणे हे या प्राधिकरणाच्या कामाचे केंद्रबिंदू असणार आहे. वाहतुकीशी संबंधित प्रकल्पांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही महापालिकेकडे असणार आहे, तर त्या प्रकल्पांचे नियोजन आणि सल्लागाराची भूमिका ही UMTA प्राधिकरण पार पाडणार आहे.

तसेच सध्या वेगवेगळ्या महानगरांमध्ये विविध यंत्रणांमार्फत कार्यरत असलेल्या परिवहन सेवा एकत्रित व सुसूत्र करण्यासाठी हे प्राधिकरण उपयुक्त ठरणार आहे. या नवीन प्राधिकरणात स्वतंत्र ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ तसेच महापौर, मनपा आयुक्त यांचाही समावेश असणार असल्याचे बोलले जात आहे. सदर प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वाहतूक सेवा या एकाच तिकिटाच्या किमतीत उपलब्ध होऊ शकतील आणि त्यांचे नियोजन एकसंध राहण्यास मदत होईल. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक प्रवासासाठी मुंबई १ स्मार्ट कार्ड (Mumbai 1 Smart Card) लागू करण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर UMTA हे प्राधिकरण महानगरातील वाहतूक व्यवस्था आणखी कार्यक्षम होण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *