मुंबईकरांचा प्रवास अधिकाधिक सुखद व आरामदायी व्हावा यासाठी मुंबई १ स्मार्ट कार्ड (Mumbai 1 Smart Card) स्कीम १ मे २०२५ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. वन सिटी, वन कार्ड ही संकल्पना प्रत्यक्षात आणून मुंबईकरांसाठी विकसित करण्यात आलेले मुंबई वन कार्ड हे लवकरच सुरू होणार आहे. या एका कार्डद्वारे प्रवाशांना लोकल, मेट्रो, मोनोरेल, बेस्ट बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक पर्यायांसाठी फक्त एकच तिकीट काढावे लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई १ कार्ड हे शहरातील प्रवासासाठी गेमचेंजर ठरणार आहे.
१ ते १५ मे दरम्यान मुंबईत एकाच तिकिटावर लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल आणि बेस्ट बसने फिरता येईल अशी सुविधा सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नुकतीच केली. यासाठी मुंबई १ कार्ड या स्मार्टकार्डचा वापर केला जाणार आहे. ज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जानेवारी २०२३ मध्ये उद्घाटन केले होते. १५ जून पर्यंत ही सुविधा एमएमआरएममधील सर्व शहरांमध्ये सुरू केली जाणार आहे. मुंबईत सुरू करण्यात येणाऱ्या वन सिटी, वन कार्ड याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काही दिवसांपूर्वी बैठकसुद्धा झाली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मे महिन्यापासून मुंबई १ स्मार्ट कार्ड सुरू होणार असल्याचे संकेत दिले होते.
मुंबई १ स्मार्ट कार्ड
मुंबई १ कार्ड हे असे कार्ड आहे. ज्याद्वारे मुंबईकर लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल आणि बेस्ट बसने प्रवास करू शकतात. सध्या या कार्डने मेट्रोची लाईन १, २अ आणि लाईन ७ वर प्रवास करता येणार आहे. आगामी काळात हे कार्ड संपूर्ण एमएमआरडीए रिजनमध्ये सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेसाठी वापरता येणार आहे. तसेच या कार्डमध्ये टॅप-टू-पे टेक्नॉलॉजीचा वापर केल्याने प्रवाशांना फक्त कार्ड टॅप करून पेमेंट करता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. हे प्रीपेड कार्ड असल्यामुळे यामध्ये पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढी रक्कम भरून प्रवास करता येणार आहे. प्रवास करताना तिकिट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज लागणार नाही. या कार्डमध्ये सिंगल तिकीटची सोय असल्यामुळे प्रवाशांना एकाच तिकिटाने वेगवेगळ्या वाहतूक पर्यायांनी प्रवास करता येणार आहे. जसे की, स्टॉप ए पासून स्टॉप बी पर्यंत जाण्यासाठी प्रवाशी एकाच तिकिटाने मेट्रो आणि बसने प्रवास करू शकतो. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्ड लॉन्च करण्यात आले. जर हे कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास १०० रुपये भरून नवीन कार्ड प्रवाशांना दिले जाणार आहे.
मुंबई ट्रान्सपोर्टेशनचा स्मार्ट सिंगल प्लॅटफॉर्म
राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने मुंबईतील सर्व वाहतूक सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनचा समावेश झाला नव्हता. पण आता रेल्वे मंत्रालयाने या नवीन प्रणालीला मान्यता देत मुंबईची लोकल ट्रेन सिंगल प्लॅटफॉर्मवर आणण्यास परवानगी दिली. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना आता एकाच कार्डवर सर्व प्रकारच्या ट्रान्सपोर्ट सेवा मिळणार आहेत. या कार्ड आणि अॅपच्या माध्यमातून प्रवाशाला स्वत:चा ट्रॅव्हल मॅप तयार करता येणार आहे. यात एआयचा वापर करून प्रवाशाला जवळ कोणत्या प्रकारची वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे. ती किती अंतरावर आहे, अशी सर्व माहिती मिळणार आहे. यामुळे प्रवाशांचा यात वेळ वाचणार असून त्याला त्याच्या गंतव्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.