रत्नागिरी हे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे बंदर आहे; इथली समुद्रसंपत्ती आणि निसर्गसौंदर्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आले आहे. त्यात आता येथे उभारण्यात येणाऱ्या क्रूझ टर्मिनलची भर पडणार आहे. हे क्रूझ टर्मिनल म्हणजे कोकणातील पर्यटन आणि अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. रत्नागिरीमधील भगवती बंदरात क्रूझ टर्मिनल उभारले जाणार असून राज्य सरकारने यासाठी ३०२ कोटी रुपयांची विशेष तरतूद केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार या प्रकल्पाला सढळ हस्ते मदत करून कोकणाच्या पर्यटन क्षेत्रात नवीन पर्व सुरू करण्यास कटिबद्ध आहे.
२०२२ मध्ये महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथोरिटीची १५८ व्या बैठकीत रत्नागिरीमधील भगवती बंदर येथे क्रूझ टर्मिनल बांधकाम सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्या बैठकीनंतर महाराष्ट्र सागरी मंडळाने राज्य सरकारला २३ ऑक्टोबर २०२३ रोजी पत्र पाठवून भगवती येथील क्रूझ टर्मिनल प्रकल्पाची माहिती दिली. त्यावर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेत राज्याचे महाराष्ट्र सागरी विकास धोरण, २०२३ मंजूर करून त्याअंतर्गत सागरी विकास क्षेत्राला चालना देण्याचा निर्णय घेतला. या धोरणाद्वारे राज्य सरकारने क्रूझ पर्यटनाला चालना आणि प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने २७ जुलै २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य बंदर विकास धोरण २०२३ ला मंजुरी देत या धोरणाचा शासन निर्णय १८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध केला. २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पात भगवती बंदराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने भगवती बंदर येथे क्रूझ टर्मिनल विकसित करण्यासाठी ३०२ कोटी ४२ लाख १० हजार १७१ रुपयांच्या अंदाजपत्रकास २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता दिली. राज्य सरकारने अंदाजपत्रकाच्या माध्यमातून बंदरातील गाळ काढणे व खोदकाम करणे, धक्का (जेट्टी) तयार करणे, वेगाने येणाऱ्या लाटांना रोखण्यासाठी लाटरोधक भिंतीची लांबी वाढवणे, टर्मिनल इमारत बांधणे, बंदराला जोडून रस्ता, वाहनतळ व फुटपाथ तयार करणे, संरक्षक भिंत व आवार भिंत उभारणे, या परिसराचे विद्युतीकरण, सांडपाण्याची उपाययोजना तसेच इथल्या परिसरात अग्नीरोधक यंत्रणा उभारण्यास मान्यता देण्यात आली.
काय आहे क्रूझ टर्मिनल संकल्पना!
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणाचा आनंद देशी तसेच परदेशी पर्यटकांनाही घेता यावा. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रूझ व परदेशी जहाजे कोकणात थांबावी यासाठी कोकणात ४ ठिकाणी क्रूझ टर्मिनल उभारण्यात येणार आहे. ही क्रूझ टर्मिनल रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदरात क्रूझ टर्मिनल उभारण्याच्या कामाला राज्य सरकारने चांगलाच वेग दिला आहे. रत्नागिरी बंदराचे अत्याधुनिकीकरण करत येथे उभारण्यात येणारे क्रूझ टर्मिनल हे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हे टर्मिनल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असणार आहे. ज्यामुळे परदेशातील मोठ्या क्रूझ जहाजांना येथे थांबता येईल आणि पर्यटकांना सहजरीत्या कोकणातील सौंदर्य अनुभवता येईल.
कोकणातील पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम
रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे उभारण्यात येणारे क्रूझ टर्मिनल हे भारताच्या वाढत्या क्रूझ अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनणार आहे. या क्रूझ टर्मिनलमुळे भारतीय पर्यटनाच्या विकासामध्ये बरेच बदल घडून येणार आहेत. यामुळे क्रूझ व्यवसायाचा विस्तार होण्यास मदत तर होणारच आहे. पण त्याचबरोबर या परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सोयीसुविधा उभारल्या जाणार आहे. सध्या मुंबई आणि गोव्यामधील क्रूझ टर्मिनलवर प्रचंड ताण आहे. तो या भगवती क्रूझ टर्मिनलमुळे कमी होणार असून त्याचा फायदाही इथल्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. या टर्मिनलमुळे इथली स्थानिक अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होऊन इथे रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर क्रूझ टर्मिनलमुळे इथले हॉटेल उद्योग, हस्तकला व्यवसाय, स्थानिक पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि लोकल प्रवासी वाहतूक यांना चालना मिळणार आहे.
रत्नागिरी भगवती क्रूझ टर्मिनलची वैशिष्ट्ये
- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी युक्त असलेल्या क्रूझ टर्मिनलची उभारणी. आधुनिक सुविधा असलेल्या प्रवासी पर्यायांची उभारणी केली जाणार आहे. ज्यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना चांगल्या सुविधांचा अनुभव घेता येईल.
- क्रूझ टर्मिनलमुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्री पर्यटनाला चालना मिळेल. यामुळे देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरील पर्यटक रत्नागिरीमध्ये येऊ शकतील.
- भगवती क्रूझ टर्मिनल हा प्रकल्प स्थानिक व्यावसायिक, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, टॅक्सी सेवा, आणि पर्यटन क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांसाठी मोठी संधी निर्माण करणारा ठरेल.
- या क्रूझ टर्मिनलमुळे कोकणातील सागरी वाहतुकीला चालना मिळणार आहे. मुंबई, कोकण, गोवा आणि अन्य किनारी भागांशी जोडून जल वाहतुकीच्या सोयीसुविधा निर्माण होतील.
- रत्नागिरीतील हे क्रूझ टर्मिनल कोकणाच्या पर्यटन आणि व्यापार क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होऊन इथल्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच या टर्मिनलमुळे जागतिक स्तरावर रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणाची वेगळी ओळख निर्माण होईल. त्यामुळे हा प्रकल्प कोकणासाठी उज्ज्वल भविष्यातील दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल ठरणार आहे.
संबंधित लेख: