राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘एफबीआय’मुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या रात्रीची झोप उडाली होती. देवेंद्रजींनी तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेला भ्रष्टाचार आणि पोलिसांच्या बदल्यांमध्ये सुरू असलेल्या अनियमिततेविरोधात सुरू केलेल्या ‘एफबीआय’च्या कारवायांमुळे ठाकरे सरकारचे धाबे दणाणले होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या ‘एफबीआय’ने महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम केले होते. २०२२ मध्ये मार्च महिन्यात देवेंद्रजींनी विधानसभेच्या अध्यक्षांना एक पेन ड्राईव्ह दिला होता. त्या पेन ड्राईव्हमध्ये वक्फ बोर्डाच्या एका सदस्याचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या संभाषणाचे पुरावे होते. त्या संभाषणाची चित्रफीत फडणवीस यांनी अध्यक्षांना दिली होती. या घटनेमुळे खरेतर तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. जी माहिती राज्याच्या गृहमंत्र्यांना नव्हती. त्या माहितीचे पुरावे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात अध्यक्षांना दिले होते. खरे तर राज्याचे प्रमुख म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासाठी हा धक्का होता. त्यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे डिटेक्टिव्ह आहेत का? असे सवाल करत याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. पण त्यांच्या या आश्चर्यकारक प्रश्नाला देवेंद्रजींनी ही थेटपणे उत्तर देत म्हटले होते की, होय मी एक ‘एफबीआय’ काढला आहे. त्याचे नाव ‘फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ आहे.
देवेंद्र फडणवीस हे १ डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या दरम्यान राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील भ्रष्ट काराभाराबद्दल आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यातील अनियमिततेबद्दल सरकारला धारेवर धरले होते. त्याचबरोबर त्याचे पुरावे देखील सादर केले होते. परिणामी मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. दरम्यान, फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिम याच्याशी कथित संबंध असल्याची माहिती दिली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे तत्कालीन सरकारचे धाबे दणाणले होते. या प्रकरणामुळे नवाब मलिक यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून राज्यातील चुकीच्या गोष्टींचा पर्दाफाश करत सरकारवर वचक ठेवला होता.
एफबीआयची सुरूवात २०१२ पासून
देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना साधारण २०१२ मध्ये भारतीय जनता पक्षाने सिंचनामध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात राज्यभर मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सिंचनाची सद्यस्थिती जनतेसमोर मांडण्याची मागणी विरोधकांनी सरकारकडे केली होती. सरकारने विरोधकांची ही मागणी मान्य करून सिंचनाची श्वेतपत्रिका विधिमंडळात सादर केली होती. पण या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने दिशाभूल करणारी माहिती मांडली. त्यामुळे सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि खरी माहिती जनतेसमोर मांडण्याच्या उद्देशाने विरोधी पक्ष म्हणून सिंचनाची काळी पत्रिका तयार करण्यात आली. या काळ्या पत्रिकेच्या माध्यमातून विरोध पक्षाने सिंचनातील ७० हजार कोटींचा घोटाळा लोकांसमोर मांडला होता. या काळ्या सिंचन पत्रिकेचे संपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यासाठी लागणारी माहिती देवेंद्रजींनी माहितीच्या अधिकारातून आणि काही ठिकाणी गोपनीय पद्धतीने मिळवली होती. या काळ्या पत्रिकेमुळे सत्ताधारी पक्षाची नाचक्की होऊ लागली होती. त्यामुळे या काळ्या पत्रिकेला काऊंटर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘सिंचनाचे राजकारण विनाकारण – सत्यमेव जयते’ अशी स्पष्टीकरण देणारी पत्रिका तयार करण्याचे योजले होते. पण या पत्रिकेचीही फडणवीस यांच्या ‘एफबीआय’ने चिरफाड करत राष्ट्रवादीच्या नेत्यांची फजिती उडवली होती.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील ती रात्र…
नागपूरमध्ये २०१२ चे हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्यावेळी विरोधी पक्षाने काढलेल्या सिंचनाच्या काळ्या पत्रिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधात वातावरण तापले होते. विशेषकरून राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याने सिंचनाच्या काळीपत्रिकेत आपल्या नेत्यावर करण्यात आलेले आरोप खोडून काढण्यासाठी ‘सिंचनाचे राजकारण विनाकारण – सत्यमेव जयते’ अशी पत्रिका तयार करण्याचे काम हाती घेतले होते. ही पत्रिका पूर्ण करून त्याचे दुसऱ्या दिवशी आपल्या पक्षातील एका मोठ्या नेत्याच्या हस्ते उद्घाटन केले जाणार होते. याची कुणकुण नागपूरच्या ‘एफबीआय’ला लागली. ही पत्रिका नागपूरमधील कोणत्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापली जाणार, याची माहिती मिळाली होती. त्या पत्रिकेची प्रत पुस्तक रुपात बांधण्यापूर्वीच ती ‘एफबीआय’ला मिळणार होती. यासाठी दस्तुरखुद्द एफबीआय प्रमुख यांनी आपल्या ब्युरोमधील दोन सहकाऱ्यांना रात्री २.०० वाजता सोबत घेतले. रात्रीच्या काळोखातून नागपूरमधील छोट्याछोट्या गल्ल्यांमधून गाडी पुढे जात होती. एफबीआय प्रमुखाला नागपूरमधील सर्व गल्ल्या, रस्ते पाठ होते. पण त्यांच्या दोन सहकाऱ्यांना मात्र आपण नेमके कुठे जात आहोत, याबद्दल काहीच माहिती नव्हते. शेवटी गाडी एका बोळाला लागून असलेल्या रस्त्यालगत थांबली. तिथे एक इसम वाट पाहत थांबला होता. त्याने काही कागदपत्रे एफबीआय प्रमुखाच्या हाती सोपवली आणि तो निघून गेला. त्यानंतर एफबीआय प्रमुखांनी पुन्हा गाडी फिरवून घ्यायला सांगितली. दरम्यानच्या काळात प्रमुखांनी त्या कागदपत्रांमध्ये काय आहे. यावर नजर टाकून त्यावर काय आणि कसे काम करायचे याची माहिती ब्युरोमधील एका महत्त्वाच्या व्यक्तीला दिली. त्यानंतर एफबीआय प्रमुखांनी गाडी वळवून त्या दोन सहकाऱ्यांना जिथून पिकअप केले होते; तेथे पुन्हा सोडले.
‘एफबीआय’ने रात्रभर त्या कागदपत्रांवर काम केले. ‘सिंचनाचे राजकारण विनाकारण – सत्यमेव जयते’ यातून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणाचे खंडन करून त्यावर आणखी ठोस पुरावे देत त्या पत्रिकेची पुरती चिरफाड करण्यात आली आणि पुराव्यासह उत्तर देणारी ‘सत्यावर घाव – जनतेला लुटण्याचा डाव’ राष्ट्रवादीची ‘असत्य’पत्रिका या नावाने नवीन पत्रिका तयार केली.
राष्ट्रवादीच्या ‘सिंचनाचे राजकारण विनाकारण – सत्यमेव जयते’ या पत्रिकेचे नागपूरच्या विधानभवन परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सकाळी ११.०० वाजता उद्घाटन होणार होते. पण त्या पत्रिकेच्या उद्घाटनापूर्वीच सकाळी १०.३० वाजता विरोधी पक्षाने ‘सत्यावर घाव – जनतेला लुटण्याचा डाव’ राष्ट्रवादीची ‘असत्य’पत्रिकाचे प्रमुख विरोधी पक्षनेते, आमदार आणि पत्रकारांसमोर उद्घाटन करून राष्ट्रवादीच्या पत्रिकेची चीरफाड केली. यामुळे जेव्हा राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याने ‘सिंचनाचे राजकारण विनाकारण – सत्यमेव जयते’ या पुस्तिकेचे प्रकाशन केले. तेव्हा पत्रकारांनी त्या स्पष्टीकरणावर केलेल्या आरोपांबाबत त्या नेत्यालाच प्रश्न विचारले. यामुळे तो बडा नेता पूर्णपणे हडबडून गेला होता. तर ‘एफबीआय’ची ही कामाची पद्धत पाहून त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाला जबरदस्त धक्का बसला होता. सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने असेही म्हटले होते की, आपल्याला साधी आपली प्रकाशित होणारी पुस्तिका नीट सांभाळता येत नाही. तर आपला पक्ष आणि राजकारण कसे सांभाळणार?